शासकीय कार्यालयांनी करावा ई-मार्केटप्लेस पोर्टलचा वापर

06 Oct 2018 22:01:37



ठाणे: ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्मेंटई-मार्केटप्लेस या पोर्टलचा उपयोग करावा. यामुळे सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील आणि कामांना गती मिळेल, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरयांनी व्यक्त केले. ते वागळे इस्टेट येथे टीएमए हाऊसमध्ये आयोजित शासकीय अधिकारी व पुरवठादारांना संबोधित करीत होते. या वेब पोर्टलचा जास्तीत जास्त वापर ठाण्यातील कार्यालयांनी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

 

जिल्हाधिकारी मार्गदर्शनात म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने ईझ ऑफ डुईंग बिझनेसचा अवलंब केला आहे, त्यामुळे उद्योग-व्यवसायातील प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. गव्हर्मेंट ई मार्केटप्लेस हा त्याचाच एक भाग असून पूर्वीच्या तुलनेत सध्याची ही खरेदी प्रक्रिया लवचिक, पारदर्शी बनली आहे. खरेदी मग ती घरची असो किंवा कार्यालयासाठी करण्यात येणारी असो, त्यात काहीना काही अडचणी असतात.

 

कार्यालयाच्या बाबतीत निविदा प्रक्रिया, अति व शर्ती, देयके मंजूर होण्यात विलंब असे अनेक कारणे असतात, कितीही चांगल्या कारणासाठी एखाद्या गोष्टीची खरेदी होत असली तरी एकूणच त्याविषयी उलटसुलट सांगितले जात असल्याने कुणालाच आपल्या कारकिर्दीत कुठलीही खरेदी नको असे वाटत असते. अशा वेळी पुरवठादरांसाठीसुद्धा जिकिरीची परिस्थिती बनते. मात्र, या नव्या प्रणालीत मानवी हस्तक्षेपही कमी करण्यात आलेला असून पुरवठादारांनादेखील १० दिवसांत त्यांचे देयक मिळालेच पाहिजे, अशी अट असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठीची पोर्टलवरील नोंदणी अतिशय साधी, सोपी असून आपल्याला दर्जेदार उत्पादने, चांगल्या सेवा अधिक पर्यायांसह या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे त्याचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 

५ लाख १३ हजारांवर वस्तू पोर्टलवर

 

गेल्या वर्षी १ लाख १३ हजार वस्तू या पोर्टलवर नोंदविलेल्या होत्या. यंदा हा आकडा ५ लाख १३ हजारांवर गेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी केवळ १७ सेवा यावर होत्या, त्या आता १ लाख ४६ हजार ९५० इतक्या झाल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0