एक वर, अनेक वधू

    दिनांक  25-Oct-2018   

 


 
 
 
लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार, याची चर्चा जशी माध्यमे करतात, तशी राजकीय नेतेमंडळीही करीत असतात. प्रथम राजकीय मंडळी काय म्हणतात ते बघू.
 
 
शरद पवार म्हणतात, “येत्या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या देशात सत्ताबदल होणार असून त्यानंतर या देशाचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन किमान एक समान कार्यक्रम तयार करतील आणि नवे सरकार स्थापन करतील. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही.” शरद पवारांनाही म्हणायचे आहे की, “खरं म्हणजे मीच पंतप्रधान होणार आहे. मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही आणि सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद माझ्यात आहे.” कोणताही राजकीय नेता जे मनात असेल ते स्पष्ट भाषेत बोलत नाही. आपण ते समजून घ्यायचे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती महाआघाडी बनविण्याच्या प्रयत्नाच्या कानडी नाट्यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या बरोबर हात उंच करून “आम्ही भाजपला हरविण्यासाठी एकत्र येणार आहोत,” असा बार सोडून दिला. दोन दिवसानंतर म्हणजे २६ मे २०१८ रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्या म्हणाल्या, “संयुक्त आघाडीच्या २०१९ सालच्या पंतप्रधान मायावती असतील.” मायावतींचा एकही खासदार लोकसभेत नाही. उत्तर प्रदेशात सत्तेच्या जवळही जाण्याची त्यांची आज शक्यता नाही, परंतु आकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे.
 

ममता बॅनर्जी, “मीच पंतप्रधान होणार” असे म्हणत नाही. त्या अधिक धूर्त आहेत. बंगालचा गड राखला आणि जास्तीत जास्त खासदार निवडून आणले तर त्या पंतप्रधानपदावर दावा सांगतील. हीच गोष्ट तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आहे. तेदेखील धूर्त आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींना सल्ला दिला की, रालोआ किंवा संपुआ यांच्याऐवजी फेडरल फ्रंट (तिसरी आघाडी) उभी करावी. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केसीआर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यांचीदेखील इच्छा पंतप्रधान बनण्याची आहे. अखिलेश यादव यांचे सध्या लक्ष्य उत्तर प्रदेशात सत्ता आणण्याचे आहे. मायावतींशी सख्य करून सत्ता आणण्याचा डाव ते खेळू लागले आहेतराहुल गांधी म्हणतात, “जर सर्वांची इच्छा असेल तर मी पंतप्रधान होण्यास तयार आहे.” त्यांच्याच पक्षातील चिदंबरम म्हणतात, “राहुल गांधी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर पक्षीय बलाबल बघून पंतप्रधान कुणाला करायचे याचा निर्णय केला जाईल.” चिदंबरम यांना हे सुचवायचे आहे की, काँग्रेस पक्षात केवळ राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे दावेदार नसून मीदेखील त्यातला एक आहे. पंतप्रधान हे एकच पद आहे. म्हणजे वर एकच आहे आणि त्याला वरायला अनेक वधू मात्र हातात वरमाला घेऊन आताच तयार झालेल्या आहेत. ‘बेगाने शादी में, अब्दुल्ला दिवाना, ऐसे मनमौजी को कैसे समझाना’ हे सिनेगीत आपल्याला गुणगुणायला काही हरकत नाही.

 

ही सर्व वक्तव्ये वाचल्यानंतर मला काही सुंदर लोककथा आठवल्या. त्या वाचकांनादेखील आवडतील, म्हणून त्या येथे देतो. एका जंगलातील एक कोल्हा शिकारीसाठी गावात गेला. त्याचा वास लागून कुत्रे त्याच्यामागे लागले. कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी कोल्हा पळत पळत एका गोदामात गेला. तेथे कपड्याला रंगविणारी पिंपे ठेवली होती. पळता पळता तो निळ्या रंगाच्या एका पिंपात पडला. कुत्र्यांचे भुंकणे संपल्यानंतर काही वेळाने तो बाहेर आला. त्याचे सर्व अंग निळे झाले होते. तशा अवस्थेत तो जंगलात गेला. हा कोण नवा प्राणी आला, असे वाटून इतर प्राणी थोडे घाबरले. त्याच्यापासून दूर जाऊ लागले. वाघही जेव्हा त्याला घाबरला तेव्हा कोल्ह्याच्या मनात विचार आला की, मला जो नवा रंग प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग करून आपण प्राण्यांचे राजे व्हावे. तो प्राण्यांना म्हणाला, “तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. देवाने मला हे रूप देऊन तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठविलेले आहे. आता मी या जंगलाचा राजा आहे.” सर्व प्राण्यांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला राजा करून टाकले. सिंह त्याचा सेनापती झाला, वाघ त्याचा मंत्री झाला आणि इतर प्राण्यांना वेगवेगळी खाती देण्यात आली. कोल्ह्याने आपल्या दरबारातून सर्व कोल्ह्यांना हाकलून लावले. त्याला भीती वाटली की, त्यांनी मला ओळखले तर माझी धडगत नाही. 

