तिचा सांस्कृतिक वारसा भाग-१

    दिनांक  09-Oct-2018   


 

 

संस्कारांतून साकारणारा सांस्कृतिक वारसा

 
 

या नवरात्रीनिमित्त स्त्रीचे जीवन सुंदर व समृद्ध करणाऱ्या सांस्कृतिक वारशाकडे पाहू. तिला मिळालेला वारसा आणि वारसा जतन करणारी ती यांची आठ रूपे पाहू. जीवन श्रीमंत करणारी जणू अष्टमहालक्ष्मी! या नवरात्रीत संस्कृतीलक्ष्मीच्या चरणी ही लेखमाला अर्पण.

 
 

भूक लागल्यावर जेवणे ही प्रकृती आहे. पण, आपण भुकेले असताना, आपल्यातले अन्न दुसऱ्याला देणे, ही संस्कृती आहे किंवा सोन्याचा गोळा ही प्रकृती आहे. पण, त्यापासून घडवलेला अलंकार ही संस्कृती दाखवते किंवा तांदूळ ही प्रकृती आहे, तर त्यापासून केलेला नारळीभात ही संस्कृती दाखवते. दगड ही प्रकृती आहे, तर त्यावर घाव घालून घडवलेली मूर्ती ही संस्कृती दर्शवते किंवा दूध ही प्रकृती आहे, तर त्याला विरजण लावून, घुसळून, कढवून त्याचे तूप करणे ही संस्कृती झाली. जिथे काही संस्कारांनी एखादी गोष्ट सुंदर, शुद्ध, दीर्घायुषी व समृद्ध होते; पाहणाऱ्याच्या मनात आदरयुक्त कौतुक निर्माण करते, तिथे संस्कृतीचा जन्म होतो. एका दिवसात खराब होऊ शकणाऱ्या दुधावर संस्कार केले की, त्याचे दीर्घकाळ टिकणारे व अधिक पौष्टिक असे तूप होते. एखाद्या मनुष्यावर योगासनाचे संस्कार केले असता तो आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी होतो किंवा लहान मुलावर स्वच्छता, शिक्षण, अभ्यास, निरपेक्ष प्रेम, निष्काम कर्तव्य, स्वसंरक्षण, मोठ्यांचा आदर आदी संस्कारांचे घाव रोजच्या रोज घातले असता सुसंस्कृत नागरिक तयार होतो.

 

संपूर्ण समाज जेव्हा असे संस्कार आत्मसात करतो, तेव्हा तिला ‘संस्कृती’ म्हटले जाते. उदाहरणार्थ - सिंधू संस्कृती किंवा दगडावर संस्कार करून हत्यारे तयार करणारी पाषाणयुगीन संस्कृती. असे संस्कार जेव्हा परंपरेने पिढी दरपिढी चालत येतात तेव्हा तो आपला सांस्कृतिक वारसा होतो. हा वारसा वेगवेगळ्या पद्धतीतून, रीतीरिवाजातून, रूढीतून आणि सामाजिक संस्थांमधून प्रकट होतो. भारत हा जगातील एकमेव देश आहे, ज्याला किमान पाच हजार वर्षांची अखंडित सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. आपल्याला वारशाने मिळालेले जमीन, वाडी, बंगला, गाडी या वस्तू डोळ्याला दिसतात. त्यांचे मोजमाप करता येऊ शकते. त्यांची किंमत ठरवणे सोपे नसले तरी शक्य आहे पण, परंपरेने मिळालेली मातृभाषा? तिची किंमत कशी करणार? ज्या मराठी भाषेमुळे ज्ञानेश्वरी आणि गीतरामायण ऐकायचे भाग्य लाभले, ज्या मराठी भाषेने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ऐकवताना डोळे पाणावले, ज्या मराठीने ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे शिकवले, त्या सांस्कृतिक वारशाची किंमत कशात मोजता येऊ शकते का? किंवा परंपरेने चालत आलेली उकडीचे मोदक, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, काळा मसाला, मेतकूट, पापड, लोणचे, कुरडई, शेवई, फोडणी, विरजण इत्यादी करायच्या पद्धतीची किंमत कशात मोजणार? किंवा घरातील सण साजरा करायची पारंपरिक पद्धत जसे - गौरीचे जेवण, नवरात्रीला केली जाणारी कुमारिकेची पूजा, दिवाळीला करायचा आकाशकंदील, पणत्यांची सजावट याची कशी किंमत करणार?

 

अगदी साधी ठिपक्यांची रांगोळी काढायची पद्धत, हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. दारात काढायची लक्ष्मीची पावले, गोपद्म, शंख, चक्राची ठराविक नक्षी परंपरेने मिळाली आहे. त्याची काय किंमत करणार? न्यूटन जेव्हा म्हणतो, ''If I have seen further, in spite of being a dwarf, it is because I am standing on the shoulders of great giants. (मी बुटका असूनसुद्धा जर दूरचे पाहू शकलो असेन, तर ते केवळ मी थोरामोठ्यांच्या खांद्यावर उभा असल्यामुळे.) अर्थात, आधीच्या थोर शास्त्रज्ञांनी मागे ठेवलेल्या वैज्ञानिक वारशामुळे मी मोठी कामे करू शकलो. ही एकप्रकारे गुरू-शिष्य परंपरेची आणि गुरूकडून शिष्याला मिळणाऱ्या विद्येच्या वारशाची व्याख्या म्हणायला हरकत नाही. अगदी तसेच, जगण्याच्या कलेच्या वारशालासांस्कृतिक वारसा’ म्हणू शकतो. हा सांस्कृतिक वारसा आपल्यापासून वेगळा करता येत नाही. कारण तो आपल्या जीवनाचा केवळ अविभाज्य भाग नाही तर आपल्या जीवनाचा पाया आहे. तो काढून टाकला तर, आपले जीवन कोलमडून पडेल आणि मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीही फरक राहणार नाही. या नवरात्रीनिमित्त स्त्रीचे जीवन सुंदर व समृद्ध करणाऱ्या सांस्कृतिक वारशावर एक नजर टाकूया. सामान्य स्त्रीला ‘लक्ष्मी’ करणाऱ्या संस्कारांची यंदाच्या नवरात्रीत ओळख करून घेऊया....

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/