मन‘मुराद’ कहाणी तिची...

    दिनांक  09-Oct-2018   


 


इराकमधील इसिसच्या क्रूर अत्याचारांतून बचावलेल्या आणि आता यझिदी मुलींसाठी संयुक्त राष्ट्रांसोबत काम करणाऱ्या नादिया मुरादला शांततेचा नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झाला. तिच्या सहनशक्तीची, धैर्याची ही कहाणी...


आपण लहानपणापासून विशेषत: महिलावर्ग, अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे वगैरे उपदेश ऐकत मोठे होत असतो. मात्र, या अन्यायाची पातळी काय आहे आणि तुमचा आवाज कुठे जाणार आहे, हे तुम्हाला कोणी सांगत नाही. कारण, अन्यायाची व्याख्या स्थल-काल-व्यक्तिपरत्वे बदलणारी असते. मात्र, इतरांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे शिक्षण देणारी फार मोजकी माणसं असतात, तर जात, धर्म किंवा पुरुषीवृत्ती या पलीकडे जाऊन लढणारे हे त्याहूनही कमी असतात. मग, येतात अन्यायाविरोधात फक्त अभिव्यक्त होणारी मंडळी आणि यातूनच ‘मी टू’सारखे अभियान सुरू होते. मात्र, हे अभियान कदाचित तुम्हाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देत असावे. कारण, या अन्यायाविरोधात लढणारे चेहरे फार कमी असतात. समाजमाध्यमांवर केवळ अभिव्यक्त होणार्या पिढीत एक अशी मुलगी होती जिने फक्त अन्याय सहनच केला नाही, तर ती अभिव्यक्तही झाली आणि असंख्य महिलांसाठी आज ती ‘मसीहा’ ठरली आहे. एका सामान्य महाविद्यालयीन तरुणीसारखं आयुष्य जगणाऱ्या ‘ती’चं एका रात्रीत आयुष्य उद्ध्वस्त झालं. ‘ती’ म्हणजे, नोबेल शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद. २०१४ साली मलाला युसुफझाई हिच्या नंतर नादिया ही शांततेचा नोबेल मिळवणारी सर्वात लहान महिला ठरली आहे. ‘ति’च्या प्रवासाला खरंतर ‘प्रवास’ म्हणणंही लाजीरवाणं ठरावं. कारण, तो ‘प्रवास’ नव्हता, तर निव्वळ ‘त्रास’ होता.

 

इराकसारख्या बुरसटलेल्या देशातील शिंजा नावाच्या शहरात राहणारी नादिया. आई, ती आणि तिचा लहान भाऊ असं लहान कुटुंब. पोटापाण्यासाठी शेती हा एकमेव पर्याय आणि ती महाविद्यालयात शिक्षण घेणारी. अगदी साधं सरळ आयुष्य जगणारं नादिया आणि तिचं कुटुंब. पण, २०१४ साली एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. ‘इसिस’च्या सैनिकांनी तिच्या कुटुंबासह १७०० यझिदी लोकांचं अपहरण केलं. या सगळ्यामागचा त्यांचा हेतू होता तो म्हणजे, यझिदींना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडणं. त्यानंतरही ज्यांनी इस्लाम कबूल केला नाही, त्यांना ठार मारण्यात आलं. या धार्मिक द्वंद्वात नादियाच्या आई व भावाची हत्या करण्यात आली आणि तिच्यासारख्या असंख्य महिला बळी पडल्या, त्या मानवी तस्करीला, अनन्वित अत्याचाराला आणि घृणास्पद बलात्कारांना. दोन वर्षांत नादियाची अनेक वेळा दलाली करण्यात आली. एखाद्या वस्तूप्रमाणे तिचा सौदा होत होता.

 

देवाणघेवाण सुरू होती. तरी तिच्या मनात मात्र एकच प्रश्न होता, “कोणता धर्म अत्याचाराला प्रोत्साहन देतो? देव असेल तर तो मला बाहेर काढेल,” अशा काहीशा भाबड्या आशेवर नादियाने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ती पकडली गेली. याची शिक्षा म्हणून नादियावर सहा सुरक्षारक्षकांनी बलात्कार केला. त्यादिवशी तिला कळलं, देव नसतो. फक्त माणूस असतो आणि तो क्रूर असतो. तिने जे चालू आहे ते जीवन स्वीकारण्याचाही प्रयत्न केला पण, तिला जमलं नाही. अखेर २०१६मध्ये ‘इसिस’च्या तावडीतून तिची सुटका झाली. पासपोर्ट नसल्यामुळे कागदपत्रे जमा करेपर्यंत तिला इराकमध्येच लपून राहावे लागले. त्यावेळी जर्मनीने एक हजार ‘इसिस’च्या ताब्यातील महिलांना सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात नादियाही होती. या सगळ्या प्रवासात नादिया एक गोष्ट नक्की शिकली ती म्हणजे, जग कितीही वाईट असलं तरी, तुम्ही या जगाला चांगलं करण्यासाठी प्रयत्न केला नाही, तर तुम्हीही या सगळ्याचाच एक भाग बनून जाता. मूगगिळून फक्त गप्पं बसून, जे झालं ते पचवत बसण्यापेक्षा नादियाने जे आहे ते स्वीकारलं आणि आपण काय करू शकतो याचा विचार केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नादिया सांगते की, “मी माझी कहाणी सांगायला कोणत्याही देशात जायला तयार होते. मला प्रसिद्धी नको होती. मला फक्त माझ्यासारख्या अत्याचाराच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींना मदत करायची आहे.” आणि तसे तिने केलेही.

 

मानवी तस्करांच्या तावडीतून सुटलेल्यांसाठी काम करणारी ती संयुक्त राष्ट्रांची पहिल्या सदिच्छादूत आहे. एवढ्या सगळ्या अत्याचाराचा सामना केल्यानंतरही २०१६साली नादियाने अमेरिकन काँग्रेसच्या व्यासपीठावर ‘इसिस’ला संपवण्याचीही मागणी केली होती आणि आज ती तीन हजारांहून जास्त यझिदी महिलांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आहे, ज्यांचा आजही ठावठिकाणा सापडलेला नाही. मानवी आयुष्याची जेवढी म्हणून धूळधाण होऊ शकते तेवढी धूळधाण होऊनही ती खंबीर राहिली. शेवटी एवढं सगळं होऊनही त्यापासून पळून न जाता तिच्यासारख्या असंख्य मुलींना त्यातून बाहेर काढण्याचं श्रेष्ठ काम तिने केलं आणि आजही करत आहे. अशा या अग्निदिव्यातून पार पडून सोन्यासारख्या चमकणार्या नादिया मुरादला सलाम...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/