आत्मविश्वास निर्माण करणारी कार्यशाळा

31 Oct 2018 15:07:25



अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ व तांडा प्रकल्प ऊछढ संसाधन केंद्र (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजातील ३०० कार्यकर्त्यांची एकदिवसीय ‘कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा’ दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून ३०० स्त्री-पुरुष, शिक्षित, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा का आयोजित करण्यात आली? तरी राईनपाड्याच्या त्या घटनेनंतर नाथपंथी डवरी गोसावी समाजामध्ये कमालीची अस्वस्थता, भीती निर्माण झाली होती. समाजामध्ये पुन्हा आत्मविश्वास कसा निर्माण होऊ शकेल? असा विचार आम्ही केला. कायदा-सुव्यवस्था, हे राज्यघटनेद्वारा चालणारे शासन प्रशासन हे आपले आहे, याची त्यातूनच मग समाजाला जाणीव करून देणे गरजेचे होते. त्यासाठी एक जाणीव जागृती कार्यक्रम घ्यायचा होता. या अभ्यास शिबिरासाठी कोण मदत करू शकतो, याचा आम्ही वेध घेऊ लागलो. त्यावेळी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थाही तांडा विकास प्रकल्प उपक्रमांतर्गत असे अभ्यास शिबीर आयोजित करू शकते, ही माहिती मिळाली. त्यानुसार, या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विषयसूचीही अशीच करण्यात आली की, ज्याद्वारे समाजाच्या प्रतिनिधींना आपल्या हक्कांची, कर्तव्यांची माहिती मिळेल. समाज धर्म आणि संस्कृतीला मानणारा आहे. प्राण गेला तरी हिंदू धर्म सोडणार नाही, याच सूत्रात या समाजाची बांधिलकी आहे. समाजाचे उत्थान होणे, गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या कार्यशाळेला समाजाने उदंड प्रतिसाद दिला.अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ भरतकुमार तांबिले सांगत होते.

 

भरतकुमार तांबिले आणि संस्थेच्या इतर पदाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेविषयी माहिती मिळाली. त्यानुसार सुरुवातीला समाजातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्याच बरोबर प्रतिष्ठित लोकांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. भरतकुमार तंबिले यांनी थोडक्यात व महत्त्वपूर्ण प्रास्ताविक केले. भारत वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. भारतीय राज्य घटनेची माहिती दिली व समाजातील कार्यकर्त्यांनी राज्यघटना वाचावी, यासाठी त्यांना राज्यघटनेच्या प्रती भेट देण्याचे वचन दिले. यानंतर बाळकृष्ण रेणके यांनी समाजाला संबोधित केले. वाऱ्याप्रमाणे विखुरलेल्या समाज जेव्हा एक होतो, तेव्हा प्रस्थापित समाज हे भटके संघटित होऊ नये, म्हणून प्रयत्न करतो. अशातच या भटक्यांच्या शेकडो संघटना वेगवेगळ्या गटागटांत विभागल्या जातात. परिणामी, शासन दरबारी आपला वचक राहत नाही, त्यामुळे आपण एक होणं गरजेचं आहे, आपण एक होऊया,” असे आवाहन केले. माधव कांबळे यांनी अत्यंत पोटतिडकीने ‘संघटना बांधणी’ यावर व्याख्यान दिले. त्यांना कुणबी समाज संघटनेच्या वेळी आलेला अनुभव यावेळी कथन केला. सुनील भडेकर यांनी जमिनीच्या प्रश्नांवर सविस्तर व्याख्यान दिले. आपला २०० वर्षांपूर्वीचा इतिहास कसा शोधावा, ७/१२ व ८ड कसा शोधावा, याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सुरेश सावंत यांनी भारतीय राज्यघटना व तिची उद्देशिका स्पष्ट करून सांगितली. राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे व ती समजून घेण्याची पद्धतीच त्यांनी थोडक्यात विशद केली. त्याचबरोबर लोकशाहीत आंदोलनाचे महत्त्वही समजाविले.

 

मच्छिंद्र चव्हाण यांनी ‘पोलीस प्रशासन, मानवी हक्क व अधिकार, न्यायालय, कारागृह’ या विषयी समाजाच्या मनातील पारंपरिक भीती व त्यावरील उपाय याविषयी उद्बोधक व्याख्यान दिले. स्त्रियांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयीच्या कायद्याच्या चौकटी समजावून सांगितल्या. केशव कोरगावकर यांनी माणसांच्या व्यक्तिमत्वात कशा सुधारणा कराव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय तलकोकुल यांनी अगदी थोडक्यात भटक्यांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अमरनाथ इंगोले यांनी केले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण हे दिवसभर उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढवित होते. सर्व पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले व कार्यशाळेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच रेखाताई चव्हाण, डॉ. नारायण भोसले, शिवनाथ शिंदे, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. कालिदास शिंदे, भरत चौगुले, गोरख इंगोले, अनिल चौगुले, शिवनाथ चव्हाण, विश्वनाथ जगताप, विनोद चौगुले, संतोष चौगुले, सचिन जगताप, सुनील इंगोले यांची विशेष उपस्थित होते. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे मुंबई संघाचे अनिल चौगुले व सर्व पदाधिकारी यांनी सर्व आमंत्रितांची सेवा करून बॅनर लावण्यापासून ते कार्यक्रम संपल्यानंतरही थांबून कार्यक्रम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0