INDvsWI : दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत

24 Oct 2018 22:26:44
 

विराटने मोडला सचिनचा आणखी एक विक्रम


विशाखापट्टणम : प्रत्येक सामन्यागणिक धावांची अक्षरशः बरसात करणारा आणि दर डावात कोणत्या ना कोणत्या विक्रमाला गवसणी घालणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक वेगवान १० हजार धावांचा विक्रम मोडला. वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२९ चेंडूत नाबाद १५७ धावांची खेळी साकारत विराटने एकदिवसीय सामन्यांतील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. मात्र, हा विक्रम नोंदवला जात असतानाच, दुसरीकडे भारतीय संघ हा सामना मात्र जिंकू शकला नाही, आणि अखेरच्या षटकात सामना बरोबरीत सुटल्याने ‘सिंह आला पण गड गेलाअशा शब्दांत या सामन्याचे वर्णन करण्यात आले.

 

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात अडखळत झाली परंतु विराट कोहलीची ही दीडशतकी खेळी आणि त्याला अंबाती रायडूने (८० चेंडूत ७३) दिलेली सुंदर साथ यांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ६ बाद ३२१ अशी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना, विंडीजची सुरूवातही काहीशी अडखळतच झाली. ११.६ षटकात ३ बाद ७८ अशी अवस्था असताना ४ थ्या विकेटसाठी एसडी होप आणि हेटमायर यांच्या १४३ धावांच्या भागीदारीने विंडीजला तारले. विंडीज ३२२ धावांचे आव्हान गाठणार असे वाटत असतानाच अखेरच्या काही षटकांत विंडीजची थोडी पडझड झाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ५ धावा आवश्यक असताना होपने चौकार मारला आणि सामना टाय झाला. १२३ धावांची खेळी साकारणारा होप आणि भक्कम सुरेख साथ देणारा हेटमायर (९४) हे विंडीजच्या या डावाचे खरे हिरो ठरले. मात्र, १५७ धावांची दणदणीत खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या खेळीद्वारे विराटने सचिन तेंडुलकर यांचा आतापर्यंत अबाधित असलेला सर्वाधिक वेगवान १० हजार धावांचा विक्रम मोडला. तेंडुलकर यांनी २६६ सामन्यांत २५९ डावांत हा विक्रम केला होता तर विराटने केवळ २१३ सामन्यांत २०५ डावांत १० हजारांचा टप्पा गाठत हा विक्रम मोडला. या सामन्यातील शतक हे विराटचे एकदिवसीय कारकिर्दीतील ३६ वे शतक ठरले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0