इज्जतीसाठी मुलगी मेली हो...

07 Oct 2018 20:03:19



देशभरात ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. मुलीचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे, तिचे शिल म्हणजे केवळ आणि केवळ तिचे कुणाशी प्रेमसंबंध किंवा त्याही पुढे प्रस्थापित होणाऱ्या नात्यांवर अवलंबून. ती नाती, ते प्रेमसंबंध मुलीला स्वतःच्या मनाने जपण्याचा हक्क नाही. कालपरवाच घडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या दोन घटना. मालेगावची नेहा चौधरी १८व्या वाढदिवसानिमित्त परजातीतील प्रियकरासोबत फिरायला गेली, अशी माहिती समजताच तिच्या आईबापांनी आणि चुलत भावाने तिचा गळा दाबून खून केला, तर सोलापूरच्या अनुराधा बिराजदार या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी असलेल्या कुटुंबाच्या मुलाशी विवाह केला म्हणून तिचीही आईवडिलांकडून हत्या करण्यात आली. भयंकर शब्दातीत. प्रेम करणे हा गुन्हा आहे का? हा फार आदिम काळापासून विचारला गेलेला प्रश्न. जातपात, धर्म, वंश, वर्ण आणि वर्ग या सर्वच स्तराच्या पातळीवर हा प्रश्न आजही समाजात भस्मासूर बनून राहिला आहे. आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, यामध्ये वंशशुद्धीपेक्षा लोक काय म्हणतील ही भावना प्रबळ झाली आहे. जणूकाही मुलीने प्रेमविवाह केला तर यांची सात कुळे नरकात बुडतील, असा भाव असतो. खरे पाहिले तर मुलगा व्यसनी, गुन्हेगार, निष्क्रीय झाला तरी लोक काही ना काही म्हणतच असतात. त्यामुळेही इज्जत जातच असते. मात्र, त्यावेळी वंशाचा दिवा म्हणून सगळे बिनदिक्कत खपवून घेतले जाते. इज्जत म्हणजे काय? त्या इज्जतीची किंमत आपणच जन्म दिलेल्या मुलीचे आयुष्य क्रूरपणे संपवणे आहे का? आईबापाला आपली मुलगी राजकुमारीच वाटते. मग या राजकुमारीला स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्याचा मौलिक अधिकार का नाही? कारण या आईबापांना भीती असते, “समाज काय म्हणेल, आपल्याला वाळीत टाकेल, आपल्या दुसऱ्या मुलीबाळीचे लग्न होणार नाही.” या भीतीपोटी आंतरजातीय विवाह करणाऱ्या किंवा प्रेमसंबंध असलेल्या मुलींची हत्या केली जाते. कधी बदलेल हे चित्र? मुलींना आपल्या तथाकथित इज्जतीच्या प्याद्यापेक्षा तीही एक भाव-भावना असलेली माणूस आहे, हे समाजाला कधी समजेल? की इज्जतीसाठी मुलगी मेली हो...चा शो कायम राहणार आहे?

 

तुम बदल गये हो..

 

उगीचमी जिवंत आहे, बरं का?’ असे लोकांना दिसावे म्हणून सध्या काँग्रेसची काहीबाही थेरं सुरू असतात. त्यापैकी एक चाळा म्हणजे जनसंघर्ष यात्रा. काँग्रेसच्या या जनसंघर्ष यात्रेचे दुसरे चरण सुरू आहे. (आता पहिले चरण कधी झाले, असे विचारू नका कारण ही यात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपेल याचे कुणालाही सोयरसुतक नाही, आणि त्यामुळे माहिती नाही) असो. मात्र, या निमित्ताने ‘चोराच्या मनात चांदणं आणि काँग्रेसच्या मनात रा. स्व. संघ’ अशी नवी म्हण आता रूढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी भक्ताला भगवंत दिसतो, असे म्हटले जाते तसेच जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी काँग्रेसला रा. स्व. संघ दिसत आहे. तर या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान फैजपूर येथे काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे आपल्या खास कानडी खर्जातल्या आवाजात म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी रा. स्व. संघाचे कुत्रे तरी मेले का?” मुळात कुठल्याही विषयावर अभ्यास, चिंतन न करता उचलली जीभ लावली टाळ्याला असेच सदासर्वकाळ धोरण असलेल्या आणि ते धोरण अतिमूर्खपणाने इमानेइतबारे राबविणाऱ्यांमध्ये काँग्रेसनेत्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गेंनी हे असे कुत्र्याबित्र्याचा उल्लेख करण्याआधी रा. स्व. संघाच्या निर्मितीचा काळ, रा. स्व. संघाचे उद्दिष्ट, ध्येय आणि कार्य याचा अभ्यास दूषित पूर्वग्रहीत मनाने जरी केला असता तरी त्यांना कळले असते की, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा रा. स्व. संघाच्या स्थापनेला जेमतेम २२ वर्षे झाली असतील. त्यावेळची सामाजिक चळवळ, १९४२ सालची चले जाव चळवळ वगैरे या आंदोलनामध्ये रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सहभागी होतेच. मात्र, आजही कसोशीने रा. स्व. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने जपलेली प्रसिद्धी पराङ्मुखता, प्रसिद्धीपासून दूर राहण्याची वृत्ती ही त्यावेळीही तशीच होती. ‘मी केले, मी केले’, म्हणून फुशारकी मारण्याची पद्धत आजही जागतिकीकरणाच्या प्रचारप्रसिद्धीयुगातही रा. स्व. संघामध्ये नाही आणि तेव्हाही ती नव्हती. ‘बोला हवे ते, मला काय त्याचे, पुरे जाणितो मीच माझे बल’, या उक्तीने रा. स्व. संघ स्वातंत्र्यपूर्व काळातही कार्यरत होता आणि आजही आहे. मात्र, मल्लिकार्जुन यांनी विचार करावा, स्वातंत्र्यपूर्व काळातली काँग्रेस आजही तीच आहे का? तुम बदल गये हो..
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0