तरुणांच्या मदतीने तरुणांसाठीचे एक सुरक्षित शहर

    दिनांक  09-Oct-2018   एक सुरक्षित शहर असावे, अशी आपणा सर्वांची इच्छा... आपल्या या स्वप्नांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा कधीतरी आपण विचार करावा, अशी साधी भावनाही आपल्या मनात येत नाही. मात्र, मनातील या भावनेला सत्यात उतरवत डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’ ही संस्था मागील अनेक वर्षे ‘पोलीस मित्रबनून शहरात काम करीत आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांच्या मदतीने गस्त घालणे तसेच विविध समाजोपयोगी कामेही संस्थेच्या माध्यमातून केली जातात. या संस्थेची स्थापना डोंबिवलीकर असलेल्या विश्वनाथ बिवलकर यांनी मे २०११ रोजी केली. तेव्हा, या संस्थेच्या सामाजिक कार्याचा घेतलेला हा आढावा.


‘ईगल ब्रिगेड, डोंबिवली’ म्हणजेच समाजातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी समाजातील घटकांच्या म्हणजेच तरुणांच्या साहाय्याने घेतलेली गगनभरारी. संस्थेने आजपर्यंत विविध पोलीस विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत काम करत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमांद्वारे लोकचळवळ अभियान राबवले आहे. ईगल ब्रिगेडसमाजाच्या प्रत्येक समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे संस्था करत असलेल्या कामांमध्ये पराकोटीचे वैविध्य आणि समाजशीलता आहे. ईगल ब्रिगेड’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ‘ईगल ब्रिगेड’ करत असलेल्या कामांचे स्वरूप कळले ते असे :-

 

१. शहर पोलिसांतर्गत केलेली कामे -

 

अ) नाईट पेट्रोलिंग : पोलिसांच्या साहाय्याने सणावाराच्या दिवशी, उन्हाळी सुट्टी तसेच नित्यनेमाने रात्रीच्या वेळी डोंबिवलीतील विविध भागात गस्त घालणे. त्यामुळे काही प्रमाणात साखळी चोरी, घरफोडी, लूटमार या गोष्टींना प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

 

ब) घरसुरक्षा अभियान : घरफोडी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व खबरदारीचे उपाय याबाबतीत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. त्याबाबत विविध सोसायट्यांमध्ये पत्रकांचे वाटप करून लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना सतर्कतेचा संदेश देणे.

 

क) महिला सुरक्षा : महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे होणारे शोषण या विरोधात महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘निर्भया महिला संस्थे’ची स्थापना केली. त्याअंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लावणे.

 

२. रेल्वे पोलिसांतर्गत केलेली कामे : रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, वरिष्ठ नागरिक महिला तसेच शारीरिक अपंगांसाठी आसनांची व्यवस्था करणे, रेल्वेने प्रवास करताना एखादा अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय सेवेची व्यवस्था उपलब्ध करणे. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे. रूळ ओलांडून, टपावर बसून किंवा दरवाजाला लोंबकळून होणारे अपघात टाळण्यासाठी पथनाट्य, सोशल मीडिया, पोस्टर व पत्रकांचे वाटप करणे. ‘पोलीस मित्र’च्या धर्तीवर ‘रेल मित्र’ संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करणे. रेल्वे फलाटावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे. स्थानक परिसरात जागा अडवणाऱ्या फळविक्रेते, भाजीविक्रेते त्यांना जागा मोकळी करण्यासाठी पोलिसांच्या साहाय्याने ताकीद देणे.

 

३. वाहतूक पोलिसांतर्गत केलेली कामे : वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ यांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे. त्यातही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. ट्रीपल सीटने प्रवास करणाऱ्या, हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करणे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणे. वाहतूककोंडीत वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे. लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. तसेच वाहतूक नियोजन सुलभ होण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.

