आरम्भ है प्रचण्ड !

    दिनांक  26-Oct-2018   
 

 
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघे २ खासदार निवडून आणू शकलेला भारतीय जनता पक्ष त्यानंतर बरोब्बर ३० वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये स्पष्ट बहुमत मिळवून स्वबळावर सत्तेत आला. या अद्भुत वाटचालीत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिगत करिष्मा, त्यापूर्वी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाच्या उभारणीत व वाटचालीत दिलेलं अनन्यसाधारण योगदान, संघ परिवाराच्या राष्ट्रीय विचारांचं सत्व, आदी असंख्य घटकांचं मोठं योगदान आहे. या घटकांसह भाजपची पक्ष संघटना, संघटनेची शिस्त आणि कार्यकर्त्यांच्या फळीची मेहनत यांचंही तितकंच मोठं योगदान आहे. राष्ट्रीय स्तरापासून बूथ स्तरापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिश्रमातून ही संघटना बांधली, वाढवली. यामध्ये भाजपची युवा शाखा म्हणजे अर्थातच भारतीय जनता युवा मोर्चाचं स्थान महत्वाचं आहेभाजयुमोची निर्मिती ही जनसंघाच्या काळातच, १९७८ मध्ये झाली. त्यानंतर जसजसा पक्ष वाढत गेला तसा भाजयुमोही वाढत गेला. कलराज मिश्रा, प्रमोद महाजन, राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान अशा दिग्गजांनी एकेकाळी भाजयुमोचं नेतृत्व केलं. आज, २०१८ मध्ये जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपची युवा शाखा भाजयुमोच्या वाटचालीतील एक नवा टप्पा डोळ्यासमोर दिसतो आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक आता अगदी पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजयुमोने राष्ट्रीय महाधिवेशनाचा संकल्प केला असून शनिवार दि. २७ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील परेड मैदानावर या अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या महाधिवेशनाचं उद्घाटन होणार असून रविवारी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणाने समारोप होणार आहे. विशेष म्हणजे, भाजयुमोच्या आजवरच्या प्रवासात प्रथमच संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन हे दक्षिण भारतात होत आहे. देशातील विद्यमान राजकीय संदर्भांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘दक्षिण दिग्विजया’च्या प्रयत्नांना भाजयुमोचं हे राष्ट्रीय अधिवेशन पूरक ठरण्याची शक्यता आहे. सुमारे ७ हजाराहून अधिक पदाधिकारी आणि २ लाखांच्या आसपास कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजयुमो शक्तीप्रदर्शन करून जणू भविष्याचीच चुणूक दाखवू पाहत आहे. यंदाच्या या महाधिवेशनाचं नावच ‘विजयलक्ष्य-२०१९’ आहे, आणि यानिमित्ताने देशातील युवा राजकारणात जणू एक नवं पर्वच सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत.
 

दुसरे महाजनपर्व?

 

भाजयुमोच्या या ‘विजयलक्ष्य-२०१९’ महाधिवेशनाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत त्या भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन. ज्या प्रमोद महाजनांनी भाजयुमोचं एकेकाळी नेतृत्व केलं, त्या भाजयुमोच्या अध्यक्षपदी आज त्यांच्याच कन्या पूनम महाजन असणं, आणि याच वेळी २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचा अश्वमेध यज्ञ रचला जात असणं, हा एक विलक्षण योगायोग आहे. एक कुशल नेता, प्रभावी वक्ता, कष्टाळू लोकप्रतिनिधी आणि आधुनिक काळात युवकांना विकासात्मक साद देऊ शकणारी राजकारणी म्हणून पूनम महाजन यांनी गेल्या काही वर्षांत आपला ठसा उमटवला आहे. वास्तविक, प्रमोद महाजन यांचं अचानक काळाच्या पडद्याआड जाणं हा एक मोठा धक्का आणि त्यानंतर असंख्य कौटुंबिक धक्के सहन केल्यानंतर त्यातून खंबीरपणे सावरत पूनम महाजन यांनी पुढील कारकीर्द घडवली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर पूनम यांनी प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहत, संघटनात्मक कार्यावर भर दिला, आत्मचिंतनही केलं. त्या कष्टांचं फळ त्यांना २०१४ च्या निवडणुकीत मिळालं. प्रिया दत्त यांना पराभूत करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पूनम महाजन यांनी भाजपचा झेंडा फडकवलालोकसभेत एक आश्वासक संसदपटू म्हणून पुढे आल्यानंतर पूनम महाजन यांच्यावर भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रूपाने राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली. त्यानंतरच्या काळात एक युवा नेता म्हणून पूनम महाजनांनी जवळपास सारा देश पालथा घातला. अगदी ईशान्य भारतातील दुर्गम भागांपासून ते कम्युनिस्टांचा बालेकिल्ला केरळपर्यंत सबंध भारतभरात त्यांनी युवा मोर्चाचा झेंडा हाती घेऊन प्रवास केला असून भाजपच्या संघटनात्मक रचनेलाही या कामाचा फायदा होताना दिसला. आता २०१९ च्या पृष्ठभूमीवर पूनम यांच्या नेतृत्वाखालील भाजयुमोने केलेला राष्ट्रीय अधिवेशनाचा संकल्प हा भाजयुमोसोबतच पूनम महाजन यांच्याही कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, यात काही शंका नाही. प्रमोद महाजन यांचा वारसा पेलणं आणि समर्थपणे पुढे नेणं, हे किती अवघड आहे, याची कल्पना प्रमोद महाजनांना पाहिलेल्या, त्यांचा सहवास लाभलेल्या जुन्याजाणत्यांना असेलच. प्रमोद महाजन जाऊन जवळपास एक तप उलटल्यानंतर आज त्यांच्या कन्या पूनम यांची वाटचाल पाहिली, तर त्या हा वारसा समर्थपणे पेलत आहेत, आणि पुढेही नेत आहेत, असं मानायला नक्कीच हरकत नसावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/