सावध ऐका, पुढल्या हाका!

    दिनांक  30-Oct-2018   वन्यजीवांची घटणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, वन्यजीव असे नामशेष होत गेले, तर अन्नसाखळी पूर्णत: कोलमडून पडेल, ज्याचे सर्वाधिक दुष्परिणाम आधी वृक्षांवर आणि कालांतराने अवघ्या मानवजातीला भोगावे लागतील.

 

पर्यावरण संरक्षणाच्या आणि संवर्धनाच्या पूर्वीपेक्षा अधिक चर्चा हल्ली झडताना दिसतात. त्याला अनेक जागतिक संस्थांच्या अहवालांचा, आकडेवारीचाही आधार असतोच. म्हणजे, पर्यावरणाबाबत जितकी उदासीनता मागील दोन-तीन दशकांपूर्वी होती, तशी स्थिती आज नाही. मानवी स्वार्थासाठीच का होईना, पर्यावरणाची महती बहुतांश देशांनी मान्य केली असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. जसे की, पुढील काही वर्षांत फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांनी पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधन स्रोतांचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे ‘ग्रीन एनर्जी’च्या परिपूर्णतेकडे वाटचालही सुरू केली आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरण रक्षणाकडे आपण वळलो असलो तरी यापूर्वी झालेली पर्यावरण-वन्यजीवांची हानी आपण भरून काढू शकत नाही, हेही तितकेच खरे. त्यातच जागतिक तापमानवाढीच्या दिवसागणिक वाढत्या वेगाने केवळ भारतातच नाही, तर इतरही देशांना नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे कार्बन वायू उत्सर्जन कमी करून ही तापमानवाढ रोखण्याचे मोठे आव्हान आज विकसित तसेच विकसनशील देशांसमोरही आ वासून उभे आहेच. कारण, जागतिक तापमानवाढीने १.५ ते २ अंश सेल्सिअसचा पारा पार केल्यास यापेक्षाही भीषण परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते, याचे भाकीत आधीच शास्त्रज्ञांनी वर्तविले असून विनाशाच्या दिशेने जगाची वाटचाल सुरू झाल्याची धोक्याची घंटाही त्यांनी वाजवली आहेच.

 

पण, हा विषय केवळ मानवी संबंध आणि पर्यावरण एवढ्यापुरता मर्यादित नाही. पर्यावरणाचा विचार करता, त्यामध्ये केवळ वृक्षांचा नाही, तर वन्यजीवांचाही साक्षेपाने विचार होतोच. कारण, पर्यावरणाचे चक्र हे वन्यजीवांच्या अस्तित्वावरदेखील तितकेच अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा विचार करताना केवळ वृक्षसंपदा, पर्जन्यमान, समुद्राची पातळी एवढाच मर्यादित विचार पुरेसा नाही. त्यात वन्यजीवांच्या संरक्षणाचीही हमी हवीच. कारण, जागतिक वन्यजीव निधी अर्थात ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ने यासंबंधीची एक धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. वन्यजीवरक्षणासाठी काम करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ‘लिव्हिंग प्लॅनेट’ नामक नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, १९७० ते २०१४ या ४४ वर्षांत तब्बल ६० टक्के वन्यजीवांची लोकसंख्या केवळ मानवी हस्तक्षेपामुळे घटली आहे. यामध्ये मासे, सस्तन प्राणी, सरपटणारे जीव अशा सगळ्या पशुपक्ष्यांचा समावेश आहे. वजन किंवा बायोमासच्या दृष्टीने विचार करता, पृथ्वीवर ३६ टक्के माणसे, ६० टक्के दुभदुभते व पाळीव प्राणी आणि केवळ चार टक्के वन्यजीव श्वास घेतात. पण, दहा हजार वर्षांपूर्वी साहजिकच हे गुणोत्तर याच्या अगदी विरुद्ध होते. पण, वन्यजीवांची संख्या घटण्याचा आणि काही प्रजाती नामशेष होण्याचा वेग हा गेल्या काहीशे वर्षांच्या वेगापेक्षा १०० ते १०००० पटीने जास्त असल्याची धक्कादायक बाब या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर याचे सर्वाधिक दृश्य परिणाम द. अमेरिका खंडात आज स्पष्ट दिसून येतात. कारण, १९७० ते २०१४ याच ४४ वर्षांच्या काळात द. अमेरिकेतील ९० टक्के वन्यजीव संपुष्टात आले. याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे, वनक्षेत्रातील मानवी बेदरकरार हस्तक्षेप, अनिर्बंध शिकारी आणि मानवी हव्यासापोटी वन्यजीवांच्या अवयवांचा वापर. जमिनीवरील, जंगलातील वन्यजीवांबरोबरच जलचरांनाही आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. कारण, याच ४४ वर्षांच्या काळात गोड्या पाण्यातील जलचरांची संख्याही ८० टक्क्याने घटल्याचे हा अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

 

वन्यजीवांची घटणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, वन्यजीव असे नामशेष होत गेले, तर अन्नसाखळी पूर्णत: कोलमडून पडेल, ज्याचे सर्वाधिक दुष्परिणाम आधी वृक्षांवर आणि कालांतराने अवघ्या मानवजातीला भोगावे लागतील. त्यामुळे २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जैवविविधता परिषदेत या विषयाचे सखोल चिंतन, मनन करून त्यावरील उपाययोजनांचा जागतिक स्तरावर विचारविमर्श होईलच, पण तोपर्यंत पर्यावरणाला, वन्यजीवांना हानी पोहोचेल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही, यासाठी आपण कटिबद्ध असावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/