‘ती’ अपघातग्रस्त बस अंबेनळी घाटातून काढण्यात आली

06 Oct 2018 15:44:35

 


 
 
 
रायगड : दोन महिन्यांपूर्वी अंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. २८ जुलै २०१८ रोजी या बसला अपघात झाला होता. अंबेनळी घाटात ७०० ते ८०० फूट खोल दरीत ही बस कोसळली होती. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही बस दरीतून काढण्यात आली. ही बस दरीतून काढण्यासाठी महाबळेश्वर ते पोलादपूर हा मार्ग आज ८ तासांसाठी बंद करण्यात आला होता.
 

या बसमधील कृषीविद्यापीठाचे ३० कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. ही बस दरीतून बाहेर काढल्यामुळे पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी या अपघातातून बचावले होते. या बसचे वाहनचालक दोनवेळा बदलण्यात आले होते. बस चांगल्या स्थितीत होती. अपघाताच्यावेळी प्रशांत भांबिड हे बस चालवत होते. असे प्रकाश सावंत देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीला सांगितले. परंतु प्रकाश सावंत देसाई हेच अपघाताच्यावेळी बस चालवत होते असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणीही मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. ही अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात आल्याने बसच्या स्टेअरिंगचे ठसे घेण्यात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0