चर्च की ‘तसल्या’ गोष्टींचे अड्डे?

    दिनांक  27-Oct-2018   


 


दयासागर येशूच्या कृपाळूपणाच्या चमत्कारिक कथा ऐकविणाऱ्या चर्चचे आतील स्वरूप नेमके कसे असते? चर्चमध्ये खरंच येशूची भक्ती केली जाते की, ‘नको त्या’ गोष्टीच केल्या जातात? भारतासह जगभरातील चर्चमध्ये कोणते उद्योग चालतात? अन् असे काय झाले की, बिशप, कार्डिनल व पाद्य्रांसह ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनाच थेट माफी मागावी लागली? नेमके काय चाललेय काय? चर्चमधील भल्यामोठ्या घंटांच्या ठणठणाटाच्या आड?

 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘व्हिएतनाम न्यूज’ या वृत्तपत्रात चालू महिन्यात दोन बातम्या प्रकाशित झाल्या. दोन्ही बातम्यांचा विषय अतिशय गंभीर म्हणजे ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ अर्थात चर्चमध्ये अल्पवयीन बालकांवर केल्या जाणाऱ्या लैंगिक अत्याचारांचा होता. पहिली बातमी जर्मनीतील होती, ज्यात जर्मन बिशप्स कॉन्फरन्सने चर्चमधील पाद्री व अन्य उपदेशकांच्या रानटीपणाला बळी पडलेल्या हजारो बालकांची माफी मागितल्याचा उल्लेख होता. दुसरी बातमी चिली या देशातली होती. तिथेही अल्पवयीन बालकांवरील अत्याचारात चर्च संस्था गुंतलेली असून हजारो बालकांना पाद्य्रांच्या व उपदेशकांच्या पिसाटपणाला अगदी लहानशा वयात सामोरे जावे लागल्याचे व त्यावर धमोपदेशक पडदा पाडू पाहत असल्याचे समोर आले. ‘व्हिएतनाम न्यूज’ने या दोन्ही घटना अगदी विस्ताराने दिल्या असून त्याच बातम्यांवर आधारित हा लेख...

 

भारतात केरळमधील बिशप फ्रॅन्को मुलक्कल याने नन्सवरील केलेल्या अत्याचारांमुळे कल्लोळ माजलेला असतानाच, देशाच्या वरच्या टोकाला म्हणजे जम्मू-काश्मीरच्या कठुआ शहरातील एका चर्चमध्ये आठ अल्पवयीन मुली आणि १२ मुलांचे एका पाद्य्राने लैंगिक शोषण केल्याचे उजेडात आले. बहुतांश मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे धनाढ्य ख्रिस्त्यांच्या व त्यांच्या संस्थांच्या ताटाखालचे मांजर झालेले असल्याने हा प्रकार मात्र तितकासा चर्चिला गेला नाही, हेही खरेच. दुसरीकडे परदेशातूनही चर्चमध्ये पाद्री आणि बिशपादी धर्ममार्तंडांकडून आपल्या विकृत लैंगिक सुखासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे वृत्त झळकले व सर्वत्र खळबळ माजली. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील ही घटना असून गेल्या ७० वर्षात ३०० पाद्य्रांना तब्बल १००० अल्पवयीन मुली व मुलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब पेनिसिल्वानिया सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली. विशेष म्हणजे चर्चच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही लैंगिक अत्याचाराची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सदर अहवालातून केला आहे. ज्या मुली-मुलांचे फुलण्याचे वय असते त्याच वयात त्यांच्या आयुष्याची माती करणारी, त्यांना वासनेच्या वेगळ्याच हिडीस जगात घेऊन जाणारी ही चर्च आणि तेथील धर्मगुरूंची कृत्ये जेवढी हिणकस तितकीच मानवतेला अन् धर्मालाही काळिमा फासणारी. पण तरीही बहुसंख्य लोकांचे डोळे काही उघडत नाहीत आणि ते पुन्हा पुन्हा या लोकांच्या प्रेमळ चेहऱ्याला बळी पडतात, त्यांच्यातील हिंस्त्र श्वापदासमोर स्वत:हून जातातच.