 

४. इतर कामे: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निरोगी पर्यावरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी जनजागृती करणे. चौकात पोस्टर व पत्रकांद्वारे जनजागृती करणे. निवडणुकांच्या वेळी मतदानाबाबत जनजागृती करणे तसेच मतदानाचे महत्त्व पटवून देणे. डोंबिवलीतील औद्योगिक विभागातील वाढत्या प्रदूषणाची दखल घेणे व त्यावरील उपाययोजनेसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणे. तरुणांना अमलीपदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ड्रग्समुक्त मोहीम राबवणे तसेच सर्वच विभागांतील पोलिसांसाठी योग्य, ध्यानधारणा, दंतचिकित्सा यांसारख्या शिबिरांचे आयोजन करणे. प्रामाणिक रिक्षाचालकांचा गौरव करणे तसेच फोफावत असलेल्या सायबर क्राईमबाबत जनजागृती करणे यांसारखी समाजोपयोगी कामे ‘ईगल ब्रिगेड’ संस्थेमार्फत केली जातात.

 

‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचे सर्व श्रेय सदस्यांना दिले. हे आपल्या संपूर्ण टीमचे यश आहे आणि यात पुरुषांप्रमाणेच महिलांचाही तेवढाच सहभाग आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत चालली आहे. तसेच डोंबिवलीत राबविलेल्या ‘ईगल ब्रिगेड’वर आधारित मुंब्रा आणि भिवंडीतही असाच उपक्रम राबविला जात आहे. दि. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ मानला जातो. या पर्यावरण दिनानिमित्ताने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी ‘ईगल ब्रिगेड’चे सदस्य लोकांमध्ये जनजागृती विविध प्रकारे करणार आहेत. पर्यावरणाचा ढासळता तोल पाहता प्रत्येकाने आनंदी व निरोगी आयुष्य जगण्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे आहे. या उद्देशाने ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. विविध पर्यावरण संवर्धक उपायांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. त्यामुळे हवा शुद्ध होईल. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन झाडे लावण्याने होणारे फायदे सांगून प्रत्येक सोसायटीत किमान एक-दोनझाडे लावण्याबाबत लोकांना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. जंगलाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाळ्यात सावलीसाठीदेखील झाडे दिसेनाशी झाली आहेत. हे असे चालू राहिल्यास एक दिवस असा येईल की, अजिबातच झाडे नसतील असे होऊ नये म्हणून आता येत्या पावसाळ्यात झाडे लावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. गाड्या, मोटरसायकल यांच्यासारखी हवा प्रदुषित करणारी वाहने चालवण्यापेक्षा सायकल चालवा, त्यामुळे व्यायाम होईल आणि हवा पण शुद्ध राहील. याबरोबरच एमआयडीसी विभागातील सर्व कंपन्यांमध्ये ‘झिरो गारबेज’ ही संकल्पना राबवण्याचा ‘ईगल ब्रिगेड’चा मानस आहे.

 

दि. ३१ मे जागतिक ‘तंबाखू विरोधी दिना’निमित्त दि. ३० मे रोजी डीसीपी संजय जाधव, एसीपी कालिदास सुर्यवंशी, डोंबिवली विभाग आणि चारही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली ‘ईगल ब्रिगेड’ व ‘इंडियन डेन्टल असोसिएशन’, डोंबिवली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा व टिळकनगर पोलीस ठाण्यांतर्गत दंत तपासणी व दंत चिकीत्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर सकाळी ९:३० वाजता सुरू झाले होते. अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या तणावांचा सामना करावा लागतो. कधी घरातील, ऑफिसमधील कामांमुळे मोठ्यांच्या मनावर, तर परीक्षेत चांगले मार्क मिळावेत यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर ताण पडतो. त्याचे वेळीच योग्य ते व्यवस्थापन केले नाही, तर मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. आपल्या प्रमाणेच किंबहुना आपल्यापेक्षा पोलिसांवर देशाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असते आणि म्हणूनच पोलीस खूप तणावाखाली काम करतात. आता कालचेच उदाहरण घ्या, मध्य रेल्वेवर झालेल्या बिघाडामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू झाली. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली तेव्हा पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. या पार्श्वभूमीवर खास पोलिसांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी दि. ३ जानेवारी, २०१५ रोजी संध्याकाळी 4 वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील ‘GRP’ ऑफिसमध्ये ‘ईगल ब्रिगेड’ आणि ‘GRP’च्या संयुक्त विद्यमाने योगविद्येचे आयोजन करण्यात आले.

