उत्तरप्रदेशातले ‘राशोमान’

    दिनांक  03-Oct-2018   
एखादी घडना घडत असते. ती नुसतीच घटना असते. ती वाईट असते, चांगली असते. ते पाप असते किंवा पुण्य असते. ते ज्या व्यक्तीच्या वाट्याला येते, ते ती कशी पाहते, त्याचे पर्यावरण काय, ती कुठल्या संस्कृतीत, संस्कारात वाढली आहे त्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे घटना केवळ घटना असते. त्याला कुठला टोन लावायचा, ग्रे टोन की आणखी कुठला आनंददायी, ते त्या घटनेच्या साक्षीदारावर अवलंबून असते. साक्षीदार या शब्दात ‘साक्ष’ यात अक्ष म्हणजे डोळा/डोळे अपेक्षित आहे. मात्र, साक्षीभावाने त्या घटनेकडे पाहण्याची कुवतही तिच्यात असली पाहिजे. डोळे केवळ ती घटना दाखविते. मेंदू आणि मन त्याचे विश्लेषण करत असते. ते मग व्यक्तिपरत्वे बदलत असते. बदलू शकते. बदलावे... कारण ते नैसर्गिक आहे. घटना अशी प्रक्षिप्त होत जात असते. पार्थिव डोळ्यांनी ती घटना पाहणार्या व्यक्तीचे आयुष्य कसे प्रवाहित झाले आहे, तिचा भूगोल, संस्कृती, विचार, शिक्षण, आर्थिक स्तर, तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सार्यांवर त्या घटनेचा अर्थ लावण्याचे त्याचे मैदान तयार होत असते. कुत्रा पाळायचा की कोंबड्या, बकर्या, हे व्यक्तीच्या आर्थिक आणि भौगोलिक स्तरावर ठरते, अगदी तसेच.
एका नाट्य प्रशिक्षण शिबिरात रंगमंचीय व्यायाम घेण्यात आला. रतन थिय्यम (आता ज्यांचा थिएटरशी संबंध नाही त्यांना रतन थिय्यम कोण, असा प्रश्न पडू शकतो आणि ज्यांचा नाटकांशी संबंध आहे त्यांची प्रतिक्रिया, ‘‘बापरे! रतन थिय्यम!’’ अशी असू शकते. जसे घटनेचे तसेच व्यक्तीचेही.) तर रतन थिय्यम यांनी तो एक्सरसाईज घेतला होता. चाळीसेक प्रशिक्षणार्थी होते. त्यांनी सगळ्यांना आधी सभागृहाच्या बाहेर जायला सांगितले. त्यानंतर दोघांना आत बोलावले. त्यातल्या एकाला त्यांनी मूकअभिनय (माईम) करायला लावला. दुसर्याने तो बघायचा होता आणि मग त्याने तो, त्याला जे काय कळले त्यानुसार त्याची सहीसही नक्कल मारायची होती. अर्थात, ती तिसर्याने आत येऊन बघायची आणि मग त्याने त्याला ते जे काय जसे कळले तसे ते आत आलेल्या चौथ्यासमोर करायचे होते. मग ‘अ’ ने एक क्रिया केली. ‘ब’ ने ती पाहिली आणि ती मग आत बोलावण्यात आलेल्या ‘क’ समोर केली. क ने ती नंतर आत आलेल्या ‘ड’ समोर केली. ‘ब’ ती क्रिया करताना ‘ड’ ने पाहिलेली नव्हती. त्यामुळे अखेरच्या ‘ज्ञ’ला ‘अ’ ने काय केले हे माहीत नव्हते. हे असे पूर्ण चाळीस जणांनी केल्यावर पुन्हा ‘अ’ला तीच क्रिया करायला लावली गेली. ‘अ’ने बॉलिंग टाकली होती. म्हणजे त्याने रनअप मार्क केला. मग गोलंदाज चेंडू हातात घेऊन वार्मअप करतो तसे केले अन् धावत जाऊन चेंडू फेकला. चाळिसाव्या प्रशिक्षणार्थ्याने कपडे धुतले, ते पिळले आणि दोरीवर वाळत टाकले... घटना कशी प्रक्षिप्त होत जाते त्याचे हे उत्तम उदाहरण होते. त्यामुळे घटनेकडे साक्षीभावाने कसे पाहायचे, ते या रंगमंचीय व्यायामाने दाखवून दिले होते...
 
हे असेच होते. त्यामुळे घटना जो पाहतो त्याच्या नजरेने तयार होत असते. आतावर रंगमंचीय अवकाशात घटना द्विमिती दाखविण्यात येत होती. अकिरा कुरोसोवा यांनी घटनेला खूप कोन असू शकतात, हे ‘राशोमान’मध्ये दाखविले. अर्थात त्याचे सारेच श्रेय कथालेखक रीनोसुके अकुटागवा यांना जाते. हा खूपच अफलातून माणूस. जपानी लघुकथेचा पितामह मानतात त्याला! अत्यंत लहान कथेतून खूप मोठे सूत्र मांडण्याची ताकद त्यांच्यात होती. म्हणूनच की काय, वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्यांनी आत्महत्या करून आयुष्य संपविले. आयुष्य हीदेखील एक कहाणी आहे आणि तिचा यथार्थ सांगण्यासाठी शंभर वर्षे कशाला हवीत, असेच त्यांनी मूकपणे केलेल्या आत्महत्येने त्यांना सांगायचे असावे. भारतात सादत हसन मंटोने तशा कथा लिहिल्या. गुलजार यांच्याही ‘रावी पार’मधल्या कथा त्याच वळणावर जाणार्या आहेत.
