मी टू = मिटून गेलेले

    दिनांक  22-Oct-2018   ‘मी टू’ची चळवळ जोर धरत आहे. मी लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज ज्या चळवळीद्वारे उठवल्या त्या चळवळीबद्दल बोलत नाही हो. मी आपल्या दुसऱ्या ‘मी टू’ चळवळीबद्दल बोलते. ही दुसरी ‘मी टू’ चळवळ आहे, त्या लोकांची ज्या लोकांचे राजकीय बस्तान आज मिटू लागले आहे. या बरीवाईट कारकीर्द असणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व मिटू लागले आहे. त्यामुळे त्यांचीही ‘मी टू’ची चळवळ जोरात आहे. मिटू लागताना ते अमली पदार्थ घेतलेल्या पोपटाप्रमाणे ‘मिटू मिटू’ बोलू लागलेत इतकेच. २०१४ सालच्या जबरदस्त सत्तापालटात बऱ्याच स्वयंघोषित नेत्यांची आणि राजकीय पक्षांची चळवळ म्हणा किंवा वळवळ म्हणा मिटून गेली. आता २०१९ जवळ येऊ लागले आहे. त्यामुळे हे मिटू लागलेले स्वयंघोषित नेते, राजकीय पक्ष हे स्वतःच्या वकूबाप्रमाणे मिटू मिटू करत आहेत. या राजकीय मिटूचे उत्तम उदाहरण आहेत उद्धव ठाकरे. अर्थात त्यांच्यासोबत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तसेच अशोक चव्हाण आहेतच. झालेच तर मेधाबाई पाटकर पण आहेत, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे मंडळीही मिटूचा गजर करतच आहेत. तसे पाहायला गेले तर या सगळ्या जणांचे वरवर दिसणे, बोलणे वेगळे वाटते. पण बारकाईने पाहिले तर या सगळ्यांच्या मनात खदखदणारा ‘मिटू’ पटकन जाणवतो. आपण मिटत चाललोय, आपल्याला कोणी विचारेनासे झाले, आता राजकीय कारकिर्दीचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या फायद्याचे काय होणार? सत्ता नाही, अस्तित्व नाही. मग जगायचे कसे? जगावे की मरावे, असे या मिटूवाल्यांना वाटत आहे. त्यामुळे सध्या हे सर्वजण एका स्वरात मिठू मिठू, सॉरी ‘मिटू मिटू’ करत आहेत. ही सगळी मंडळी जनतेच्या कल्याणाविषयी काही बोलतील तर शपथ. यांचा सगळा रोख नरेंद्र मोदींकडे. बरं, आरोपही करतील ते बालिश किंवा धादांत खोटेच असतात. कारण जाहीर आहे की, या सर्वांच्या राजकीय अस्तित्वाला सामान्य घरातल्या आणि त्यातही रा. स्व. संघाचा स्वयंसेवक असलेल्या नरेंद्र मोदी या माणसाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवलेल्या मिटू चळवळीचा न्यायालय समाचार घेईलच. पण या मिटू पाहणाऱ्या राजकारणाच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या बेताल बडबडीला जनता मतदानातून कायमची मिटवेल, यात शंका नाही.

 

‘मी टू’च्या निमित्ताने

 

आता मात्र ओरिजनल ‘मी टू’ चळवळीबाबतच बोलत आहे. बाहेरच्या लोकांकडून ‘मी टू’ होणे हे क्लेशदायक असले तरी त्याहीपेक्षा भीषण असते, आपल्याच लोकांकडून ‘मी टू’ होणे. या पार्श्वभूमीवर विरारची एक बातमी मनात घर करून गेली. दोन सख्ख्या बहिणींची दोन सख्ख्या भावांबरोबर लग्ने झाली. सासरच्यांना चार लाख रुपये हुंडा हवा होता. बहिणींचे माहेर गरीब. तरीही आपल्यापरीने हुंड्याची रक्कम त्यांनी दिली. पुढे सासरच्यांनी या दोन सुनांचे अतोनात हाल केले. माहेरचे हुंडा देऊच शकत नाही, हे पाहून सासरच्यांनी दोघींना मूळ गावी राजस्थानला नेले. तिथे काही दिवस हे कुटुंब राहिले. पुढे सासरच्यांनी या दोन्ही सुनांना विरारला परत पाठवले. सोबत एका व्यक्तीलाही पाठवले. या दोन स्त्रिया जेव्हा विरारला उतरू लागल्या तेव्हा, “तुमच्या सासरच्यांनी दीड लाख रुपयांना तुम्हाला विकले आहे,” असे म्हणून त्यांच्या सोबतची व्यक्ती त्यांना उतरूच देईना. पुढे ट्रेनमधल्या एका कुटुंबाने त्या दोघींची सुटका केली. या अशा घटना फक्त हिमनगाचे टोक आहे. आजही राज्यातल्या कोणत्याही वेश्याबाजारात गेलात की तिथे मेलेल्या मनाने तुटलेल्या देहाचा बाजार मांडणारी ती दिसते. ती तिथे कशी पोहोचते? मुंबईतल्या वेश्यावस्तीत तर असे चित्र दिसते की, ८५ टक्के मुली-महिला या पश्चिम बंगालच्या असतात. त्या या वस्तीत त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात. तिचा पतीच तिची दलाली करतो. त्याची पहिली बीबी मुल्कात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये असते. पहिल्या बीबीला भरपूर मुलंबाळं असतात. घर चालवणं कठीण होतं. मग गावातल्या गरीब मुलीशी दुसरा निकाह केला जातो. तिला शहरात आणलं जातं आणि या क्रूर धंद्यात ढकललं जातं. वर्षभर धंदा करायचा आणि ईदला किंवा इतर सणाला भरपूर पैसे घेऊन घरी जायचे. या दुसऱ्या बिबीला मूलही होऊ दिलं जात नाही. कारण गॅरंटी नाही की, तिची दलाली करणाऱ्या त्या शरीफ नवऱ्याचेच ते बाळ असेल. छे! या महिलांचे जीवन म्हणजे जळजळीत नरक आहे. त्या नरकात या महिलांचे मन, शरीर प्रत्येक क्षणी होरपळत असते. त्यांची ‘मी टू’ चळवळ सुरू होईल का? शोषित वंचितांचे लढे लढणारे आणि मुक्तीचे पोकळ नारे देणारे यांच्या कक्षेत या गुराढोरांप्रमाणे दररोज देहाची बोली लागलेल्या महिला येत नाहीत का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/