धोनीशिवाय सारंच कठीण...

    दिनांक  30-Oct-2018   

 


 
 
बदल हा काळाचा नियम आहे, असं म्हणतात. पण, बदल हा इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो. असाच काहीसा खेळ सुरू आहे भारतीय क्रिकेट संघात. भारतीय संघाने विंडीज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ केला खरा, पण याव्यतिरिक्त क्रिकेटप्रेमींचं सगळं लक्ष हे मैदानाबाहेर होतं. कारण, गेल्या काही दिवसांत बीसीसीआयने काही असे खेळ केले की, जंगलातील राजालाच जंगलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. हा जंगलाचा राजा म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आगामी विंडीज व ऑस्ट्रेलिया टी-२० दौऱ्यात बीसीसीआयच्या निवड समितीने धोनीला हळूच संघातून वगळलं आणि त्याला विश्रांतीची गरज आहे, असं सांगून स्वत: बाजूला झाले आणि या पापाचे धनी केले ते रोहित आणि विराटला. मुळात धोनीला संघातून वगळणे, हा निर्णय निवड समितीच्या हातात असतो, मात्र आता धोनीची अडचण वाटायला लागली आहे की काय? असा सवाल सुनील गावसकर यांनीच केला. आजही धोनी तेवढाच कूल आणि संयमी खेळाडू आहे, त्यामुळे त्याची खरंतर गरज भारतीय संघाला आहे. विराट कितीही चांगला फलंदाज असला तरी, धोनीच्या मार्गदर्शनाशिवाय २०१९ चा विश्वचषक जिंकणं भारतीय संघासाठी कठीण असेल. त्यामुळे धोनीपेक्षा भारतीय संघालाच धोनीची जास्त गरज असल्याचे चित्र सध्या दिसते. मग त्यात क्षेत्ररक्षणातले बदल असो की, गोलंदाजांना यष्टींमागून सल्ले देणे असो आणि डीआरएसचे निर्णय घेणे, या सर्व गोष्टींकरिता विराटला धोनीची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नाही. संघात नवीन खेळाडूंचा होणारा भरणा यामुळे याआधीही बीसीसीआयला क्रिकेटप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला होता, मात्र, यावेळी धोनीबाबत घेतलेले हे निर्णय नक्कीच कसले तरी संकेत असावेत. पण, दुसऱ्या बाजूने या निर्णयाचा विचार केल्यास धोनीने नेहमीच नवीन खेळाडूंना संधी दिल्या आहेत, मग त्यात सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांसारखे अनेक खेळाडू आहेत. असे असले तरी, धोनीसुद्धा आपल्या कर्णधारपदाच्या सुरुवातीला संघातून वरिष्ठ खेळाडूंना वगळल्यामुळे चर्चेत आला होता, त्यावेळीसुद्धा हे खेळाडू ‘फिट’ नाहीत अशी कारणं धोनीनेच दिली होती, याआधी त्यानेच घेतलेले निर्णय आता त्यालाच महागात पडत आहेत. त्यामुळे जे पेरलंय तेच उगवतंय, ही युक्ती याबाबतीत लागू पडते.
 

क्रिकेटच्या ‘धाकड गर्ल्स’

 

भारतीय पुरुष संघाने सुरू केलेली विजयाची घोडदौड पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सध्या महिला संघावर आहे. नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या महिला ‘टी-२०’ विश्वचषकासाठी फलंदाजांची क्रमवारी, जोड्या याबाबत विविध पर्याय पडताळून महिला संघाकडे तयार आहेत. यावरून पूर्वतयारी झाली असून आता नजर फक्त विश्वचषकाकडेच. सध्याच्या यंग महिला संघाची खासियत या सगळ्या मुली निर्भीड आहेत, सरावात आपला सगळा जोर लावतात, फिटनेसही कटाक्षाने चोख पाळतायत. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन याआधीच दाखवले आहे. त्यामुळे स्मृती मंदाना, पूनम राऊत यांसारख्या तरुण खेळाडूंनी न डगमगता किंवा कोलमडता या विश्वचषकात खेळण्यासाठी तयार असल्याचे चित्र ऑस्टे्रलियासोबत झालेल्या रंगीत तालमीत दिसून आले. भारतीय महिला संघाचा रंगीत तालमीतील खेळ पाहता, विश्वचषकाच्या खेळातही त्यांचा खेळ तेवढ्याच ताकदीचा असेल, यात काही वाद नाही. कारण, भारताच्या या महिला संघाला रमेश पोवार हे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्यावर ही जबाबदारी टाकल्यानंतरही बरेच वादविवाद झाले खरे, पण भारतीय संघाचा ऑफस्पिनर आणि मुंबईचा ‘खडूस’ क्रिकेटपटू एक चांगला प्रशिक्षक बनेल, हे सराव सामन्यात दिसलेच. या विश्वचषकात जर भारतीय महिला संघाला जिंकायचे असेल तर, दडपणाच्या स्थितीत सरस खेळ करण्यावर भर देण्याची खरी गरज आहे, कारण, गेल्यावर्षी २३ जुलै २०१७ ला पार पडलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दडपणामुळेच भारताचे जगज्जेतेपद हुकले. त्यामुळे आता जर विजयाला गवसणी घालायची असेल, तर २०१७ मध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी महिला संघाला घ्यावी लागेल. त्याचबरोबर फलंदाजीच्या क्रमवारीतही लवचिकता असणे गरजेचे आहे. सध्या कर्णधार हरमनप्रीत, आघाडीची फलंदाज स्मृती आणि पूनम या आपला उत्तम खेळ करण्यास तयार असल्या तरी विजयासाठी गोलंदाजीवरही तेवढीच मदार असेल. एकूणच या धाकड गर्ल्स यावेळी विश्वचषक घरी आणतीलच...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/