 
ईगल ब्रिगेडच्या सदस्या ज्योती वारूडे यांनी पोलिसांना योगसाधनेचे धडे दिले. ‘योग’ ही एक अशी विद्या आहे ज्याने स्वत:च्या मनावर आणि शरीरावर संयम ठेवणे शक्य होते. त्यामुळे परिस्थिती कशीही असो ती शांतपणे, विचारपूर्वक हाताळण्यास मदत होते. या शिबिरात योगविद्येचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच योगविद्येची विविध आसने करून दाखवण्यात आली आणि फक्त पोलिसांनीच नव्हे, तर सर्वांनीच दररोज योगासने करावीत असे आवाहनही करण्यात आले. पोलिसांना आपल्या कामामुळे स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि म्हणूनच पोलिसांसाठी खास योग आणि ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्याचा ‘ईगल ब्रिगेड’चा मानस आहे. कारण योगविद्या ही ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. या शिबिरामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन कामाचा ताण हलका होण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी मुंबई रेल्वे सीपी मधुकर पांडे यांना त्यांच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये खास पोलिसांसाठी ध्यानधारणा व योग शिबिराचे आयोजन करण्यासाठी परवानगी मागाणारे लेखी निवेदन ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी दिले होते. या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या अनुषंगाने मुंबई रेल्वे सीपी मधुकर पांडे, राजेश्वरी रेडकर आणि डीसीपी रुपाली आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ईगल ब्रिगेड’च्या संकल्पनेतून सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ध्यानधारणा आणि योग शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घर आणि करिअर अशा दोन्ही आघाड्या यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहे. लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. परंतु, इतरांप्रमाणे आजही करिअरसाठी बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना येणाऱ्या समस्या त्यामुळे वाटणारी असुरक्षितता यातून स्त्रियादेखील सुटलेल्या नाहीत. अनेक महिला घरापासून दूर दररोज रेल्वेने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान चोरी, छेडछाड यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांची ठाणे ते कर्जत लोहमार्गाने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉटसअॅपवर लोहमार्ग पोलिसांचा ‘महिला निर्भया ग्रुप’ असावा अशी संकल्पना होती. ही संकल्पना विश्वनाथ बिवलकर यांनी जीआरपीचे कमिशनर रवींद्र सिंगल आणि डीसीपी रुपाली आंबोरे यांच्या कानावर घातली. त्यांना ही संकल्पना खूप आवडली आणि त्यांनी आपली सहमती दर्शवली. अशाप्रकारे दि. २१ फेब्रुवारी, २०१५ रोजी ‘ईगल ब्रिगेड’ व ‘प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनच्या संकल्पनेतून लोहमार्गाने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महिला निर्भया ग्रुपस्थापन करण्यात आला. या ग्रुपमध्ये ठाणे ते कर्जतपर्यंतच्या प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

यामुळे महिलांना तात्काळ मदत उपलब्ध करणे शक्य होईल तसेच विविध सकारात्मक बदल घडून येतील. ते पुढीलप्रमाणे आहेत :

 

१. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

 

२. हरवलेल्या महत्त्वाच्या वस्तू सापडण्यास मदत होईल.

 

३. छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ मदत मिळणे शक्य होईल.

 

४. महत्त्वाचे म्हणजे गुन्ह्यांची संख्या कमी होऊन गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे शक्य होईल.

