डिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरेल : उपराष्ट्रपती

24 Oct 2018 15:56:18


 
 
मुंबई : देशात हवामान आधारित असणारी शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट आणि खर्च कमी होण्यास मदत झाली तर डिजीटल सोल्युशन शेतकऱ्यांसाठी योगदान ठरेल, त्यामुळे शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. पवईतील आयआयटी मुंबईच्या पंचविसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या 'शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतीच्या प्रश्नांबाबत मला जाणीव आहे. सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत शेतीच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ‘एएफआयटीए’ आणि ‘डब्ल्यूसीसीए’ या दोन आंतराराष्ट्रीय स्तरावरील संस्था एकत्र येत या परिषदेचे आयोजन करतात हे कौतूकास्पद आहे. देशातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा त्यावर परिणाम होत असतो, अशा विचित्र परिस्थितीत पीक घेण्यासाठी खर्च वाढतो आणि त्यातुलनेने उत्पादन अल्प येते. म्हणून शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. शेतीचे उत्पादन दुप्पट करतानाच त्यावरील खर्च कमी करता आला पाहिजे. सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषेदेतील संशोधकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.
 
कार्यक्रम प्रसंगी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तावडे म्हणाले की, ईस्त्रायलमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीतील खर्च कमी करून उत्पादकता वाढवली जाते. त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरून आपल्या देशातील शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीवर भर द्यावा. देशभरात महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करण्यात आली. गांधीजींनी 'खेड्याकडे चला' असा संदेश दिला होता. त्यानुसार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. शेतीसाठी पाणी (गंगा) उपयुक्त आहे तशी आधुनिक तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0