चिंताजनक; राज्यात स्वाईन फ्लूचे २४४ मृत्यू

22 Oct 2018 17:24:00


 


मुंबई: संपूर्ण राज्यभरात गेल्या वर्षभरात स्वाईन फ्लूचे २४४ बळी गेले आहेत. यात नाशिकमध्ये सर्वाधिक ७६ तर पुण्यामध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यात ७५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

 

आरोग्य विभागाने सादर केलेल्या या अहवाल सांगितले आहे की, राज्यात स्वाईन फ्लूमुळे १८ ऑक्टोबर २०१८ पर्यंत २४४ रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लूमुळे नाशिकमध्ये ७६, पुण्यामध्ये ६४, पिंपरी-चिंचवडमध्ये ३३, साताऱ्यात २८ आणि कोल्हापूरमध्ये १७ लोक दगावले आहेत. या व्यतिरिक्त स्वाइन फ्लू झाल्याने आणखी ३८ लोक गंभीर आहेत. पुण्याच्या रुग्णालयांमध्ये २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

स्वाइन फ्लूमुळे मोठ्याप्रमाणावर लोक दगावल्याचे आरोग्य विभागाचे संचालक संजीव कांबळे यांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे स्वाइन फ्लूचा फैलाव अधिक झाल्याने मृतांचा आकडा वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत असल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ७७७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २००९ ते २०१५ या काळात राज्यात ९०५ जण स्वाइन फ्लूने दगावले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0