हे वंचितांमध्ये येत नाहीत का?

    दिनांक  28-Oct-2018   स्वयंघोषित वंचित शोषितांच्या नेत्यांना सफाई कामगारांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या एकाही आंदोलनात या सफाई कर्मचाऱ्यांचे जगणे मानवयोनीत येण्यासाठी ठोस, असे काही नसते.


मुंबईच्या झोपडीमध्ये सफाई कामगारांचे जगणे आणि समस्या पाहिल्या की, हतबद्ध व्हायला होते. कुणालाही घाण नको असते, दुर्गंधी नको असते. माणूस इथून तिथून एकच, मग तो राजा असो वा भिकारी. पण ज्यांना रोजीरोटी मिळवण्यासाठी घाणीतच काम करायचे आहे, दुर्गंधीतच उतरून रोजीरोटी मिळवावी लागते त्यांचे काय? त्या सर्व नरकवासाची जाणीव होऊ नये म्हणून बहुतेक सफाई कामगारांना नाईलाजाने नशा करावी लागते. ती सवय त्यांचे शरीर पोखरून काढते आणि वयाच्या ४०व्या वर्षीच ते हे जग सोडून जातात. छे! घाणीच्या ढिगाऱ्यात हात घालताना, मॅनहोलमध्ये उतरताना आपल्याला कसे वाटेल, हे एकदाच फक्त मनातल्या मनात अनुभवले तरी या कामगारांची मानसिकता काळीज चिरल्याशिवाय राहणार नाही. सफाई करताना या बांधवांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी काही साधनं निर्माण झालीच नाहीत का? अशी साधनं जरी असतील तरी त्या साधनांची ओळख समाजाला कितपत आहे? नाहीच. मग, त्यासाठी कुणीही आवाज उठवताना का दिसत नाही? या सफाई कामगारांच्या वस्तीत सरकारी इस्पितळात कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी लस आली का? हा गंभीर आणि जगण्यामरण्याचा प्रश्न असतो. पण हे सर्वसामान्य प्रशासनाच्या खिजगणतीतही नसते. असो, याबाबत काश्मीरमध्ये काय चालले आहे? तर उर्वरित भारतापासून काश्मीरमध्ये जे काही वेगळे कायदे आहेत, त्यामध्ये असाही ३५ अ कलमांतर्गत कायदा आहे की, काश्मीरमध्ये इथे पूर्वापार सफाई कामगार असणाऱ्यांची मुलं कितीही शिकली तरी काश्मिरी कायद्यानुसार या मुलांना सरकारी नोकरीमध्ये फक्त सफाई कर्मचारी म्हणूनच काम करावे लागेल. भयंकर भयानक... आम्हीच मोठे वंचित, शोषितांचे, बहुजनांचे कैवारी म्हणत काँग्रेसकडून १२ जागा मागणाऱ्यांनाही याबाबत काही वाटत नाही. तसेच सदासर्वदा आर्य-अनार्य मूलनिवासी म्हणणारेही याबाबत मूग गिळून आहेत. स्वयंघोषित वंचित शोषितांच्या नेत्यांना सफाई कामगारांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या एकाही आंदोलनात या सफाई कर्मचाऱ्यांचे जगणे मानवयोनीत येण्यासाठी ठोस, असे काही नसते. कारण शोषित वंचितांबाबतचे यांचे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे. या पार्श्वभूमीवर सज्जन संवेदनशील समाजाने तरी या बांधवांचे जगणे आणि प्रश्न समजून घ्यायलाच हवेत.

 

या अस्पृश्यतेचे काय?

 

जागतिकीकरणाच्या नव्हे तर आपल्या वैयक्तिक संवेदना इतक्या संकुचित झाल्या आहेत का? की आपल्याच अवतीभवतीच्या लोकांचे कुजत-सडत असलेले जगणे आणि त्यातच होणाऱ्या भयंकर यातनादायी मरणाची तीव्रता मनाला भिडते का? डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामध्ये महादेव झापे, घनश्याम कोरी आणि देवीदास पाजगे हे तीन जण असेच जगले आणि असेच मेले. या तीन जणांचा मृत्यू मानवी मूल्यांची शाश्वती मानणाऱ्या आणि समजणाऱ्या कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या मनाला चटकाच लावणार आहे. खंबाळपाड्यातील रासायनिक कारखान्याचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत वाहिन्यांची स्वच्छता करण्यासाठी हे तिघे त्या २.८ मीटर खोल वाहिनीमध्ये उतरले होते. पण वाहिनीमधल्या विषारी वायूमुळे गुदमरून या तिघा निष्पापांचा मृत्यू झाला. कारण, वाहिनी साफ केल्यानंतर त्यांना काही पैसे मिळणार होते. त्यातून त्यांच्या घरची चूल पेटणार होती. कच्च्या-बच्च्यांच्या पोटी दोन घास जाणार होते. भयानक! हाताने मैला साफ करण्याचे आणि कोणीतरी तो मैला डोक्यावर वाहून नेण्यावर कायद्याने बंदी आहे म्हणे. पण मग या अशा वाहिन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने जेव्हा हाडामांसाचा जिवंत माणूस उतरवला जातो तेव्हाही काही कायदे आहेतच ना? ही घटना तर हिमनगाचे टोक आहे. सगळ्यांनी नाकारलेले आणि जीवावर बेतणारे काम तो केवळ आणि केवळ आपल्या मुलाबाळांसाठी करत असतो. पण कंत्राटी पद्धतीमध्ये या सफाई कामगाराला केवळ आणि केवळ आपले कंत्राट पूर्ण करणारा पैसे देऊन विकत घेतलेला घटक याच पद्धतीने पाहिले जाते. त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न धाब्यावर बसवले जातात. कामगारांना साधे मास्क, हँडग्लोव्हज पुरवले तरी मोठी गोष्ट असते. त्या कंत्राटदारांना का दोष द्यावा? आपण तरी काय करतो? कचऱ्याच्या गाडीवर येणारा, कचराकुंडी साफ करणारा किंवा प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये सफाई करणारा तो दिसला की आपोआप आपण नाकाला रूमाल लावतो, त्यांना स्पर्शून येतो तो रस्ता ते वळण टाळतो. ही अस्पृश्यता जातीनिहाय नाही पण कामानिहाय अस्तित्वात आहे. या अस्पृश्यतेचे कोणालाही सोयरसुतक नाही. मात्र, या अस्पृश्यतेच्या क्रूरतेआड दडपल्या गेलेल्या सफाई कामगारांचेही जगणे आणि मरणे एकदा तरी मानव योनीतले व्हावे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/