आवश्यकता निकालांची

    दिनांक  04-Oct-2018   

 


 
 
 
आजच्या काळात सरकारी नोकरी प्राप्त करणे, ही प्रत्येक तरुणाची मनस्वी मनीषा. त्यासाठी भरमसाट शुल्क भरून तरुण विविधांगी मार्गदर्शन वर्गांना प्रवेश घेत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. आशेने आणि महत्त्वाकांक्षेने हे तरुण रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. या तयारीदरम्यान ते आपले आयुष्य पणाला लावतात. काही तर सुस्थापित नोकरी सोडून या मृगजळाच्या मागे धावतानाचे चित्र समाजात आज पाहावयास मिळते. मात्र, परीक्षा होत असल्या तरी या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा कायम करावी लागते, हे विदारक वास्तव आहे. शिक्षणसेवक म्हणून कार्य करण्यासाठीदेखील आजमितीस शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीइटी’ या स्पर्धापरीक्षेच्या कमानीतून भावी शिक्षकांना जावे लागते. अशा परीक्षा पात्रता तपासण्याकामी आवश्यक आहेतच. मात्र, त्यांचे सुनियोजन असणे, हे उमेदवारांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तब्बल अडीच महिन्यानंतर ‘टीइटी’चा निकाल जाहीर केला. हा निकाल अंतिम निकाल नाही, तर या निकालाच्या अनुषंगाने विविध हरकती अजून दाखल होणे बाकी आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम निकाल प्राप्त होणार आहे. १५ जुलै २०१८ रोजी सदरची परीक्षा घेण्यात आली होती.त्यानुसार आणि नियमानुसार ऑगस्ट महिनाअखेरीपर्यंत या परीक्षेचा निकाल अपेक्षित होता. मात्र, त्यासाठी १ ऑक्टोबर तारीख उजाडावी लागली. तसेच परीक्षा नियोजन आणि प्रश्नपत्रिकेतील चुका याचे वाण विद्यार्थ्यांच्या ठायी यापूर्वीच परिषदेने वाढून ठेवले आहे. तसे पाहिले तर शिक्षणक्षेत्र हे अनंत अडचणींचा सध्या सामना करत आहे. विविध निर्णयांनी शिक्षण खाते कायमच चेष्टेचा विषय ठरते. या निकाल दिरंगाईमुळे शिक्षण खात्याची पात्रता तपासावी का, हाच प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार आजही बेरोजगार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पवित्र पोर्टल न्यायालयानेच स्थगित केल्याने त्याचे भांडवल होणे स्वाभाविक आहे. मात्र, परिषदेबरोबरच शिक्षणखात्याच्या या भोंगळ कारभाराला आता आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

गोदावरी ते डोयांग

 

असे म्हणतात की, संगीत, जल आणि व्यापार यांना सीमा नसतात. हे तीनही घटक सीमोल्लंघन करून समृद्धतेचा परीसस्पर्श विविध प्रांतांना सदैव करत असतात. किंबहुना, त्यांनी तो करावा, अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे विकासाची वाट सुकर व सुखमय होण्यास मदत होते. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या व्यावसायिकांच्या संस्थेतील नाशिक विभागातील काही उद्योजकांनी नुकताच नागालँड दौरा केला. त्यामुळे गोदावरी ते डोयांग असा व्यवसायवृद्धीचा आलेख यामुळे उंचावणार आहे. नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील व्यापार, उद्योग व व्यापारी संबंध वृद्धिंगत व्हावे, नागालँडमधील तरुणांना, उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे, या उद्देशाने सदर दौऱ्याची आखणी करण्यात आली होती. नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी याकामी पुढाकार घेतला होता. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने नागालँडमधील तरुणांना या प्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच, या दौऱ्यादरम्यान विविध सामंजस्य करार केले गेले. ज्यायोगे बौद्धिक संपदेचे आदानप्रदान करणे सोयीचे ठरणार आहे. राज्यपालांबरोबर राजभवनात झालेल्या भेटीप्रसंगी नागालँडच्या विकासासाठी चर्चादेखील करण्यात आली. नागालँडमध्ये विपुल साधनसामुग्री आहे. त्याचा वापर उद्योगवाढीसाठी व्हावा, अन्नप्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत तसेच नागालँडमधील उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपालांनी चेंबरच्या प्रतिनिधींना केले आहे. त्यामुळे आता नाशिकची प्रतिभा व व्यापार कौशल्याला थेट पूर्वेकडील राज्यांत चालना मिळण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विकसनशील राज्य आहे व नागालँड हे छोटे राज्य आहे. त्यामुळे भौगोलिक परिप्रेक्ष्य जरी कमीअधिक असला तरी, नागा जनतेची कार्यक्षमता वाखाणण्याजोगी आहे, हेच या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला जाणवले. केवळ समृद्ध राज्य आणि जेथे सर्व सोयीसुविधा आहेत, अशी राज्ये, देश हेच व्यापारवृद्धीसाठी आवश्यक असतात किंवा त्यालाच प्राधान्य द्यावे, या दृष्टिकोनाला चेंबरच्या या दौऱ्यामुळे छेद मिळाला आहे. गोदावरी व डोयांगचा संगम हे एक सकारात्मक चिन्ह म्हणावयास हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/