पुढचा पंतप्रधान मीच ठरवणार!

    दिनांक  25-Oct-2018   सगळे मला ‘जाणता खेळाडू’ म्हणतात. हो, मी जाणता आहेच मुळी. सगळं जाणून घेण्याची माझी कुवत इतकी अफाट आहे की, मी एकाच वेळी शेतीतल्या नांगरणी, खुरपणीवर अख्खा शेतकरी वर्ग शिक्षित होईल, असे व्याख्यान दिलं आहे आणि त्याच वेळी मी क्रिकेटच्या पिचवर त्या फोर रन, सिक्स रन, नॉटआऊट, सेंच्युरी अशा परदेशी शब्द वापरणाऱ्या क्रिकेट टीमलादेखील चांगलीच पॉवर दाखवली होतीत्यावेळी लोक म्हणाले, “शेतजमिनीच्या माणसाला कशाला पाहिजे खेळबिळ? पण हे बोलतानादेखील त्यांना आपण खरं बोलतो का?, असा दाट संशय होता. कारण मी तर सगळ्याच खेळात पारंगत आहे. त्याचं असं आहे, ‘मी मराठी रांगडा गडी आणि दिल्लीची करी वारी,” असं जरी असलं तरी एक पाय दिल्लीत अन् एक पाय महाराष्ट्रात ठेऊन भल्याभल्यांना मी धोबीपछाड दिला आहे. मी कायम भरवश्याच्या गड्यांना खो देतो. लोकांना असे खो देण्यात माझ्यासारखा तरबेज मीच. कबड्डी कबड्डी मी पुटपुटत पण नाही पण माझ्या पकडीतून कोणी महाराष्ट्रातून दिल्लीच्या रेषेत गेला तर त्याला तिथून परत आणण्याचा खेळकर्तब माझ्याकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी शूर महाराष्ट्राचा शूरवीर पठ्ठ्या आहे. त्यामुळे शस्त्र-अस्त्रांच्या खेळांची पण मला जाण आहे. त्याचं असं आहे, पाठीत खंजीर खुपसणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या खेळाचा पारंपरिक खेळ. या खेळात पण मीच मास्टर आहे. पण याचं कोणाला कौतुकच नाही. याउलट सगळ्यांना काही लोकांनी केलेले शस्त्रपूजन दिसतात. त्याची काय ती बातमी होते. आम्ही कित्येक वर्ष न बोलता, कुठेही स्वतःचं नाव न गुंतवता महाराष्ट्रभर दररोज नवा आंदोलनांचा खेळ सुरू करतो. दोन जातीच्या मित्रांत विस्तव जाणार नाही, असा जादूचा खेळ करतो. तरी पण आम्हाला कुणी म्हणत नाही की, “साहेब तुम्ही कॅप्टन बना.” माझे सर्वगुणसंपन्न आणि या सम हा असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मला माहिती आहे. पण कुणीही मला कॅप्टन बनवत नाही. किती वेळ मी वाट पाहायची? मला कॅप्टन नाही बनू देत, मग मी का दुसऱ्यांना कॅप्टन बनू देऊ? असं खूपदा झालं. मला कॅप्टन बनायचं आहे, म्हणत म्हणत किती दशकं गेली. आता तर मला कॅप्टन बनायचे आहे, हे लोक विसरले बिसरले की काय? अशी भीती वाटते. त्यांना सांगतो, तुम्ही मला खेळाचा कॅप्टन बनवा नाय तर बघा, पुढचा पंतप्रधान ठरवण्यात माझी महत्त्वाची भूमिका राहील...”

 

आईच्या खुन्यांसाठी..

 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतजमिनीवर दोघांची भांडणे होताना दिसतात. दुसरा पहिल्याच्या शेतात ट्रॅक्टर घुसवू पाहतोय. दोघेही कुटुंबकबिलावाले दिसतात. दुसरा शेतात ट्रॅक्टर घुसवू पाहतो आणि तो आपल्याला जुमानत नाही, हे पाहून पहिलाही थयथयाट करतो. तरीही दुसरा बधत नाही. त्यावेळी पहिला काय करतो? तर गलितगात्र असलेल्या, हाडाची काडं झालेल्या स्वतःच्या आईला त्या जागी ओढत फरफटत आणतो. ती त्याला विनवते, रडते. कृश-अशक्त शरीराने प्रतिकार करते पण तो पोटचा मुलगा स्वतःच्या आईला गुराढोरासारखे फरफटतच राहतो आणि सरळ दुसऱ्याच्या ट्रॅक्टरपुढे फेकतो. हे तो मुलगा का करतो तर समोरचा वृद्धेला पाहून ट्रॅक्टर थांबवेल. केवढे क्रौर्य. तशीच कालपरवाची यावल इथली घटना. सुशीलाबाई भोई यांना एकुलता एक मुलगा संतोष आणि सहा मुली. अर्थातच संकेताप्रमाणे या मुलाला सुशीलाबाईने अतिशय लाडाकोडात वाढवले. कारण एकतर मुलगा, त्यात तो एकुलता एक. मात्र, काही दिवसांपूर्वी सुशीलाबाईंचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या अंगावर चादर टाकून घराचा दरवाजा बंद करून आरोपी निघून गेला. तपासाअंती कळले की, त्यांच्या एकुलत्या एक मुलाला संतोषला दारू पिण्यासाठी एक हजार रुपये हवे होते. सुशीलाबाईंकडे एकहाती इतके पैसे नव्हते. यावर चिडून संतोषने मित्राला अकबरला बाहेर उभे केले आणि आईचा खून करून तो साळसूदपणे बाहेर आला. प्रत्यक्ष जन्मदात्रीला मानसिक किंवा शारीरिक मरणयातना देणाऱ्या किंवा तिचा खून करणाऱ्या मुलांना पाहून वाटते की, याच मुलांसाठी आईने आपलं अख्खं आयुष्य ओवाळून टाकलं होतं. या आईने केवळ आणि केवळ मुलासाठीच आयुष्यभर एकच मंत्र जपला होता, जगला होता –

 

वंशाचा तो दिवा बाई जपते जपते

लेकराच्या सुखासाठी, माझं आयुष्य संपूदे

उलीशी लागली ठेच त्याला, माझं काळीज फाटते

सारं माहेर सासर त्यावर ओवाळणी करते

लेकराच्या सुखासाठी, माझं आयुष्य संपूदे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/