 

डोंबिवली ‘GRP’चे कमिशनर तत्कालीन आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, डीसीपी रुपाली आंबोरे, डीसीपी दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’ रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. त्यातूनच या रेल्वे सुरक्षा अभियानास प्रारंभ झाला. हे अभियान अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने ‘ईगल ब्रिगेड’ने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहज करता येतील अशा गोष्टींवर आधारीत एक ऑडिओ क्लीप तयार केली आहे. त्यातील महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे :

 

१. रेल्वेच्या दरवाजा जवळ उभे राहून मोबाईलवर बोलू नये. असे केल्यास आपला जीव जाऊ शकतो याची काळजी घ्यावी.

 

२. रेल्वेच्या टपावरून प्रवास करणे टाळावे. कारण, आजूबाजूला असलेल्या जास्त व्होल्टेज क्षमतेच्या वायरींमुळे शॉक लागण्याची शक्यता असते.

 

३. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीव्हीवर दाखवलेली कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी करू नये. कारण, चित्रपटातील स्टंटबाजी प्रशिक्षित लोकांच्या देखरेखीखाली ‘रिटेक’वर ‘रिटेक’ घेऊन केली जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र एकच ‘टेक’ असतो जीवन किंवा मरण.

 

४. रेल्वे स्थानकाच्या परिसरात एखादी संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा.

 

यांसारख्या अनेक सहज करता येण्याजोग्या गोष्टींचा समावेश या ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे. ही क्लीप ‘ईगल ब्रिगेड’च्या सदस्या छाया उदय घाटगे यांनी तयार केली आहे तसेच याद्वारे जास्तीत जास्त लोकांनी सामील करून या रेल्वे सुरक्षा अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी केले आहे. डोंबिवली जिमखाना येथे उत्सव आयोजित केला जातो. यात खाद्यपदार्थांपासून ते विविध प्रकारच्या उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाते. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या वर्षी एसीपी कालिदास सूर्यवंशी आणि डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून लोकांमध्ये विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी ‘ईगल ब्रिगेड’तर्फे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचबरोबर समाजातील गुन्हेगारी टाळण्यासाठी तसेच लोकांना सतर्क करण्यासाठी ध्वनिफीती तयार करण्यात आल्या असून त्यांचादेखील या प्रदर्शनात समावेश आहे तसेच सतर्कतेचे प्रात्यक्षिक देण्यासाठी व्हिडीओ क्लिप्ससुद्धा दाखवण्यात येत आहेत. या प्रदर्शनात

 

* वाहतुकीचे नियम

 

* सोनसाखळी चोरांपासून सावधानता

 

* गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत

 

* बालमजुरी

 

* जातीय सलोखा अभियान

 

यासारख्या विषयांवर आधारित चित्ररुपात विविध संदेश देण्यात येत आहेत. तेव्हा आमची अशी विनंती आहे की, प्रत्येकाने या प्रदर्शनास जरूर भेट द्या. हा उत्सव २० डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत संध्याकाळी ४ ते १० वेळेत सर्वांसाठी खुला आहे. सातत्याने समाजासाठी काम करणाऱ्या संस्थेचे अथक प्रयत्न पाहून वाटते सतत कार्यरत राहणारी ही संस्था, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्ते यांच्या ध्येयशील कार्याची प्रेरणा काय असावी? यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. समाजासाठी काही करणे हे काम वाटतच नाही. ते तर आपले कर्तव्य आहे. समाजात चांगले सुरक्षित, सकारात्मक वातावारण तयार होणे हे गरजेचे आहे. कारण, या समाजाचा एक घटक आपणही आहोतच. समाजासाठी काही करणे म्हणजे स्वत:साठी काही करण्यासारखे आहे. समाजाला स्वत:समान मानून सेवा करणाऱ्या ईगल ब्रिगेड’ची सामाजिक जाणीव खरंच ‘ईगल’ अर्थात गरुडाच्या झेपेसारखीच भव्य आहे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/