भारतीय सैन्याच्या कारवाईची अशी ही ‘सीमा’

    दिनांक  10-Nov-2018    
 
भारतीय सैन्याने थेट पाकी सैन्याचे मुख्यालयच २९ ऑक्टोबर रोजी उडवल्याची माहिती आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओजमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालय असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे. सदर कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या या मुख्यालयाचे जबरदस्त नुकसान झाले आहे. भारतीय लष्कराने आम्ही आमच्या सोयीनुसार योग्य त्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगितले होते.
 
 
पाकिस्तानच्या हाजिरा भागातील लष्कराचे ब्रिगेड हेडक्वार्टर अलीकडेच भारतीय सैन्याकडून लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. २९ सप्टेंबर, २०१६ रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता. त्या स्ट्राईकमध्ये भारतीय सैन्य नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी दहशतवादी प्रशिक्षण तळ, लाँच पॅड्स व पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान केले होते. दि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर रोजी पाकी सैन्याने पुंछ भागात असाच हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने थेट पाकी सैन्याचे मुख्यालयच २९ ऑक्टोबर रोजी उडवल्याची माहिती आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओजमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालय असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे. सदर कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या या मुख्यालयाचे जबरदस्त नुकसान झाले आहे. भारतीय लष्कराने आम्ही आमच्या सोयीनुसार योग्य त्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगितले होते.
 

हाजिरा ब्रिगेड हेडक्वार्टर उद्ध्वस्त

 

हा हल्ला ब्रिगेड हेडक्वार्टरवर करण्यात आला आहे. त्या-त्या स्थानिक क्षेत्रातील कारवाया संचलित करण्याचे काम अशा मुख्यालयातून होत असते. अशा मुख्यालयालाच टार्गेट करून ते गोळीबार करून उद्ध्वस्त करण्यात आले. पूर्वीपेक्षा भयंकर स्वरूपाचा हा दणका होता. या कारवाईमध्ये किती नुकसान झाले, हे पाकिस्तान कधीही सांगणार नाही. कारण, भारताने केलेल्या हल्ल्यात लष्कराचे नुकसान झाले आहे, ही गोष्ट तेथील जनतेला कळल्यास पाकिस्तानी लष्कराची नाचक्की होईलहा हल्ला बहुतेक तोफखाना, मोर्टर्स आणि इतर मोठ्या शस्त्रांस्त्रांच्या मदतीने केला असावा. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता, तेव्हा भारतीय सैन्याने लक्ष्य केलेल्या जागा हे दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स होते. लाँच पॅड काय असतात? दहशतवाद्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना नियंत्रण रेषेच्या जवळ आणले जाते. तिथून भारतीय सीमांची टेहळणी केली जाते. जिथून आत प्रवेश करायला रस्ता मिळेल तिथून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. अर्थात, ही लाँच पॅड एलओसीपासून अगदी जवळ म्हणजे एक ते दीड किलोमीटरवर असतात. पाकिस्तानी सैन्य एलओसीवर तैनात असते. ते ‘पिकेट’ म्हणजे पोस्ट किंवा छोट्या किल्ल्यांच्या मदतीने सीमेचे रक्षण करत असतात. त्यांचे नेतृत्व बटालियन हेडक्वार्टर आणि कर्नल हुद्द्याचा अधिकारी करतो. मात्र, भारतीय लष्कराने आता जिथे हल्ला केला आहे ते ब्रिगेड हेडक्वार्टर हे बटालियन हेडक्वार्टरपेक्षाही वरिष्ठ आहे. म्हणजेच पाकिस्तानी सैन्याच्या एका वरिष्ठ मुख्यालयावर भारताने आघात केला आहे.

 

पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करण्यास सुरुवात

 

गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा वापर करून काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत आहे. मात्र, आता भारतीय सैन्याच्या दहशतवादविरोधी अभियानामुळेकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेवर, सीमेवरच रोखण्यात आपल्या लष्कराला यश मिळत आहे. तथापि, या अभियानामध्ये आणि दहशतवादविरोधी अभियानांमध्येआपले अधिकारी, जवान पण शहीद होतात. मात्र, पाकिस्तानी सैन्याचे या आधी फारसे नुकसान होत नव्हते. कारण, ते पडद्यामागे सर्व दहशतवादाचे सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. यासाठीच भारताने आता धोरणात्मक बदल करून पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. ताजा हल्ला हे याचे एक ठळक उदाहरण आहे. गेल्या काही महिन्यात भारताने सीमापार गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्येही अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

 

ज्या ज्या वेळी पाकिस्तान भारताविरोधात मोठी कुरापत काढतो, तेव्हा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्याची गरज भारताला पुन्हा पडणार आहे. कारण, पाकिस्तानला जशास तसे हीच भाषा समजते. कारण, आक्रमक कारवाई करून पाकिस्तान सैन्यावर वर दबाव टाकल्याखेरीज हा देश वठणीवर येणार नाही. तसेच अशा प्रकारचा दणका दिल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचीही त्यांच्या देशात नाचक्की होत असते. त्याच वेळी आपल्या देशातील नागरिकांमध्ये समाधानही व्यक्त केले जाते. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद होत राहिले, तर नागरिकांचे, सैन्याचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कारवाया गरजेच्याच असतात व त्यांना प्रसिद्धी देणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तथापि, केवळ तेवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. युद्धशास्त्राच्या नियमानुसार,शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठीचे अन्य मार्गही अवलंबणे गरजेचे आहे.