 

असे काही दिवस गेले. एके दिवशी दरबाराच्या बाहेरून कोल्हे, नवीन राजा मिळाला म्हणून कोल्हेकुई करत चालले होते. हा निळा कोल्हा सिंहासनावर बसला होता. आपल्या जातभाईंचा आवाज ऐकल्यानंतर आपण कुठे बसलो आहोत, आपले स्थान काय आहे, हे विसरून तोही कोल्हेकुई करायला लागला. प्राण्यांच्या लक्षात आले की, अरेच्चा, हा तर कोल्हा. सर्वांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला फाडून टाकले. पंतप्रधानपदासाठी वरमाला घेतलेले असे कोल्हे कोण? या प्रश्नाचे उत्तर वाचकांनीच शोधावेपाण्यात राहणाऱ्या बेडकांची एकदा सभा भरली. त्या सभेत असा विषय आला की, मनुष्यजातीसाठी राजा असतो. जंगलातील प्राण्यांसाठीदेखील राजा असतो. पक्ष्यांचादेखील राजा असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांचादेखील राजा असतो. आम्ही कधी पाण्यावर तर कधी जमिनीवर राहतो, आम्हाला राजा नाही. या बेडकांनी, त्यांच्यातील शहाण्या जणांचे एक शिष्टमंडळ केले आणि ते प्रजापतीकडे पाठविले. या शिष्टमंडळाने प्रजापतीकडे राजा देण्याची मागणी केली.

 

प्रजापती त्यांना म्हणाला, “राजावाचून तुमचे काही अडले आहे का? राजा आला की तो कर लावेल, लढण्यासाठी सैन्य उभे करेल, त्यात तुम्हाला जावे लागेल. तुमच्यावर तो जुलूमही करेल.” पण बेडूक काही ऐकेनात. ते म्हणाले, ‘’काही का असेना पण आम्हाला राजा पाहिजे.” प्रजापतीने एक मोठा लाकडाचा ओडका बेडकांच्या तळ्यात टाकून दिला. बेडकांना आनंद झाला, पण त्याचा आकार बघून त्यांना भीतीदेखील वाटली. हळूहळू एक एका बेडकाने ओंडक्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ओंडकाच तो! त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो काही हालचालही करीत नव्हता, तसाच पडून राहिला. वाचकांनी या ओंडक्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बघू नये, अशी माझी नम्र सूचना. हा कसला राजा? म्हणून बेडकांचे शिष्टमंडळ पुन्हा प्रजापतीकडे गेले आणि त्यांनी हालचाल करणारा राजा मागितला. प्रजापतीने एका सापाला खाली टाकला. तो तळ्यात येताच त्याने पहिल्यांदा दोन बेडूक खाऊन टाकले. तो बेडकांना म्हणाला, “मी राजा आहे आणि मला खायला रोज दोन बेडूक पाहिजेत, ते मुकाट्याने द्या.” (आजच्या भाषेत मला वाटेल तेवढा भ्रष्टाचार करू द्या, माझ्या वाटेला जाऊ नका.)

 

राजाचे हे बोल ऐकल्यानंतर सर्व बेडूक घाबरले आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की, हे राज्य सोडून आता दुसरीकडे गेले पाहिजे आणि एका रात्रीतच सर्वजण पळून जातात. पंतप्रधानपदांच्या शर्यतीत असलेल्यांपैकी नको तो पंतप्रधान झाला तर आपल्याला मात्र देश सोडून जाता येणार नाही. अनाचार सहन करीत मुकाट जगावे लागेलआता तिसऱ्या गोष्टीकडे येतो. पहिल्या गोष्टीप्रमाणे ही गोष्टदेखील पंचतंत्रातीलच आहे. पक्ष्यांची एकदा सभा भरते. सभेचा विषय असतो-राजा. पक्ष्यांचा राजा गरुड, तो राज्यकारभार करण्याऐवजी विष्णूच्या सेवेतच मग्न असतो. म्हणून सर्व पक्षी ठरवितात की, गरुडाऐवजी आपण दुसऱ्या राजाची नियुक्ती केली पाहिजे. देवकार्यात गुंतलेल्या राजाची आपल्याला गरज नाही. नवीन राजा कोणाला करावे, याबद्दल खूप चर्चा झाली आणि चर्चेअंती निर्णय झाला की, आपल्यामध्ये बारीक नजर असलेला, धारदार चोच असलेला आणि सर्व दिशांना मान फिरवू शकणारा एक पक्षी आहे, त्याचे नाव घुबड. त्याला राजा करण्याचे सर्व पक्ष्यांनी ठरविले.

