गरजू रुग्ण व सोबतच्या आप्तांसाठी विनामूल्य ताजे, पौष्टिक भोजनरा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीचा ‘सेवालय’ प्रकल्प: रोज सुमारे १०० जणांना लाभ

22 Oct 2018 13:20:00
 
 
 
 


गरजू रुग्ण व सोबतच्या आप्तांसाठी विनामूल्य ताजे, पौष्टिक भोजन
रा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीचा ‘सेवालय’ प्रकल्प: रोज सुमारे १०० जणांना लाभ

जळगाव, २१ ऑक्टोबर
ज्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येणे भाग पडते पण येथे काळजी, देखभाल करण्यासाठी कुणीच नाही, आणि जेवणाचीही व्यवस्था नाही..., अशा गरजूंसाठी अथांग मानवताधर्म भावनेने कार्यरत आहे दिलासादायी ‘सेवालय’ प्रकल्प.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रशस्त जागेत गेल्या ५ वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे. त्यात सध्या रोज सकाळी ९ च्या सुमारास ६० जणांना नाश्ता (उसळ, उपमा, पोहे आदी) आणि सकाळी ११ वाजता सुमारे १०० जणांना ताजा, पौष्टिक व सात्विक आहार सन्मानपूर्वक व प्रेमभावनेने विनामूल्य पुरवला जात आहे. वर्षभरातील सर्व ३६५ दिवस ही सेवा देण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला जात आहे.
 
समाधानाची बाब...
अन्य काही ठिकाणीही अशी सेवा काही समाजसेवी देतात, पण त्याचा गैरफायदा काही आळशी, कामचुकार, व्यसनी लोक घेतात, आणि अपप्रवृत्तींना बळ मिळते. परिणामी सद्भावनेने खर्ची पडलेला पैसा, वेळ व श्रम मातीमोल ठरतात, असा संतापजनक अनुभव आहे. मात्र येथे खर्‍याखुर्‍या गरजूंनाच ही सेवा मिळावी, याची दक्षता घेतली जाते. ही समाधानाची बाब आहे, हे विशेष.
 
संघाचे तृतीय सरसंघचालक स्व.मधुकर दत्तात्रय देवरस यांनी संघाच्या दैनंदिन शाखांसमवेतच सेवा कार्यावर भर दिला पाहिजे, हा आग्रही विचार मांडल्यानंतर १९८९ मध्ये जळगावच्या प्रतिभा बँक चौकातील चौबे शाळेत भरणार्‍या गुरुगोविंदसिंग प्रभात शाखेत स्वयंसेवकांच्या सुसंवादात आपणासही काही समाजसेवी प्रकल्प हाती घेता येईल, यावर मंथन झाले. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दूरवरून येणार्‍या रुग्ण आणि त्यांच्या समवेतचे आप्त यांच्या ज्या समस्या अडचणी असतील, त्यांचे निवारण करण्याचे ठरले. त्यानुसार संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व.माधवराव गोळवलकर यांच्या जन्मदिनी गुरुवारी ७-८ स्वयंसेवक जिल्हा रुग्णालयात जाऊ लागले, भेटीगाठी घेऊ लागले. पुढे एक विचित्र व वेदनादायक प्रकार लक्षात आला, तो म्हणजे एका रुग्णाचे नातलग मध्यवर्ती, बाजारपेठेच्या ठिकाणी भीक मागताना आढळले. चौकशीअंती ते अन्नासाठी, जेवणासाठी ही याचना करीत असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब मनाला लागल्याने आपण अशा गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, असा विचार पुढे आला. योगायोगाने संघ कार्यकर्ते अमृत शंकर पाटील (रा.शनिपेठ) यांचे रुग्णालयाच्या आवारातच झुणका भाकर केंद्र होते, तेथून रोज जेवण विकत घेत गरजूंना ते देण्यात येई. दिवसेंदिवस १०, २५, ३५ अशी संख्या वाढत, त्याच्या एकूणच स्वरूपात बदल होत सध्या रोज १०० च्या आसपास गरजूंना भोजन दिले जाते. या वितरणासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आवारातच मध्यभागी असलेली शवचिकित्सा कक्षाची जागा रिकामी आणि साफसफाई करून उपलब्ध करून दिली. रुबल अग्रवाल या जिल्हाधिकारी असतानाच्या काळात तेथे २ खोल्यांची छोटी वास्तू जनकल्याण समितीने उभी केली. ५ मार्च २०१६ रोजी त्यांच्या आणि फैजपूरचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक लोकार्पण झालेले आहे. तसेच दिवसभर थंड पाण्याचीही ‘या नळ (तोटी) सुरू करा, अन् पाणी पिऊन-घेऊन जा’ अशी सोयही उपलब्ध आहे. नागरिकांनी यथाशक्ती वाटा उचलावा, आपल्या प्रिय जनांच्या आठवणी जागवत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात, भोजनसेवेत सहभागी व्हावे. समाजाच्या दातृत्वावरच हा आनंद, समाधान देणारा सेवाप्रकल्प सुरू आहे व राहील, असा विश्‍वास असल्याने सर्वच शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि यंत्रणा तसेच सामाजिक सेवा संस्थांसह अनेक सुजाण, संवदेनाक्षम नागरिकांचे हात या प्रकल्पाला सहाय्यभूत होत पुढे सरसावत आहेत. (अधिक माहितीसाठी संपर्क जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह विनोद कोळीः ९४२०२६९३६१ )
 
