भारताची ‘समुद्रमैत्री’

    दिनांक  04-Oct-2018   शेजाऱ्याला मदत करणे, हा भारताचा आपद्धर्म. त्यामागे कुठलीही सुप्त इच्छा नाही की उलट मागणी नाही. मदतीचा आव आणण्याचा तर अजिबात प्रश्नच नाही. त्यामुळे भारताने केलेल्या कुठल्याही प्रकारच्या मदतीकडे कधीही कुठल्याही देशाने संशयाच्या नजरेने बघितलेले आठवत नाही.

 

आशियायी आणि भारतीय उपखंडात भारताची पूर्वीपासूनच भूमिका मोठ्या भावासारखी राहिली आहे. परंतु, असे असले तरी अमेरिकेसारखा ‘बिग ब्रदरपणा’ मात्र भारताने कधीही कुठल्या राष्ट्रावर लादला नाही की विनाकारण कुठल्याही देशामध्ये ढवळाढवळ केली नाही. आपत्कालीन परिस्थितीत तर भारत नेहमी आपल्या शेजारी देशांसाठी धावून गेला. नैसर्गिक आपत्तीत त्याने गरजू राष्ट्रांना मदतीचा वेळोवेळी हात दिला. हा खरंतर कुठल्याही परराष्ट्र धोरणाचा, त्या देशासोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठीचा मुद्दाम केलेला प्रयत्न नाही, तर हे परोपकारी भारतीय संस्कृतीचे द्योतकच म्हणावे लागेल. शेजाऱ्याला मदत करणे, हा भारताचा आपद्धर्म. त्यामागे कुठलीही सुप्त इच्छा नाही की उलट मागणी नाही. मदतीचा आव आणण्याचा तर अजिबात प्रश्नच नाही. त्यामुळे भारताने केलेल्या कुठल्याही प्रकारच्या मदतीकडे कधीही कुठल्याही देशाने संशयाच्या नजरेने बघितलेले आठवत नाही. जम्मू-काश्मीरमधील पूरपरिस्थितीवेळचा तडाखा पाकिस्तानलाही बसला होता. तेव्हाही पाकिस्तान शत्रूराष्ट्र असून आपण मदतीची परोपकारी भावना का दाखवावी, असा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही आणि संपूर्ण सहकार्याची तयारी दर्शविली. पण, मुजोर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे ती नाकारली. परंतु, भारताने आपला शेजारधर्म निभावला. नेपाळ भूकंपाच्या वेळीही बहुतांश बचावकार्यात भारतीय सैन्यदलाने मोलाची भूमिका बजावली होती. अगदी भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्यांना ढिगाऱ्याखालून काढण्यापासून ते त्यांना अन्न, वस्त्र, निवारा देण्यापर्यंत भारताने नेपाळला सर्वतोपरी मदत केली. आज तसाच मदतीचा हात भारताने इंडोनेशियाला दिला. कारण, इंडोनेशियातील भूकंप, त्सुनामीमुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर असून आता बचावकार्यानेही वेग घेतला आहे.

 

इंडोनेशियाला मदतीसाठी भारताने खास ‘समुद्रमैत्री’ नावाची मोहीम राबविली आहे. या बचावमोहिमेअंतर्गत भारताने दोन विमाने आणि तीन जहाजे सर्व आपत्कालीन सामुग्रीसह रवाना केली आहेत. इंडोनेशियाने आंतरराष्ट्रीय मदतीचा स्वीकार करण्याची तयारी दाखविल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि बुधवारीऑपरेशन समुद्रमैत्री’ची सुरुवात झाली. सी-१३० जे आणि सी-१७ ही दोन विमाने ‘ऑपरेशन समुद्रमैत्री’ अंतर्गत औषधे आणि वैद्यकीय सहायकांसह इंडोनेशियाला पाठविण्यात आली. सी १३०-जे हे विमान वैद्यकीय टीमबरोबर तंबू, गरजूंच्या मदतीसाठी चालतेफिरते रुग्णालयासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू यासह रवाना झाले आहे. सी-१७ विमानात औषधे, जनरेटर्स, तंबू, पाण्याच्या बाटल्या या मदतसामुग्रीचा समावेश करण्यात आला आहे.‘आयएनएस टीर’, ‘आयएनएस सुजाता’, ‘आयएनएस शार्दुल’ ही जहाजेही नौदलाकडून मदतीसाठी रवाना करण्यात आली आहे. ही जहाजे इंडोनेशियाला ६ ऑक्टोबरपर्यंत पोहोचून बचावकार्यासाठी इंडोनेशिया सरकारला मदत करतील.

 

आधी भूकंप आणि त्सुनामीचा इंडोनेशियाला जोरदार तडाखा बसला. ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. मृतांची संख्या ही आजवर १४००च्या घरात पोहोचली आहे, तर हजारो लोक जखमी आणि बेघर झाले आहेत. भारतासह इतरही देशांतून इंडोनेशियाच्या भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. गेल्या शुक्रवारी उसळलेल्या २० फूट त्सुनामीच्या महाकाय लाटांनी पालू या इंडोनेशियातील छोट्या शहराचा नकाशाच पार बदलून टाकला. अजूनही शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली असून इंडोनेशिया सरकारचे बचावकार्य मात्र अपुरे पडत आहे. भूकंप आणि त्सुनामीमुळे दूरसंचार सेवाही बारगळली असून अन्नधान्याचा पुरवठाही ठप्प झाला आहे. एकूणच या नैसर्गिक आपत्तीमुळे इंडोनेशियाला मोठ्या जीवितहानी आणि वित्तहानीचा सामना करावा लागला. पण, जसं नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ पुरस्कार स्वीकारताना उचित शब्दांत म्हणाले तसे, “निसर्गाचा मान राखला, तर पंचतत्त्वांशी मिळतेजुळते घेणे सोपे जाईल.” म्हणूनच, सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन पर्यावरण संरक्षणाला अधिक गांभीर्याने घ्यायला हवेच. पण, भूकंप-त्सुनामीची धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी विकसित, तंत्रकुशल राष्ट्रांनी पुढाकार घ्यायलाच हवा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/