अनुसूचित जाती, नवबौद्धांना अनुदानावर शेतजमीन
जळगाव, २१ ऑक्टोबर
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता शासनातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे, असे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ही योजना २ जून, २००४ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान या नावाने सुरू झाली आहे.
१४ ऑगस्ट २०१८च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्याना १०० टक्के अनुदानावर (मोफत) जमीन मिळणार आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत रु ५ लाख प्रतिएकर किंवा २ एकर ओलिताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रु. ८ लाख प्रतिएकर असणार आहे. लाभार्थ्याचे किमान वय १८ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे, निर्णयात म्हटले आहे. यामुळे लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.
निवडीला प्राधान्यक्रम
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परितक्त्या स्त्रिया, दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त इच्छुक पात्र लाभार्थ्यांने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी कळविले आहे.
https://www.facebook.com/Tarunbharatjal/