सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई

09 Oct 2018 13:58:43

 


 
 
 
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांची भूमिका
 

ठाणे : खारफुटीचे क्षेत्रफळ ज्या ठिकाणी १ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी ५० मीटर या ‘ना-बांधकाम’ क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेतला.

 

मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच ज्या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्रफळ १ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी ५० मीटरच्या ‘ना-बांधकाम’ क्षेत्रात जी बांधकामे उभी राहिली आहेत, त्या बांधकामांवर कारवाई करून ते क्षेत्र २००५ रोजीच्या स्थितीत आणण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.

 

यावेळी जयस्वाल यांनी सद्यस्थितीत महापालिका हद्दीची प्रतिमा तयार करून आजची परिस्थिती आणि २००५ रोजीची स्थिती यामध्ये असलेल्या तफावतीचा आढावा घेणे, खारफुटीच्या क्षेत्राचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करणे, त्या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याबाबत संबंधित विभागास कळविणे, ज्या ठिकाणी खारफुटीची कत्तल झाली आहे, त्या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करणे, खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करणे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खारफुटीव्याप्त क्षेत्र वनविभागास हस्तांतरित करण्याबाबतही जयस्वाल यांनी सूचित केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0