‘शशी’ची काँग्रेसी शीळ...

    दिनांक  01-Nov-2018   

 


 
 
 
सरदार वल्लभभाई पटेलांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आणि पुरोगाम्यांसह काँग्रेसींना पोटदुखी अगदी असह्य झाली. त्यात सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते असल्यामुळे ‘नेते आमचे, पण पुतळा उभारला मोदींनी,’ याचे शल्य काँग्रेसींना आयुष्यभर बोचेल, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एकीकडे जवळपास तीन हजार कोटींचा खर्च करून एवढा भव्य पुतळा उभारण्याची गरजच काय?, असा प्रश्न उपस्थित करणारा पुरोगामी-बुद्धिजंतांचा एक वर्ग, तर दुसरीकडे कात्रीत सापडलेले काँग्रेसी. कारण, पुतळा हा पटेलांचा उभा राहिला, पण जर तोच पुतळा पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा भाजप-संघाशी निगडित महानुभवांचा असता तर त्यावरून भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी काँग्रेसींनी दवडली नसतीच. पण, आता त्यांच्याच पक्षातील एका सर्वोच्च नेत्याचा पुतळा उभारल्यानंतरही काँग्रेसला पुरते अपचन झालेले दिसले. कारण, काँग्रेसचे केरळी हिरो शशी थरूर यांनी, “मोदींनी महात्मा गांधींचा पुतळा का नाही उभारला?,” असा खोचक प्रश्न एका मेळाव्यात बोलताना उपस्थित केला. एवढंच नाही तर थरूर म्हणतात, “जर गांधी हे पटेलांचे गुरू होते, तर शिष्याचे स्मारक झाले. मग भाजपला महात्मा गांधींचा पुतळा उभारावासा का नाही वाटला?” पण, काँग्रेसी शीळ वाजवत फिरणाऱ्या या पोपटाला कदाचित चार वर्षांपासून सत्तेपासून दुरावलेल्या काँग्रेसचाच इतिहास मुखोद्गत करण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, गांधींच्या मृत्यूनंतर जवळपास ६० वर्षे काँग्रेसचेच सरकार सत्तेत होते. असे असताना नेहरूंपासून ते सोनिया गांधींपर्यंत कुणालाच राष्ट्रपिता महात्मा गांधींचा असा भव्य पुतळा उभारावासा का नाही वाटला? याचे उत्तर उलट थरूरांनीच द्यावे. शिवाय, मोदींनी राबविलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ हा गांधीजींच्याच शिकवणुकीचा एक भाग. पण, काँग्रेसजनांना गांधी घराण्यापुढे काहीही दिसणे तसे दुरापास्तच! ३१ ऑक्टोबर या सरदार पटेलांच्या जयंतीदिनी आणि इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीला थरूरांनी दोघांच्याही फोटोला पुष्प अर्पण केले. पण, त्यात इंदिराजींचा फोटो अगदी मोठा आणि कोपऱ्यात छोटासा पटेलांचा फोटो. यावरूनच काय ते थरूर आणि घराणेशाहीला पूजणाऱ्या समस्त काँग्रेसजनांचे निष्ठादर्शन होते.
 

मंदिर, मुद्दा आणि मतदान...

 

सरसंघचालक आणि उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यांनंतर राम मंदिराचा मुद्दा पुनश्च चर्चेच्या केंद्रस्थानी आला. राम मंदिर झालेच पाहिजे, याविषयी कोणाही हिंदूच्या मनात शंका नाही की मतमतांतरेही नाहीत. राम मंदिर लवकरात लवकर बांधून उभे राहावे, ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची समस्त हिंदूंची मनोकामना. पण, हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर कायदेशीर तोडगाही लवकरच निघेल, या आशेत आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या काळात निकाली न निघालेला हा आस्थेचा विषय भाजप सरकारच्या काळात मार्गी लागावा, ही रास्त इच्छा. पण, आज याच धार्मिक भावनेच्या संवेदनशील विषयाचे भांडवल विरोधकांसह शिवसेनेनेही केल्याचे दिसते. शिवसेना खा. संजय राऊत यांच्या मते, आज राम मंदिर उभारले नाही, तर पुढील एक हजार वर्षं ते उभे राहणार नाही. त्यांच्या या विधानाला अतिशयोक्ती नाही तर आणखीन काय म्हणावे? राज्यात जनाधार गमावत चाललेल्या शिवसेनेने सध्या पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाचा मार्ग आणि त्याचे प्रतीक म्हणून राम मंदिराची वाट चोखाळलेली दिसते. त्यातून त्यांना किती राजकीय लाभ होईल, ते रामच जाणो; पण राम मंदिराचा विषय चर्चेत ठेवण्यासाठी अशाप्रकारे तथ्यहीन, तर्कशून्य विधानं करून काय साध्य होणार? राम मंदिराच्या बांधणीचा निर्णय झाला तरी त्याचे श्रेय शिवसेनेचे, हे सूज्ञ हिंदूजन मान्य करतील काय? तेव्हा, उगाच हिंदूंच्या भावनांशी असली विधाने करून शिवसेनेने राजकीय खेळी खेळू नये. राऊतांप्रमाणेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही या वादात उडी घेतली. “२०१९ मध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकू असं भाजपला वाटतंय. पण, राम किंवा अल्ला नाही, तर जनताच मतदान करणार आहे,” अशी मल्लिनाथी अब्दुलांनी केली. पण, ते हे विसरले की, राम मंदिर हा निवडणुकीचा ‘मुद्दा’ न बनविता मोदी सरकारला केवळ आणि केवळ देशाच्या विकासासाठी याच राम आणि अल्लाला मानणाऱ्या जनतेने मतदान केले. त्यामुळे २०१९ साली राम मंदिराच्या बांधकामाला हिरवा कंदील मिळाला किंवा दुर्देवाने न्यायालयीन खटला निकालात निघाला नाही, तरीही जनता मोदींच्या पाठीशीच ठामपणे उभी राहील. राम मंदिर लवकरात लवकर होणारच, पण केवळ या एका मुद्द्यावरून निवडणुका लढता येतील अथवा जिंकता येतील, या भ्रमात न राहणेच राजकीय सोयीचे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/