भौतिक घटनांच्या गाभ्यात खूप मोठा आशय अव्यक्ताच्या पातळीवर प्रवाहित करण्याची ताकद या कथांमध्ये आहे. तर राशोमानची कथा थोडक्यात अशी- जंगलातून एक सैनिक त्याच्या बायकोसोबत जात असतो. आता सैनिक आहे म्हणजे तो तरुण आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही अन् त्याची बायकोही तरुणच असणार! त्यांना वाटेत एक दरोडेखोर अडवितो. तो सैनिकाला गोळी घालून ठार करतो आणि त्याच्या बायकोवर अत्याचार करतो. ही घटना एक लाकूडतोड्या पाहतो. आता हा खटला न्यालालयात उभा राहतो. ती पीडित स्त्री तिच्या दृष्टिकोनातून ती घटना सांगते. अगदी त्याच्याविरुद्ध तो खुनी- बलात्कारी सांगतो आणि प्रत्यक्षदर्शी (साक्षीदार नाहीच. कारण तो साक्षीभावाने ती घटना पाहात नाहीच कधी) लाकूडतोड्या तीच घटना अत्यंत वेगळ्या आयामाने सांगतो. तिघांचेही अगदीच सत्य वाटते. गोंधळच! मग प्लँचेट केले जाते आणि त्या सैनिकालाच बोलावले जाते. तो आणखीच वेगळे सूत्र मांडतो...! सत्य काय? न्याय कशावर करायचा? एकुणात काय की, घटना केवळ घटना असते. ओल्या मातीचा गोळा असतो. प्रत्येक जण त्याच्या आकलन आणि क्षमतेनुसार त्याची मूर्ती घडवीत असतो. घटना नेहमी अमूर्तच असते...
आता काळ बदलला आहे. तरीही ज्या काय घटना घडतात त्या काही अकल्पित अशा नसतातच. त्या पहिल्यांदाच घडल्या, असेही नसते. उत्तरप्रदेशात लखनौ शहराच्या अत्यंत उच्चभ्रूंच्या वसतीत, उत्तररात्री प्रशांत चौधरी या पोलिस शिपायाने विवेक तिवारी, या अॅपलच्या अधिकार्याला गोळी घालून ठार केले. त्या वेळी त्याच्यासोबत त्याची एक तरुण महिला सहकारी होती. त्यावरून देशाचे राजकारण हलून गेले आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले. कुठलीही घटना घडते तेव्हा तिथे सरकार असतेच असे नाही. पोलिस हा सरकारी रक्षणकर्ता असला, तरीही खून करणारा शिपाई ते करत असताना काही ‘सरकारी’ माणूस नव्हता. ती तरुणी सोबत असल्याने यौनसंबंधांचे धागे या घटनेत गुंफले जात आहेत. ‘डान्सिंग कार’चा मामला आहे, असा आंबट तर्क काढला जात आहे. असेलही, पण त्यामुळे काही एकदम गोळी घालण्याचे कारण नाही. पोलिसाने हटकले असेल अन् मग याने अॅपलवाला असल्याने मुजोरी केली असेल अन् त्यातून घटना घडली, असाही एक तर्क लावला जातो आहे. आरोपी प्रशांत चौधरी याच्या वक्तव्यानुसार, विवेकने त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि मग जीव वाचविण्यासाठी गोळी घालावी लागली. उत्तरप्रदेशच्या पोलिसांनीही आतावर इभ्रत वाचविण्यासाठी हाच कोन उचलून धरला होता. मात्र, आता जवळून गोळी घातली गेली, चौधरी खाली पडलाच नव्हता अन् गोळी वरून घातली गेली आहे, असे शवविच्छेदनात समोर आले आहे. सोबत असलेल्या तरुणीचे स्टेटमेंट अद्याप जाहीर झालेले नाही.
सत्य म्हणून काय बाहेर आणायचे ते व्यवस्था ठरवीत असते. अर्थात त्या तरुणीनेही तिच्या कोनातून ही घटना पाहिली असेल आणि आकलनातून सांगेल. त्या वेळी तिथे अंधार होता का, तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी होती, यावरही तिने ती घटना कशी पाहिली, हे ठरत असते. ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी उत्तररात्रीपर्यंत थांबेलेले हे जोडपे रस्त्यावर नसते चाळे कशाला करेल? आता प्रत्येक जण तर्क लावत आहे. घटनेचे राजकारण केले जाते आहे. कदाचित त्या शिपायाने तरुणी पाहून चेकाळून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असेल अन् विवेक यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने गोळी घातली असेल. शुचिता पाळणार्यांचे सरकार आहे म्हणून रातोरात सारी व्यवस्था आणि माणसांची प्रवृत्ती बदलते, असे नाही. त्यामुळे त्या राज्यात गैरकृत्य करणार्यांची जबाबदारी सरकारवरच असते. असेही नाही. गैरकृत्य करणार्याला शासन करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि त्यात साक्षीभाव ठेवला नाही, तर मग सरकारला जबाबदार धरता येईल... घटनेच्या वेळी योगी आदित्यनाथ काही तिथे नव्हते. त्यातल्या कुणाशीच त्यांचा वैयक्तिक संबंध नाही. व्यवस्था न्याय करताना, निर्णय घेताना अनेक डोळ्यांनी आणि कोनातून ती घटना बघत असते... सत्य असे काही नसते. ती फक्त घटनाच असते. रोशोमानचे हे सूत्र लक्षात घ्यायला हवे!