नक्षलींचा भ्याड हल्ला; पत्रकारासह दोन पोलीस शहीद

30 Oct 2018 14:55:50



दंतेवाडाच्या अरनपूर भागातील घटना


छत्तीसगढ : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून दूरदर्शन वाहिनीच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. अच्यूतानंद साहू असे या पत्रकाराचे नाव असून ते दूरदर्शनवाहीनीसाठी कॅमेरामन म्हणून कार्यरत होते.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दंतेवाडाच्या अरनपूर भागात जिल्हा पोलिस दलाचे एक पथक शोध मोहिमेसाठी जात होते. त्यावेळी या पथकासोबत दूरदर्शनवाहीनीचे तीन पत्रकार होते. पोलिसांची शोधमोहीम चालू असताना अचानक नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात साहू यांच्यासह दोन पोलीस शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या पोलिसांमध्ये उपनिरीक्षक रुद्रप्रताप, सहायक कॉन्स्टेबल मंगलू यांचा समावेश आहे.

 

अशाच प्रकारचा हल्ला मागील शनिवारी छत्तीसगढच्या विजापूर जिल्ह्यात झाला होता. यात चार जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, छत्तीसगडमधील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0