‘शी कॅन ड्राईव्ह’

    दिनांक  23-Oct-2018   


४००हून अधिक महिलांना प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली महिला वाहन प्रशिक्षक स्नेहा कामत हिची प्रेरणादायी कहाणी...


महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सध्या बाहेरच्या जगात वावरत आहेत, हे पुरुषांनीदेखील मान्य केले आहे. मात्र, एक बाब अशी आहे ज्यात पुरुषांना आपणच श्रेष्ठ आहोत असे वाटते. ती बाब म्हणजे चारचाकी गाडी चालविणे. अजाणतेपणी किंवा मुद्दाम बऱ्याच वेळा महिलांच्या ड्रायव्हिंगवर विनोद आणि थट्टा आपण सर्रास करतो. म्हणजे कोणी गाडी चुकीच्या दिशने वळवली की, आपसूक ‘बाई चालवते आहे वाटतं,’ असं बोललं जातं. पण ही अशीच मस्करी एका बाईनेच मनावर घेऊन, एक अनोखं स्वप्न पाहिलं आणि तिने ते पूर्णही केलं. ती स्त्री म्हणजे ‘स्नेहा कामत.’ काही वर्षांपूर्वी अशीच तिच्या मित्राने केलेली मस्करी तिच्या जिव्हारी लागली आणि आज ती भारतातील पहिली महिला वाहनप्रशिक्षक ठरली. महिलांना चारचाकी गाडी चालविण्याचे शिक्षण देण्यासाठी २०१२ साली त्यांनी ‘शी कॅन ड्राईव्ह’ हा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी गाडी चालविण्याचे सुमारे ४०० महिलांना प्रशिक्षण दिले आहे. नुकतेच भारताच्या ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

मुंबईत वाढलेली स्नेहा लहानपणापासूनच मुक्त विचारांची होती. पण घरच्या परिस्थितीमुळे तिला सगळ्याच गोष्टींसाठी तडजोड करावी लागली. आई-बाबा लहानपणीच वेगळे झाल्यामुळे स्नेहा कधी आपल्या आजी- आजोबांकडे, तर कधी बाबांकडे, तर कधी आईकडे राहायची. त्यामुळे कमी वयातच स्नेहावर जबाबदाऱ्या पडू लागल्या. त्यात सतराव्या वर्षी बाबांच्या निधनानंतर तिने एका दुकानात हजार रुपये महिना सेल्सगर्ल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८व्या वर्षी स्नेहाला वाढदिवसादिवशी तिच्या भावाने गाडी चालवायला शिकवले आणि त्यानंतर ती आणि गाडी यांचा प्रवास सुरू झाला. तिच्या गाडी चालविण्याचे प्रेम हे केवळ चारचाकी वाहनापुरते मर्यादित नसून तिने सहा हजार किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवरूनही केला आहे. वयाच्या केवळ २३व्या वर्षी स्नेहाने आपण स्वत: काहीतरी करायचे ठरविले आणि ती वाहन प्रशिक्षक होण्यासाठी धडपड करू लागली. समाजशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कुणास ठाऊक कसे पण, तिला ड्रायव्हिंगचे वेड लागले. मध्यंतरीच्या काळात ती इतर अनेक क्षेत्रांत आपलं नशीब आजमावत होती. तिच्या घरच्यांना वाटले की, ती चित्रपट खूप पाहते म्हणून केवळ हे असावे. काही काळाने तिचे लग्नही झाले. बाळंतपणाच्या दिवसांत स्नेहा अनेक इंग्रजी चित्रपट पाहत होती आणि तिच्या मनात पुन्हा एकदा तिच्या सर्वात पहिल्या बाळाने म्हणजे ड्रायव्हिंगने जन्म घेतला आणि नंतर तिने ड्रायव्हिंगलाच आपले ध्येय केले. आज तिने जवळ जवळ ४००हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. स्नेहाच्या मते, ”स्वप्न पाहण्यासाठी जी वृत्ती लागते, ती माझ्याकडे होती पण, मला हवातसा पाठिंबा कधीच मिळाला नाही. त्यामुळे नक्की काय करायचं आहे, हे शोधण्यासाठी माझ्या आयुष्याची बरीच वर्षं गेली.” स्नेहा आज तरुण उद्योजिका असली तरी, तिच्या संघर्षात तिला पाठबळ देण्यात तिच्या विद्यार्थ्यांचाही खूप मोठा हात होता.

 

शहरातील महिला या मोठ्या प्रमाणावर वाहन प्रशिक्षण केंद्रात जाऊन वाहन चालवायला शिकतात पण, तिथे बऱ्याचदा प्रशिक्षक हे पुरुष असल्यामुळे मुलींना चुकीच्या प्रकारचा स्पर्श केला जातो. असाच काहीसा अनुभव स्नेहालाही आला. ”मी पाहिलं आहे, शहरात पुरुष प्रशिक्षक महिलांना नीट शिकवत नाहीत आणि ‘त्या फक्त टाईमपास करायला आल्या आहेत’ या पूर्वविचारानेच त्यांना शिकवितात. त्यामुळे ज्या महिलांना खरंच ड्रायव्हिंग शिकायचे असते त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. म्हणून मी हा निर्णय घेतला,” असं म्हणत स्नेहाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. पण महिलांना शिकवणे खरंच तेवढे सोपे नसते, हेही स्नेहा कबूल करते. मुळात व्यावसायिक होणे हे एकमेव क्षेत्र असे आहे, ज्यात सगळ्यांना उतरायचे असते; पण या क्षेत्रात टिकाव धरणे, सगळ्यात कठीण असते. ‘शी कॅन ड्राईव्ह’ हा उपक्रम केवळ स्नेहाचा पहिला प्रयोग होता पण, एकेदिवशी तिच्या ५८व्या वर्षांच्या विद्यार्थिनीने स्नेहाला आपले दु:ख सांगितले आणि स्नेहाने हा उपक्रम चालू ठेवण्याचा निश्चय केला. तिच्या विद्यार्थिनी असलेल्या लिला देशपांडे यांना गाडी चालविणे शिकायचे होते पण, त्यांच्या घरच्यांनी त्यांना कधीच पाठिंबा दिला नाही. का तर, शिकून काय करणार? चुकीच्या पद्धतीने गाडी चालविणार ना? या टोमण्यांतून आणि विनोदातून बाहेर काढण्यासाठी स्नेहाने हा उपक्रम चालू ठेवला. आणि लिला यांना तिने अवघ्या दहा दिवसांत गाडी चालवायला शिकवली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्नेहासाठी तिच्या कामाची पावती होती. त्यानंतर स्नेहाने ‘दहा दिवसात ड्रायव्हिंग शिका’ असाच उपक्रम सुरू केला. स्नेहाच्या एका स्वप्नामुळे आज लिला यांच्यासारख्या शेकडो महिला आपलं स्वप्न पूर्ण करत आहेत आणि कधीतरी निदान महिलांच्या गाडी चालविण्यावरचे टोमणे, मस्करी कमी होईल, या अपेक्षेने काम करणारी ही ‘फर्स्ट लेडी’ नक्कीच येणाऱ्या बदलांची प्रणेती आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/