भिक्षुकीची झोळी नाकारली तेव्हाच...

    दिनांक  29-Oct-2018   

 
 
 
चल मच्छिंद्र गोरख आया... ही नाथपंथी समाजाची प्रेरणा आहे. मच्छिंद्र चव्हाण यांचे जीवन हे नाथपंथी समाजालाच नव्हे, तर कष्टाची आणि संवेदनशीलतेची जाण असलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
 

काही महिन्यांपूर्वी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सहाजणांना राईनपाडा येथे क्रूरपणे मारले गेले. काही विघ्नसंतोषी लोक या घटनेचे भांडवल करून समाजात अराजकता माजवू शकत होती. पण, तसे अजिबात झाले नाही. याचे श्रेय नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या काही समाजप्रबोधक आणि देशप्रेमी प्रतिनिधींना जाते. त्यापैकी मच्छिंद्र चव्हाण एक होत. बी.एस्सी, एम.बीए, एम.सीए, डी.सीसी इतके उच्च शिक्षण घेतलेले मच्छिंद्र चव्हाण, जे सध्या रेल्वेत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागात साहाय्यक पोलीस आयुक्तपदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर नोकरीनिमित्त कार्यरत असताना त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेले २३ जण महाराष्ट्रात द्रुतगतीमार्गावर दरोडेखोरी करीत. त्यांना मच्छिंद्र यांनी पंजाबमध्ये जाऊन पकडले होते. त्यासाठी त्यांना ‘डीटेक्शन ऑफिसर ऑफ दी इअर १९९९’ चा पुरस्कार मिळाला आहे. २००६ साली डहाणूला पुरामध्ये बुडत असलेल्या पाचजणांना वाचविलेम्हणून मच्छिंद्रंना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते ‘पंतप्रधान जीवनपदक’ही मिळाले आहे. पोलीस महासंचालंकांचे सन्मानचिन्ह, ‘बेस्ट ऑफिसर ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो’ असे आजवर २००च्या वर पुरस्कार मच्छिंद्र यांना प्राप्त झालेले आहेत.

 

मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील पोमलवाडीचे चव्हाण कुटुंब. बाबुराव आणि हिरकणी यांना चार मुलगे आणि तीन मुली. त्यापैकी एक मच्छिंद्र. नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या या कुटुंबाचाच नव्हे, तर सर्वांचा अर्थाजनाचा स्रोत भिक्षा मागणे हाच. बाबुराव भिक्षा मागण्यासाठी वर्षभर गावाबाहेर असत. वर्षातून एकदा घरी म्हणजे पालावर येत. भिक्षा मागून अर्थाजन काय होणार? आर्थिक समस्यांनी घर पोखरलेले. आजूबाजूला काही चांगले नव्हतेच. कारण, त्या सगळ्या दु:ख-दारिद्—याची जणू सवयच झालेली. अशातच मच्छिंद्र चौथीत शिकत असताना सांगलीच्या सैनिकी शाळेची परीक्षा पास झाले आणि ते सैनिकी शाळेमध्ये गेले. सातवीपर्यंत सगळे सुरळीत चालू होते. पण ‘ती’ घटना घडली आणि त्यामुळे मच्छिंद्र सातवीची परीक्षा व्यवस्थित देऊ शकले नाहीत. त्यांची आई आजारीच असायची. आजारपणात ती वारली. सातार्‍याला शिकणार्‍या मच्छिंद्रला कुणीही सांगितले नाही. सहा महिन्यांनंतर पालावर आल्यावर मच्छिंद्रंना आई दिसली नाही. आई आपल्याला सोडून गेली आणि सहा महिने आपल्याला कळलेच नाही, ही गोष्ट आजही मच्छिंद्र यांच्या काळजात घर करून आहे. हा विषय निघाला की, त्यांच्या डोळ्यांतून आजही आसवांच्या धारा वाहू लागतात. याच काळात उजनी धरणामुळे त्यांचे पोमलवाडी गाव उठले. त्यामुळे सातारा सैनिकी शाळेत सातवीच्या परीक्षेचा निकाल अनुत्तीर्ण लागला. त्यामुळे पुन्हा मच्छिंद्र गावी परतले आणि आजोबांकडे राहून शिकू लागले.

