आजकल पाँव जमीं पर...

    दिनांक  22-Oct-2018   


 


काँग्रेससारख्या जुन्या, ऐतिहासिक आणि कित्येक दशकं देशावर अव्याहतपणे राज्य करणाऱ्या पक्षात आज कुणीतरी पाय जमिनीवर असलेला नेता शिल्लक आहे, ही एक आनंदाची बाब आहे. आता त्याचे पाय त्याने स्वतःहून जमिनीवर ठेवले आहेत की कुणा अन्य व्यक्तीने आणले आहेत, हा प्रश्न आपण तूर्तास बाजूला ठेऊ. ते जमिनीवर आहेत, हे महत्त्वाचं आणि त्याचीच या पक्षाला आज सर्वाधिक गरज आहे. हे नेते म्हणजे सलमान खुर्शीद. होय, तेच सलमान खुर्शीद जे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारमध्ये देशाचे परराष्ट्रमंत्री होते. तेच हे खुर्शीद ज्यांचा केंद्रीय मंत्री असतानाचा तोरा पाहून भलेभले तोंडात बोटं घालत. आपण जणू आजन्म सत्तेत राहणार आहोत आणि आपल्याला येथून कोणीही हटवू शकत नाही, अशा थाटात वावरणारे हेच ते सलमान खुर्शीद. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील फारूखाबाद मतदारसंघातून खुर्शीद यांचा दारूण पराभव झाला, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आणि हे केंद्रीय परराष्ट्रमंत्री या निवडणुकीत चौथ्या स्थानावर फेकले गेले. बहुधा यानंतर त्यांचं विमान जमिनीवर आलं असावं. ते खरोखरच आलं आहे की नाही, हे सांगता येणं अवघड आहे परंतु, खुर्शीद यांचं ताजं वक्तव्य पाहता तशी किमान आशा तरी करायला नक्कीच हरकत नसावी. काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येणं अशक्य आहे, अशी कबुली नुकतीच खुर्शीद यांनी दिली. खुर्शीद यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने असं वक्तव्य केल्यामुळे साहजिकच ही मोठी बातमी झाली. त्यातच, काँग्रेसला स्वबळावर सत्तेत यायचं असेल, तर पक्षाला आणखी ५ वर्षे कठोर परिश्रम करावे लागतील, असाही डोस त्यांनी दिला. खुर्शीद यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये आजकाल थोड्याच संख्येने उरलेल्या जाणत्यांना, सूज्ञांना थोडंफार हायसं वाटलं असेल. अर्थात, हे खुर्शीद म्हणजे फार कोणी धुतल्या तांदळाचे नव्हेत. एकीकडे उच्चभ्रू, हाय-प्रोफाईल चेहरा दाखवायचा, दुसरीकडे मुस्लीम कट्टरपंथीयांशी जवळीक बाळगून आपली मुस्लीम ओळख अधोरेखित करायची, असा खेळ खुर्शीद महोदयांनी अनेक वर्षे केला. त्यामुळे खुर्शीद म्हणजे कोणी साधू-संत नव्हेतच, पण त्यांनी किमान मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रयत्न तरी केला. आता या घंटेचा आवाज सुस्त मांजराच्या कानात पोहोचतो आणि त्यातून मांजर काही अर्थबोध घेते की, आपल्या टिवल्या-बावल्या चालूच ठेवते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

 

रोज मरे, त्याला कोण रडे?

 

मध्य प्रदेश-छत्तीसगढमध्ये गोंडवाना पक्षाने काँग्रेसला चांगला धक्का दिला. दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युतीचा प्रश्नच नाही, असं सांगत पक्षप्रमुख हिरासिंह मरकाम यांनी काँग्रेसला अक्षरशः झटकून टाकलं. शिवाय, या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचीही घोषणा त्यांनी केली. अर्थात, सध्या काँग्रेससोबत जे सुरू आहे, ते पाहता हे असं झटकून टाकणं काही नवं नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगढसह राजस्थानात काँग्रेसची बसप आणि समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा होती परंतु, मायावती आणि अखिलेश यादव या दोघांनीही काँग्रेसला टांग दिली. या राज्यांच्या गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकांत तसंच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारचौघात सांगताही येणार नाही, इतकं दारूण अपयश मिळालं होतं. आता २०१९ तोंडावर असल्याने काँग्रेसला या राज्यांत आपली थोडीफार ताकद दाखवून लोकसभेसाठी पक्षाचा आत्मविश्वास पुन्हा मिळवायचा आहे. हे एकट्याने होण्याची शक्यता नसल्यामुळे इतर पक्षांची काँग्रेसला नितांत गरज होती परंतु, या सर्वच पक्षांनी काँग्रेसची साथ सोडली आणि काँग्रेस पुन्हा तोंडावर आपटली. हे असं का होत असावं? वास्तविक, उत्तर प्रदेशात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बसप आणि सपने भाजपकडून पुष्कळ मार खाल्ला आहे. त्यामुळे त्यांनाही काँग्रेससह आघाडी करण्याची गरज वाटायला हवी होती. कारण, भाजप हा तर त्यांचा ‘कॉमन’ शत्रू. पण त्यांना ती गरज वाटत नाही. शिवाय, काँग्रेसवर भरवसादेखील वाटत नाही. केवळ सप, बसपच नाही तर काँग्रेसच्या स्वप्नातील संभाव्य भाजपविरोधी महाआघाडीतील जवळपास सर्वच पक्षांची अवस्था हीच आहे. महाराष्ट्रात शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर तर खुद्द पवार स्वतःदेखील विश्वास ठेवणार नाहीत, अशी परिस्थिती. कर्नाटकात देवेगौडा-कुमारस्वामींचा जेडीएस पक्ष म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी गत. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि दिल्लीवाले आम आदमी अरविंद केजरीवाल यांचा फायदा कमी आणि मनःस्तापच जास्त. त्यामुळे सारं काही मनासारखं जुळून येतंय असं वाटतं, तोच सारं काही हातातून निसटत चालल्यासारखी अवस्था काँग्रेसची झाली आहे. तिकडे ते सलमान खुर्शीद म्हणाले की, “आम्ही आघाडी करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यायला हवेत.” केवळ एक खुर्शीदच नव्हे तर प्रत्येक सुज्ञ व्यक्ती काँग्रेसला हेच सांगत आहे. पण स्वतःच्याच धुंदीत असलेलं आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची सवयच जडलेलं काँग्रेस नेतृत्व मात्र, जमिनीवर उतरून वास्तव स्वीकारण्याच्या तयारीत येताना दिसत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/