प्रतिष्ठा आणि विवाह

09 Oct 2018 21:05:32



समाजात लग्नाच्या आड इज्जत, प्रतिष्ठा वगैरे जपण्यासाठी काय काय केले जाते, याचा वेध घेतला की मन सुन्न होते. ‘विवाह’ या एका संकल्पनेला जपण्यासाठी म्हणण्यापेक्षा ‘विवाह’ या संकल्पनेला आधारभूत होईल अशाप्रकारेच मुलामुलींची जडणघडण केली जाते, पण यामागचे दबलेले श्वास कोण पाहणार? बिहारच्या समस्तीपुराची घटना ताजी आहे. भयंकर संतापजनक आणि कोणत्याही संवेदनशील नागरी समाजाला विचार करायला लावणारी आहे. ६५ वर्षीय रोशन लालने आपल्या मुलाचा विवाह ठरवला. अर्थात ‘इज्जत के खातिर’ वगैरे म्हणत जातीतल्या २१ वर्षाच्या मुलीशीच ठरवला. पण, मुलाचे दुसऱ्या कोणातरी मुलीवर प्रेम होते. मुलगा लग्नाआधीच पळून गेला. त्यामुळे अर्थातच ठरलेले लग्न मोडले. मुलगा आपले जीवन मनाप्रमाणे जगण्यास निघून गेला, मात्र मुलीच्या जीवनात जे घडले ते आजही समाजात स्त्रीची किंमत काय आहे, हे पुरेसे दाखवून जाते. मुलगा पळाला म्हणून लग्न तुटले यात कारण आणि चूक त्या मुलाची जरी असली तरी त्याचे प्रायश्चित्त त्याने जिच्याशी लग्न मोडलं त्या २१ वर्षांच्या निष्पाप मुलीलाच घ्यावे लागले. लग्न मोडले. तिला कोण पत्करणार? इज्जत गेली. त्यात रोशनलालचा मुलगा पळाला म्हणून त्याचीही म्हणे इज्जत गेली. त्यामुळे वधू आणि रोशनलालकडून इज्जत वाचवण्यासाठी वय वर्षे ६५ असलेल्या रोशनलालने सून म्हणून जिला पाहिले होते, त्या २१ वर्षीय मुलीशी विधीवत लग्न केले. ‘म्हातारा न अवघे पाऊणशे वयमानया उक्तीनुसार वयाने थकलेला रोशनलाल आणि वधूच्या वेशातली चेहऱ्यावर अक्षरशः प्रेतासारखे निर्जीव भाव असलेली ती मुलगी यांचे फोटो प्रसारमाध्यमात चर्चिले जात आहेत. छे, ही मुलगी जिवंत आहे का? जिवंत असेल तर तिला मन आहे का? असंख्य प्रश्नांनी मनात काहूर उठले आहे. बिहार समस्तीपूरमधली ही घटना हिमनगाचे टोक आहे. हे असेच आणि याच पठडीत मोडणारी प्रकरणं जगाच्या पाठीवर सर्व समाजात आहेत. का? याला उत्तर आहे की नाही? मुलगी परक्याचं धन असेल हो, पण या धनालाही मन भावना आहेत. ईश्वराने तिला स्त्री बनवण्यासोबतच माणूस बनवले आहे. विवाहाच्या परंपरेत या माणूसपणाचा बळी घेऊ नये, इतकीच इच्छा.

 

विवाहाच्या आड...

 

विवाह हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक संस्कार. विवाह संस्था गरजेची आहे का? हो, समाजधारणा राखण्यासाठी, समाजाची संस्कृती जपण्यासाठी विवाहसंस्था गरजेची आहे. या विवाहसंस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि कायद्यात्मक स्वरूपात अनेक नियम, अटीशर्ती आहेत. या सर्वांची पूर्ती करत भारतीय समाजात विवाहसंस्था आजही तगली आहे. या विवाहसंस्थेच्या अनुषंगाने समाजात ‘इज्जत’ या भावनेखातर जे काही घडते ते पाहिले की वाटते, माणूस विवाहासाठी की माणसासाठी विवाह. वंशशुद्धीसाठी जातीपातीची कुंपणं अधिक काटेरी आणि असंवेदनशील होत आहेत. अर्थात त्याचे मुख्य साधन होते आणि आहे बेटीबंदी. बेटीबंदी म्हणजे आपल्या जातीतील मुलगी दुसऱ्या जातीत विवाह करून देऊ नये, याबाबत पराकोटीचा आग्रह. इतका आग्रह की, ही प्रथा जपण्यासाठी प्रसंगी मरणही पत्करायची तयारी. अर्थात, मरण पत्करण्यापेक्षा त्या मुलीला मरण देणे सोपेच, त्यामुळे मुलीला मारणं हे ऑनर किलिंगच्या, इज्जतीच्या चौकटीत बेमालूमपणे बसवले जाते. याच परिक्षेपात दुसराही मुद्दा येतो. मुलगी वयात येताच तिचा विवाह जुळवणे. विवाह जुळवताना ‘मुली चालून दाखव, बोलून दाखव’ वगैरे म्हणत मुलीचे परीक्षण करणे कालबाह्य झाले तरी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात कांदेपोहेच्या नावावर मेजवान्या झोडणे हे सुरू आहे. मुलीचे दिसणे हे महत्त्वाचे आहेच, त्याहीपेक्षा मुलीला पगार किती हा मुद्दा सध्या वरचढ होताना दिसत आहे. पण समाजात विवाह जुळवताना आणखीही एक प्रथा रूढ होताना दिसत आहे. वधूच्या मावशी, आई, आत्याला किती अपत्यं आहेत आणि त्यामध्ये किती मुली आहेत? हे का पाहिले जाते तर मुलीच्या आई, आत्या, मावशीच्या अपत्यांमध्ये किती मुली आहेत त्यावरून भावी वधूलाही मुलगीच होऊ शकतील, त्यामुळे तशी चाचपणी केली जाते. भयंकर आणि तिरस्करणीय बाब. पण हे आजही समाजात होत आहे. कितीही नाकारले तरी होत आहे. विवाह हा पवित्र संस्कार आहे ना? मग त्या संस्काराच्या मुख्य असलेल्या वधूला केवळ आणि केवळ मुलं, त्यातही मुलगा जन्माला घालणारे एक साधन म्हणून पाहणे हे माणसाला शोभणारे नक्कीच नाही.

Powered By Sangraha 9.0