 

५० टक्के पाकिस्तानी सैन्य दहशतवादी विरोधी अभियानात व्यग्र

 

सध्या पाकिस्तान लष्कराची अवस्था वाईट आहे. सर्वसाधारण परिस्थितीत ८५ टक्के पाकिस्तानी सैन्य हे पाक-भारत सीमेवर तैनात असते आणि केवळ १५ टक्के लष्कर अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असते. मात्र, आता यामध्ये एक मोठा फरक झाला आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असणाऱ्या तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या ‘झर्ब-ए-अज्ब’ या अभियानांतर्गत वझरिस्तान, फाटा आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात ५० टक्के पाकिस्तानी सैन्य व्यग्र आहे. एवढेच नव्हे, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीदेखील या त्रासात भर घालत आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्रांतर्गत जो साडेचार हजार किलोमीटर मार्गाचा रस्ता पाकिस्तानातून चीनमध्ये जातो, त्याचे संरक्षण करण्यासाठी १५ ते ३० हजार पाकिस्तान लष्कर गुंतले आहे. त्यामुळे दहशतवादी अभियानात सहभागी झाल्याने पाकिस्तान लष्कराचे बऱ्यापैकी नुकसान होत आहे.

 

पाकिस्तानची आर्थिक कोंडी

 

याशिवाय सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही गंभीर आहे. त्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर येण्यासाठी १२ अब्ज डॉलर्सची गरज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सौदी अरेबियामध्ये गेले, पण तिथून त्यांना तीन अब्ज डॉलर्स किंमतीच्या तेलाची मदतमिळणार आहे. कर्जफेडीसाठी सौदी अरेबियाकडून फारशी मदत मिळालेली नाही. कारण, सौदी अरेबियाची आर्थिक परिस्थितीच बिकट आहे. त्यांच्या देशातील जनतेवर होणारा खर्च हा त्यांच्या वार्षिक उत्पन्नाहून अधिक आहे.

 

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान सात दिवस चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि चीनकडूनही ते अशाच प्रकारची मदतीची अपेक्षा ठेवून आहेत. चीनची अर्थव्यवस्थाही बिकट अवस्थेतूनच जात आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. चीनने वेगवेगळ्या देशांमध्ये ‘वन बेल्ट वन रोड’ हा व्यापारासाठी रस्ते बांधण्याचा जो कार्यक्रम सुरू होता, त्यामध्येही त्यांना नुकसानच होत आहे. म्हणूनच पाकिस्तानला मदत करण्याची चीनची क्षमता संशयास्पद आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेलं ट्रेडवॉर आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालं आहे. १ नोव्हेंबरला ही किंमत ६.९७ डॉलर प्रतियुआन झाली होती. मे २००८ नंतरची युआनची ही सर्वात खालची पातळी होती. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर चीनची आर्थिक वाढ पहिल्यांदाच मंदावली आहे. चीनने जुलै-सप्टेंबर तिमाहीत साडेसहा टक्के इतक्या विकासदराची नोंद केली आहे. अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्तांमधील व्यापारयुद्ध आता चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेने चीनवर नव्याने २५० अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेला नाहीपाकिस्तानने आपल्या कुरापती न थांबवल्यास आणखी आतमध्ये, याहून अधिक महत्त्वाच्या-मोठ्या हेडक्वार्टरवर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, हेही यातून भारतीय लष्कराने ध्वनित केले आहे. काश्मीरमधील स्थानिक लोकांमध्ये यातून एक संदेश जाणार आहे. भारतीय शासन आणि लष्कर जर थेट पाकिस्तानातील मुख्यालयाला टार्गेट करू शकते, तर काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर, दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांवरही कठोर कारवाई होऊ शकते, हे तेथील जनतेला कळून चुकणार आहे.

 

आर्थिक आणि मुत्सद्दी दबाव

 

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सही संयुक्त राष्ट्रांची संस्था जगामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांवर लक्ष ठेवून असते. त्यांचे पाकिस्तानवर बारीक लक्ष आहे. पुढच्या फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित करायचे का यावर निर्णय घेतील. म्हणूनच भारताला खूप चांगली संधी आली आहे. त्याचा पुरेपूर वापर करून आर्थिक आणि मुत्सद्दी दबाव वाढवून पाकिस्तानची भारताविरोधातील दहशतवादी कारवाया करण्याची क्षमता नक्कीच कमी करता येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/