पूल की पांढरा हत्ती?

    दिनांक  25-Oct-2018   चीनमध्ये महासत्ता होण्याची सगळी लक्षणे असली तरी, शापिताप्रमाणे त्यांच्यामागे विकासासोबत अविकसित विचारसरणी आहेच. हा रोगच जणू चीनला जडला असावा.

 

इतर देशांच्या डोळ्यांना झोंबेल आणि आपली महासत्ता होण्याची कंडू शमेल, याकरिता चीन नेहमीच काहीतरी नवनवीन प्रयोग करत असतो, पण हे प्रयोग रक्ताने माखलेले. चीनमध्ये महासत्ता होण्याची सगळी लक्षणे असली तरी, शापिताप्रमाणे त्यांच्यामागे विकासासोबत अविकसित विचारसरणी आहेच. हा रोगच जणू चीनला जडला असावा. म्हणजे हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल चीनने तयार केला, तो वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. पण त्याची खरंच गरज होती का? कदाचित असावीही, कारण चीनमधील तीन महत्त्वाच्या शहरांना हा पूल जोडणार आहे, त्यामुळे या पुलाच्या माध्यमातून चीन हाँगकाँग आणि मकाऊवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नसावा कशावरून? महासत्ता होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्याने चीन माओ झेडूंग यांच्या काळापासूून बघत आहे. त्यातही हा जो काही जगातील सर्वात लांब पूल बांधण्यात आला आहे, त्याला चीनमधील लोकल प्रसारमाध्यमे ‘मृत्यूचा सापळा’ या नावाने संबोधतात. प्रकरणच तसे आहे. या देशांनी मिळून जरी हा पूल बांधला असला, तरी या पुलाकरिता जवळजवळ २० हून अधिक कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला आणि ५०० हून अधिक कर्मचारी अजूनही रुग्णालयात खितपत पडले आहेत. या पुलाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या सुरक्षाकवचांमुळे मकाऊ आणि हाँगकाँग या दोन्ही भागांत नऊ नौदलाच्या कामगारांचाही मृत्यू झाला. १९८० साली हाँगकाँगच्या एका श्रीमंत व्यावसायिकाला असा एखादा पूल असावा, ज्यामुळे आपण चीनमध्ये कमी वेळात जाऊ शकतो, असे वाटले. त्यानंतर तब्बल दोन दशकांनी चीनसाठी हा प्रकल्प अचानक महत्त्वाकांक्षी वगैरे झाला आणि सगळा पैसा ओतून २००९ पासून या पुलाच्या उभारणीसाठी सगळे सज्ज. हे असं अचानक हुक्की येऊन काम करण्याची चीनची पहिली वेळ नक्कीच नाही. म्हणजे १९५८ साली सुद्धा माओंना जेव्हा वाटलं की, चीनची प्रगती फार हळू होतेय, काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांनी आदेश सोडले की, संपूर्ण देश पोलादनिर्मिती करेल.

 

खेड्यापाड्यांमध्ये त्यांनी कारखाने उभे केले आणि पाहता पाहता जर्मनीपेक्षा चीनचं पोलादाचं उत्पन्न वाढलं, पण उपयोग काय, या सगळ्यात आपली लोकं तंत्रज्ञानात पारंगत नाहीत, हे माओ विसरला आणि सगळा निरुपयोगी पोलाद निर्माण झाला, जो बाहेर कवडीमोल ठरला. परिणामी देशाचं आर्थिक नुकसान झालं ते वेगळं. आता हा जगातील सर्वात लांब पूल बांधला खरा, पण त्याच्या उभारणीसाठी सुमारे १७.३ अब्ज डॉलर इतका खर्च करण्यात आला. या पुलासाठी चार लाख किलो पोलाद वापरले गेले, ज्यात (एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार) ६० आयफेल टॉवर, १०० हून अधिक भुयारी मार्ग आणि लाखो घरे बांधली जाऊ शकतात. पण, या पुलामुळे या देशातील प्रवासाचा कालावधी तर कमी झाला असं आपल्याला वाटत असले, तरी हे प्रकरण तसे नाही, या पुलाचा वापर फक्त व्हीआयपी पासेस असलेले वाहनधारकच करू शकतात. त्यामुळे जनहितासाठी वगैरे असा काही उद्देश या पुलाचा नक्कीच नव्हता. चीनमधील काही समीक्षकांनी तर या पुलाचा उल्लेख, ‘एक लांब पांढरा हत्ती’ असे केले आहे, कारण या पुलाच्या उत्पन्नापेक्षा या पुलाचा खर्चच जास्त आहे. एवढेच नाही तर, चीनमधील काही पर्यावरण आणि प्राणीमित्रांनी या पुलाच्या स्थगितीसाठी २०१३ साली न्यायालयात धाव घेतली होती, कारण या पुलामुळे हाँगकाँगमधील गुलाबी डॉल्फिन ज्यांना तिथे ‘पिंक पांडा’ या नावाने संबोधले जाते, ही प्रजाती लुप्त होण्याची भीती येथील पर्यावरणप्रेमींना होती. पण हा प्रकल्प होत असताना, या पुलाकरिता चीनने अनेक खोटे अहवाल सादर केले. तर, दुसरीकडे हाँगकाँगमधल्या नागरिकांनी, “आम्हाला पुलापेक्षा लिफ्ट, चांगले रस्ते आणि सुखसोयी द्या,” अशी मागणी केली. म्हणजे, प्राणघातक अपघात, पांढरा हत्ती, मृत्यूचा सापळा, पर्यावरणाचा र्हास आणि लोकांची खरी गरज याउपर इतर देशांना आपण कसे वरचढ, हे दाखवणारा जगातील सर्वात लांब पूल, ही अशी हाव फक्त चीनलाच जमू शकते...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/