 

वडील भिक्षुकी करत. त्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका व्यक्तीला पाहिले होते. आपणही फौजदार बनावे, असे त्यांना मनोमन वाटे. पण, पालावरच्या जगण्यात भाकरी मिळवणे हेच मोठे दिव्य होते. तरीही मच्छिंद्र यांनी जिद्द सोडली नाही.सुताराच्या हाताखाली लाकडाला रंधा मार अशी पडेल ती कामे करू लागले आणि बरोबरीने शिकू लागले. मच्छिंद्र त्यावेळी बारावीला शिकत होते. इतर समाजबांधवांप्रमाणे काही दिवस तेही हत्ती घेऊन भिक्षा मागू लागले. पण, भिक्षा मागतानाची लाचारी, समाजाने केलेली अवहेलना, त्यांच्याप्रती दाखवलेली तुच्छता, यामुळे तरुण असणार्‍या मच्छिंद्रंचे मन विदीर्ण झाले. कितीही कष्ट करेन, पण शिकून ही परिस्थितीत बदल करेन, असे त्यांनी ठरवले. वडिलांनीही त्यांनी साथ दिली. पुढे कष्ट करून शिकता शिकताच मच्छिंद्र यांनी एमपीएसीची परीक्षा देण्याचे ठरवले. मुंबईतील एसआयएसी संस्थेमध्ये त्यांना एमपीएसी परीक्षा सरावासाठी शिष्यवृत्ती मिळाली. करमाळ्याहून वडिलांनी मुंबईला जाणार्‍या रेल्वेगाडीत त्यांना बसवले. ते १९८७ साल होते. त्यावेळी त्यांच्या खिशात होते केवळ आठ आणे.

 

त्या आठ आण्याच्या जोरावर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचले. तेथून अंधेरीला जायचे होते. काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी अंधेरीऐवजी मानखुर्दला जाणारी गाडी पकडली. तिकीट काढलेले नव्हतेच. खिशातील आठ आणे ठेवले होते ते वेळेला उपयोगी पडतील म्हणून. नेमके दुर्दैवाने तिकीट तपासणीसाने पकडले. पहिल्यांदा मुंबईत आलेल्या मच्छिंद्रंनी टीसीला तोडक्या-मोडक्या इंग्रजीत सांगितले की, ते एमपीएसीसाठी मुंबईत आले आहेत. टीसीने मळक्या कपड्यांतील, पण आत्मविश्वासाने बोलणार्‍या मच्छिंद्रंना पाहिले आणि सोडून दिले. पुढे अंधेरीला आल्यावर ते त्यांच्या समाजाच्या वस्तीत गेले. तिथे समाजातील भिक्षेकरू नातेवाईकांनी प्रत्येक घरांतून एक-दोन रुपये काढले. अशाप्रकारे ५० रुपये जमा करून त्यांना दिले. त्या पैशांच्या साहाय्याने ते मुंबईत राहिले, शिकले. १६-१६ तास अभ्यास करून एमपीएसी परीक्षा उत्तीर्णही झाले. पण, मच्छिंद्र यांनी केव्हाही समाजाशी असलेली नाळ तोडली नाही. ते म्हणतात, “पाच लाखांच्या वर असलेल्या समाजामध्ये केवळ दोन हजार व्यक्तीच नोकरी करतात. बाकी सगळे भिक्षा मागतात. अशा स्थितीत समाजाची प्रगती कशी होणार?” समाजात ज्ञान, कौशल्य, विकास यांची जागृती आणण्यासाठी ते अविरत प्रयत्न करीत आहेत. “समाजाने पारंपरिक अर्थाजन असेलली भिक्षुकी सोडावी आणि आधुनिक ज्ञानकौशल्य मिळवावे,” ही मच्छिंद्र यांची इच्छा आहे. पालावर जगणारा समाज प्रवाहात येण्यासाठी खूप काही घडणे आणि करणे आवश्यक आहे. त्या ‘खूप काहीं’मध्ये मच्छिंद्र यांचे योगदान नक्कीच आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/