 

चर्चमध्ये लैंगिक शोषणाचे गुन्हे जगात सर्वत्रच होतात. आता नुकतीच जर्मनीच्या कॅथलिक चर्चने लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या हजारो बालकांची माफी मागितली आहे. जर्मन बिशप्स कॉन्फरन्सच्या याबाबतच्या अहवालाच्या पत्रकार परिषदेतील सादरीकरणावेळी कार्डिनल रिन्हार्ड मार्क्स म्हणाले की, “दशकानुदशकांपासून विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनांमुळे आम्ही खजिल झालो आहोत.” उल्लेखनीय म्हणजे १९४६ ते २०१४ या कालावधीत सुमारे तीन हजार ७०० अल्पवयीनांशी क्रूरतेचा व्यवहार केला गेला. यात मुख्यत्वे मुलांचा समावेश असून त्यांची वये १३ वर्षांपेक्षा कमी असल्याचेही उघड झाले. पण या केवळ हिमनगाच्या एका टोकाएवढ्या घटना आहेत, ज्या जगासमोर आल्यात तरी. ज्या घटनांची भीतीच्या वा बदनामीच्या कारणांपायी कोणी वाच्यताच करत नाही, त्याची संख्या यापेक्षाही कैकपटींनी अधिक आहे. पोप फ्रान्सिस यांनी चर्चमधील लैंगिक शोषणावर प्रतिक्रिया देताना, “एखादा जरी पाद्री वा उपदेशक बालकांशी गैरवर्तणूक करत असेल, तर ते राक्षसी कृत्य आहे,” असे म्हटले. पण पोप फ्रान्सिस कितीही लैंगिक शोषणाच्या व अत्याचाराच्या विरोधात असल्याचा आव आणत असले तरी, त्यांनी का, कधी अशा पाद्री, बिशप्स वा कार्डीनलवर कारवाई केली नाही? काल-परवा केरळातील नन्सनी बिशपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. तेव्हाही पोपने का तात्काळ कारवाई केली नाही? आता तर या प्रकरणातील एका साक्षीदाराचाही मृत्यू झाला पण, तो खरेच नैसर्गिक मृत्यू होता की हत्या होती? त्याची चौकशी का कधी पोपने केली नाही? यावरून पोपचाही अशा गोष्टींना पाठिंबा तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही. म्हणजे एका तोंडाने अत्याचाराचा निषेध करायचा आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की, माघार घ्यायची ही दुटप्पी नीती या लोकांनी अवलंबल्याचे यातून स्पष्ट होते.

 

शिवाय फक्त माफी मागितल्याने प्रकरण संपले असे होत नाही. कारण, आपल्या हव्यासापायी या लोकांनी हजारो कोवळ्या जीवांच्या आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यात अंधार आणि अंधारच भरला. जेव्हा एखाद्या मुली वा मुलावर असे अत्याचार झाले असतील तेव्हा त्यांची अवस्था कशी झाली असेल? एकूणच मानवी समाजाकडे, धर्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा झाला असेल? नक्कीच नकारात्मक आणि नैराश्याने ग्रासलेली त्यांची स्थिती झाली असेल. कितीतरी दिवस, रात्र, महिने, वर्ष केवळ या अत्याचाराच्या भयानक क्षणांमुळे त्यांनी वाया घालवली असतील. पोप महाशय, त्यामुळे फक्त माफी मागून कसे चालेल? यात अडकलेले जे लोक सध्या जीवंत आहेत, त्यांना कठोरातील कठोर शासन करणे, हाच यावरचा उपाय आहे. जर्मनीच्या चर्चमधील लैंगिक शोषण पीडितांनीही केवळ माफीवर भागणार नसल्याचे म्हटले. पीडितांच्या संघटनेने या सगळ्याच घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हा अहवाल तयार करतेवेळी जर्मनीतील २७ डायोसेसमधील ३८ हजार कागदपत्रांचा अभ्यास करण्यात आला. तरीही कितीतरी हजार कागदपत्रे नष्ट वा गहाळ केल्याचा आरोपही या अहवालावर करण्यात आला आहे.