 
श्यामलाताई आणि विष्णूचे औदार्य
 सावद्यातील सामाजिक कार्यकर्त्या, माजी खा.गुणवंतराव सरोदे यांच्या पत्नी श्यामलाताई यांचे १० रोजी निधन झाले. यांच्या इच्छेनुसार उत्तरकार्याचा विधी न करता आणि तीन दिवसाचे सुतक पाळून या प्रकल्पातील १०० रुग्णांना ११ दिवस रोज मोफत जेवण देण्यात आले.
तसेच या सेवाकार्यामुळे प्रभावित विष्णू बाणाईत या युवकाने आपल्या गावी कुर्‍हे पानाचे येथे आपल्या सलूनवर मदतनिधीसाठी दोन डबे ठेवले होते. आणि लोकसहभागाने ते पूर्ण भरल्यावर ती रक्कम सेवालयाला दिली.
जास्त पसंती मिष्टान्न भोजन देण्याला ... पूर्वज, आप्तजन यांच्या जन्म वा निर्वाणदिनी दानशूर, सश्रद्ध नागरिक या गरजूंना भोजन देतात. ३ प्रकारच्या भोजन व्यवस्थेत साधे जेवण-भाजी, पोळी ( १०० जणांसाठी १५०० रु.देणगी), पूर्ण ताट-वरण, भात, पोळी-भाजी (२५०० रु.देणगी), पूर्ण ताट, मिष्टान्नासह- शिरा, जिलेबी, बुंदीलाङू इ. पैकी १ गोड पदार्थ (३५०० रु.देणगी) असे पर्याय आहेत. दानशुरांचा मिष्टान्न भोजन देण्याकडे जास्त कल आहे.
एकात्मता अन् भोजन मंत्राद्वारे चिंतन
‘रुग्णमित्र’ म्हणून सेवा बजावणारे निंबाभाऊ सोनवणे व पराग महाशब्दे रोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळात सर्व १० प्रभागांमध्ये स्वत: हिंडून, रुग्णांची विचारपूस करतात व अन्य समस्या जाणून घेतात. ज्यांना जेवण पुरविणे आवश्यक आहे, त्यांची नोंद घेत त्यांना कुपन देतात. त्यानुसार सकाळी ११ वाजता सर्व गरजू कुपनसह सेवालयासमोर एकत्र येत रांगेत थांबतात. याचवेळी या प्रकल्पातील कार्यकर्ते एकात्मता मंत्र म्हणतात, नंतर रांगेतील सर्व जणांकडून ‘भोजन मंत्र’ (मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी हे अन्न सेवणार, घडो माझीया हातूनी देशसेवा, म्हणोनी मिळावी मला शक्ती देवा’) वदवून घेतात. कुपन जमा करून जेवण दिले जाते. काही जेवण घेण्यासाठी सोबत डबे, भांडीही आणतात. या वितरण व्यवस्थेत किमान ४ जण आवश्यक असतात. हे अन्नपदार्थ बंद मोठ्या डब्यात वा कागदी पिशवीत केशवस्मृती सेवा समूहाच्या क्षुधा शांती केंद्राकडून (नवीन बसस्थानकालगतचा सेवाभावी प्रकल्प) विशेष वाहनाने काही क्षण आधी मागवलेले असते.
ज्यांना जेवण मिळणे कठीण, त्यांच्यासाठी पौष्टिक, सात्विक भोजन
देणगीदारांच्या सहकार्याने
वर्षभर भोजन देण्याचा प्रयत्न
सायंकाळी १० वॉर्डात प्रत्यक्ष भेट देत गरजूंना कुपन वाटप
 
Powered By Sangraha 9.0