पवारांची मैदानाबाहेर ’खेळी’

    दिनांक  24-Oct-2018   
 
 

गेली बारा वर्षे खो-खो असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता पुतण्यालाही काकांप्रमाणे वेध लागले ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे. आता हा फक्त खुर्चीचा प्रश्न असावा, असे वाटणाऱ्या अनेकांना खरे ठरवित अजित पवारांनी चार दिवसांत सगळे खेळ बदलले. खेळात राजकारण नको, असं नेहमीच वरवर भासविणारे सर्वच राजकारणी खेळांच्या मैदानातनेतृत्वकरायला उतरले, त्यात अजित पवार काही मागे नाहीत. काकांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कबड्डीकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला. कारण जवळजवळ २८ वर्ष शरद पवार महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी होते, त्यामुळे अजित पवारांनी लागलीच खो-खोच्या खुर्चीला खो देत आपला मोर्चा वळविला तो कबड्डीकडे. आता यातही मे महिन्यात होणारी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक पवारांच्या कृपेने नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. २०१३ सालीसुद्धा अजित पवारांच्या कारकिर्दीत असा सुवर्णयोग आला होता, तेव्हा मात्र त्यांनी आपण खो-खोशी एकनिष्ठ आहोत असे दाखवत, कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग केला होता. मात्र, आता पुन्हा कबड्डीकडे पवारांची पावले का बरे वळली असतील? असे प्रश्न खरंतर पडू नयेत, पण काकांच्या आज्ञेबाहेर आपण नाही, हे दाखविण्याचा यापेक्षा चांगला योग ज्युनिअर पवारांना मिळाला नसता. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखत चार दिवसांत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राज्य संघटनेने पाठवलेली नावे फक्त कागदावरच राहिली आणि अगदी आपसूकपणे अजित पवार मैदानात उतरले. राज्य संघटनेकडून राज्यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून सध्याचे अध्यक्ष किशोर पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते, पण सगळी सूत्रे पवारांच्या हाती असल्याने, अर्थातच अध्यक्षपदासाठी फक्त अजित पवारांचे नाव गेले आणि मग तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो, त्याप्रमाणे राज्य संघटनेने किशोर पाटील अध्यक्षपदासाठी उत्सुक नाहीत, असे सांगितले. यामुळे राज्यसंघटनेतील भावी वाटचालींना दुजोरा तर मिळालाच, पण आता जर ही निवडणूक बिनविरोध वगैरे झाली आणि अजित पवार अध्यक्षपदी वगैरे आले, तर अजिबात आश्चर्य वाटायचं नाही, कारण शेवटी हा खेळ खुर्चीचा ना...

दस हजारी कोहली

 

सध्याच्या क्रिकेटविश्वात दोन प्रकारचे खेळाडू आढळून येतात, एक जे सतत विक्रम करत असतात किंवा दुसरे जे संघाला सामने कसेही जिंकून देऊ शकतात. मात्र भारताचा कर्णधार या दोन्ही चौकटींच्या बाहेर आहे, कारण तो नेहमीच नवनवीन विक्रम करत असतो, संघाला सामने जिंकून देत असतो म्हणजे सकाळी उठावं आणि आपला दिनक्रम पाळावा तसं त्याचं झालं आहे. जगातील प्रत्येक गोलंदाज हे विराटसाठी व्यूहरचना वगैरे आखत असतील आणि तेवढ्याच कौशल्याने तो या व्यूहरचनेतून बाहेर पडून नवनवीन विक्रमांना गवसणी घालत असतो. मग त्यात दस्तुरखुद्द सचिनचेही विक्रम त्याने सोडले नाही. एका मुलाखतीत सचिनला जेव्हा तुझे विक्रम कोण मोडेल?, असे विचारले तेव्हा त्याने विराटचेच नाव घेतले कारण शेवटी सचिनलाही बाळाचे पाय पाळण्यात दिसलेच होते. अनेक वेळा टीकेचा धनी झालेल्या विराटने नुकतेच वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात सचिनची ही भविष्यवाणी खरी ठरविली आणि त्याने अवघ्या २०५ सामन्यांत दहा हजार धावांचा पल्ला गाठला, जे करायला सचिनला २५८ सामने लागले. त्यामुळे सर्वांच्या नजरेत सचिनची जागा चालविणारा खेळाडू अशी विराटची छबी असली तरी, त्याने स्वत: अनेकदा त्याच्या वेगळ्या खेळीने ही छबी पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. केवळ त्याच्या आक्रस्ताळ्या स्वभावाकडे बोट दाखविणारे अनेक असले तरी, त्याने आपली जागा सगळ्यांनाच दाखवून दिली. मग कर्णधारपद असो (हीदेखील शास्त्रींची कृपा असे लोक म्हणतील) किंवा त्याची खेळातील एकाग्रता, त्याचा फिटनेस यामुळे तो जगातील काही मोजक्या चांगल्या खेळाडूंपैकी एक झाला आहे. क्रिकटचे वाढते स्वरूप आणि वाढते सामने याचा फायदा या सगळ्या नवख्या खेळाडूंना होतो, यात काही वाद नाही, मात्र एकूणच वाढलेल्या स्पर्धेमुळे खेळाडूंना संधी मिळतानाही कठीण झाले आहे. मात्र, तरी ही विराटच्या खेळाचे कौतुक करणे भाग आहे. तरी, दहा हजारांचा पल्ला त्याने जेवढ्या कुशलतेने पार केला, तेवढ्याच कुशलतेचा कर्णधार बनू शकेल का, यात थोडी शंका असली तरी, सध्या त्याच्या फॉर्मचा फायदाच भारतीय संघाला होईल यात काही दुमत नाही...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/