 

घुबडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी राजा होणार, या आनंदाच्या विश्वात तो रमला. दोन दिवसांनंतर राज्यभिषेक करण्याचा निर्णय झाला होता. या सभेत कावळा नव्हता. त्याला जेव्हा समजले की, घुबडाला राजा बनविण्याचे ठरविले आहे, तेव्हा तो सर्व पक्ष्यांकडे गेला आणि म्हणाला, “तुमचे डोके ठिकाणावर आहे का? आपण दिवसा उडणारे पक्षी आहोत. आपल्याला संरक्षणाची गरज दिवसा जास्त असते. रात्री आपण आपापल्या घरट्यात जातो. दिवसा घुबडाला दिसत नाही, तो दिवसआंधळा आहे, असला राजा आपल्या काय कामाचा?” सर्व पक्षी मिळून निर्णय करतात की, घुबडाचा राज्याभिषेक करायचा नाही. पण हा निर्णय त्याला कळवित नाहीत. घुबड आपल्या झाडावर पत्नीसहित राज्याभिषेकाची वाट बघत बसून राहतो. थोड्या वेळाने कावळा तेथे येतो. तो म्हणतो, “घुबडदादा, तुमचा राज्यभिषेक रद्द झाला. दिवसआंधळा राजा आम्हाला नको, असे ठरले आहे.” घुबडाला याचा खूप संताप येतो आणि नंतर त्याला कळते की, कावळ्यामुळे आपला राज्याभिषेक टळला. कावळा आणि घुबड यांच्यात हाडवैर तेव्हापासून निर्माण झाले, असे सांगतात. कुणामुळे कोणाचे पंतप्रधानपद हुकले आणि कोण कोणाचे हाडवैरी झाले, हे वाचक जाणत असल्यामुळे मी त्याबद्दल काही लिहित नाही.

 

अनेकांना मोदींच्या जागेवर बसायचे आहे. काहींना असे वाटते की, मोदी भाजपचे सर्वोच्च नेते असतील परंतु ते देशाचे सर्वोच्च नेते नाहीत. अनेक राजकीय नेत्यांना असेच वाटते. त्याबाबतीत आपण एवढेच म्हणू शकतो, ‘खयाल अपना अपना, पसंद अपनी अपनी’ मोदींचे स्तुतीपाठक न बनताही काही गोष्टी मोदींच्या बाबतीत अनोख्या आहेत. पहिली गोष्ट देश, समाज, संस्कृती या संदर्भातील मोदींचे व्हिजन अत्यंत स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, ’मी कोण आहे आणि मला देशाला कुठे घेऊन जायचे आहे?,’ याबाबतीत त्यांच्या धारणा स्पष्ट आहेत. तिसरी गोष्ट ते एक मिशन घेऊन जगतात आणि त्या ध्येयाला ते समर्पित आहेत. चौथी गोष्ट आपले ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल तो त्याग आणि वाटेल ते कष्ट करण्यास ते सदैव तत्पर असतात. पाचवी गोष्ट माझा देश प्रथम, पक्ष नंतर आणि मी सगळ्यात शेवटी ही त्यांची मनोभूमिका आहे. याबाबतीत त्यांची बरोबरी करू शकेल, असा कुणी नेता नाही. पवारांचे राजकारण पगडी आणि पागोटे यात घुटमळत असते. मायावतींचे राजकारण ‘दलित की बेटी’ याभोवती फिरत राहते. ममता बॅनर्जींचे राजकारण मुसलमानांच्या मतबँका करण्याच्या भोवती केंद्रित झालेले असते. अखिलेश यादव यांचे राजकारण म्हणजे यादवगिरी आणि राहुलचे राजकारण म्हणजे मी पंतप्रधान होण्यासाठीच जन्माला आलेलो आहे, या घमेंडीचे असते. पंतप्रधान कोण होणार किंवा कोणाला होऊ द्यायचे, याचा निर्णय आपणच करायचा आहे. आम्ही कोण आहोत, तर या देशाची सार्वभौम प्रजा आहोत. आपल्या निर्णयावर आपले सुख आणि दुःख आणि येणाऱ्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, एवढेच फक्त लक्षात ठेवले पाहिजे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/