 

जर्मनीत ही घटना घडत असतानाच चिली देशातील कॅथलिक चर्चमध्येही लैंगिक शोषण व अत्याचारांसंबंधीच्या स्कॅण्डलची सुनावणी सुरू होती. १९६० सालापासून चिलीतील चर्चमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून अशा ११९ प्रकरणांचा तपास केला जात आहे. याचसंदर्भातील एका सुनावणीदरम्यान सॅन्टियागो आर्चबिशप रिकार्डो एझ्झाती यांना हजर राहावे लागले. पण यावेळी त्यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत कोणतेही उत्तर दिले नाही. कदाचित आपल्या शांततेआड त्यांना लैंगिक क्रौर्याला बळी पडलेल्या बालकांच्या किंकाळ्या दाबायच्या असतील. विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस यांनीही चिलीच्या चर्चमध्ये अत्याचाराची-शोषणाची संस्कृती बोकाळल्याचे म्हटले होते. पण पोपचे हे वक्तव्य काही एकाएकी आलेले नाही, तर दशकानुदशके जी गैरकृत्ये चर्चच्या आवारात चालत होती, त्याच्या हजारो तक्रारी मिळाल्यानंतर पोप महाशयांना त्यांची चौकशी करण्याची लहर आली व त्यांनी त्यावर भाष्य केले. आणखी एक गोष्ट म्हणजे, ऑस्कर मुनोज या ५६ वर्षीय उपदेशकाने सात बालकांवर बलात्कार केल्याचे समोर आले, ज्याचा तपास सुरू आहे. रिकार्डो एझ्झाती यांनी मुनोजने केलेल्या अत्याचारांच्या घटनाही नाकारल्या. म्हणजेच पोपने एका बाजूला अशा घटनांवरुन प्रवचने द्यायची आणि दुसऱ्या बाजूला एझ्झातीसारख्यांनी त्या गोष्टींना नाकारायचे, असा हा सगळा खेळ आहे.

 

अमेरिका, जर्मनी, चिली या देशांतील या घटना आहेत. अर्थात, अशा घटना काही आजच्याच नाहीत. याआधी पोप फ्रान्सिस यांनी जगातील चार लाख १४ हजार पाद्य्रांपैकी आठ हजार म्हणजे दोन टक्के पाद्री लैंगिक शोषण करत असल्याचे कबूल केले होते. पण ही झाली पोपने कबूल केलेली अधिकृत आकडेवारी. खरी आकडेवारी यापेक्षाही अधिक असू शकते. धर्मसंस्थेकडून अशाप्रकारे केले जाणारे अश्लाघ्य प्रकार खरे म्हणजे हृदय पिळवटून टाकणारेच पण, हे पोप वा पाद्री वा बिशपांना समजेल का? वरील घटना झाल्या बालकांच्या लैंगिक शोषणाच्या पण कन्फेशनच्या नावाखाली चर्चमध्ये विवाहित महिलांवरही बलात्कार, अत्याचार केलेच जातात. कन्फेशन म्हणजे आपण केलेल्या पापाची येशूसमोर दिलेली कबुली. पण अशावेळी पाद्री, बिशप वगैरे चटावलेले लांडगे व्यथित झालेल्या महिलांना गाठतात आणि पापाच्या माफीच्या बदल्यात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. या घटना डोक्यात तिडीक आणणाऱ्याच. भारतात अशा कितीतरी घटना उघड झाल्या व त्यामुळे कन्फेशन प्रथेवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र, ज्यांचे हितसंबंध अशा प्रथांमध्येच गुंतलेले होते व आहेत, त्यांनी ही प्रथा बंद करणार नसल्याचे सांगितले. देशात न्यायालयीन व्यवस्था असताना एखाद्या महिलेने चर्चमध्ये येऊन पापांची, गुन्ह्यांची कबुली देणे आणि तिथल्या पाद्री वा बिशपकडे माफीची मागणी करणे, असंवैधानिकच. पण तरीही अशा घटना घडतातच. त्यावर कोणी काही बोलत नाही. आज जगभरातील चर्चमध्ये अशा अत्याचारांच्या घटना घडत असताना बालकांच्या, महिलांच्या, मानवाधिकाराच्या बाता मारणारे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, बुद्धिजीवी ढोंगबाजही झोपेचे सोंग घेतात. या लोकांनी कधीही चर्चमधील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला नाही किंवा कधीही मेणबत्ती मोर्चा काढला नाही. त्याची कारणे निश्चितच या लोकांच्या चर्चच्या दरबारी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांतच दडलेली असतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/