‘राम मंदिर’ राजकारणाचा नाही, तर आस्थेचा विषय

    दिनांक  21-Oct-2018   आंदोलनाने जे परिवर्तन करायचे होते, ते करून टाकलेले आहे. या आंदोलनाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, ढोंगी सेक्युलर गर्भाशयात जन्मलेल्या राहुल गांधींना आपल्या पोपटांतर्फे सांगावे लागते की, “मी जानवेधारक हिंदू आहे.” मंदिराच्या दर्शनाच्या यात्रा कराव्या लागतात, देवापुढे हात जोडावे लागतात, नाक घासावे लागते, कपाळावर टिळा लावून घ्यावा लागतो आणि मानस सरोवराची यात्रा करावी लागते.


अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे, ही हिंदू समाजाची आस्था आहे. आपल्या जीवनात प्रभू रामचंद्रांचे जे स्थान आहे, ते अद्वितीय आहे. हिंदू समाजाविषयी जर असे म्हटले गेले की, हिंदू समाजाच्या श्रद्धा विषयातून राम-कृष्ण आणि महादेव यांना जर काढले, तर हिंदू समाजात काहीच उरत नाही. आपली सर्व संस्कृती आणि बहुतेक सांस्कृतिक उत्सव, सांस्कृतिक मूल्ये या तीन राष्ट्रीय आदर्शांभोवती गुंफली गेलेली आहेत. हिंदू समाजाला नष्ट करण्यासाठी विदेशातून आलेल्या मुस्लीम आक्रमकांनी या तिन्ही आस्थांच्या स्थानांवर हातोडे चालविले, ती उद्ध्वस्त केली आणि त्या जागी मशिदी बांधल्या. त्याची पीडा प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात धगधगत असते. यासाठी राम जन्मभूमी मशीदमुक्त व्हावी म्हणून दीर्घकाळ आंदोलन चालले. १९९२ साली हिंदू संतापाने बाबरी ढाचा जमीनदोस्त केला. आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे म्हणजे, शिशुरामाचे मंदिर उभे आहे. जन्मस्थानावरील हे मंदिर असल्यामुळे बालरुपातील राम ही तेथील देवता आहे. पूर्वी जसे जन्मस्थानावर भव्य मंदिर होते, तसे पुन्हा बांधले गेले पाहिजे, यासाठी दीर्घकाळ आंदोलन झाले. त्या आंदोलनाने जन्मस्थानावर छोटेसे का होईना बाबरीविरहित एक मंदिर उभे केले आहे आणि दर्शनासाठी तेथे आता दरवर्षी लाखो भाविक जातात.

 

जन्मस्थानावरील ‘राम मंदिर’ हा आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. तो पक्षीय राजकारणाचा विषय नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे समजले पाहिजे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण करताना त्यांनी राम जन्मस्थानावरील मंदिराचा विषय राजकीय केला. मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले आणि त्याचे पालन केले जात नाही म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतले. विदेशवारी करायला तुमच्याकडे वेळ असतो पण, अयोध्येत जायला वेळ नाही, म्हणून शाब्दिक वार केले. मंदिर बांधणे तुम्हाला जमणार नसेल, तर ते आम्ही बांधून दाखवितो, अशी शिवाजी पार्कवर घोषणा केली. शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कोणते भाषण करावे, हा त्यांचा विषय आहे. कोणावर टीका करावी, हादेखील त्यांचा विषय आहे. त्याबद्दल आपल्याला काही सांगण्याचा अधिकार नाही. पण एक पत्रकार म्हणून त्या भाषणाचे विश्लेषण करण्याचा मला जरूर अधिकार आहे. लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन पक्षप्रमुखाने कार्यकर्त्यांना दिशा देणे आवश्यक होते. भाजप हिंदुत्ववादी आणि शिवसेनादेखील हिंदुत्ववादी, त्यामुळे दोघांत वैचारिक भेद नाहीत. हिंदुत्वाचे जे आस्थेचे विषय आहेत, त्यातदेखील दोन्ही पक्षांच्या विचारात काही अंतर नाही. परंतु, शिवसेनेची भूमिका सरकारात राहून भाजपला विरोध करण्याची आहे आणि विरोध करायचा असेल, तर विरोधासाठी काही मुद्दा लागतो. तसे कोणतेही खास मुद्दे नसल्यामुळे जे मुद्दे शोधले जातात, ते अर्थहिन मुद्दे असतात. जोपर्यंत जन्मस्थानावर बाबरी ढाचा (बाबरी मशीद) होती तोपर्यंत अयोध्या आंदोलन तीव्र करता येत होते. ज्या अपमानाबद्दल आंदोलन करायचे त्या अपमानाची निशाणी डोळ्यांसमोर होती. १९९२ साली ही निशाणी भुईसपाट झाली. अयोध्येच्या जनआंदोलनाचा विषय तिथे संपला. आता विषय फक्त जमिनीचा ताबा मिळवून मंदिर बांधण्याचा आहे. संसदेने कायदा केल्यानंतर तोही विषय संपेल. अयोध्या विषयावरून आता आंदोलन जर कोणी सुरू केले, तर त्याला जनसमर्थन मिळणे अशक्य आहे. जनसमर्थनासाठी किंवा आंदोलन उभे करण्यासाठी ज्या विरुद्ध आंदोलन करायचे ती प्रतिमा तशीच जबरदस्त असावी लागते. जोपर्यंत रावण जीवंत होता, तोपर्यंत रावणशाही विरुद्ध लढण्यासाठी सेना तयार होत गेली. लोक जोडत गेले. रावण गेला, रावणशाही गेली आणि त्यावेळचे आंदोलनदेखील संपले.

 

राम जन्मभूमीचे आंदोलन करून, अयोध्येला जाऊन आणि तिथेही घणाघाती भाषण करून सत्ता परिवर्तन करण्याइतके मतदान होण्याची शक्यता शून्य आहे. आंदोलनाने जे परिवर्तन करायचे होते, ते करून टाकलेले आहे. या आंदोलनाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, ढोंगी सेक्युलर गर्भाशयात जन्मलेल्या राहुल गांधींना आपल्या पोपटांतर्फे सांगावे लागते की, “मी जानवेधारक हिंदू आहे.” मंदिराच्या दर्शनाच्या यात्रा कराव्या लागतात, देवापुढे हात जोडावे लागतात, नाक घासावे लागते, कपाळावर टिळा लावून घ्यावा लागतो आणि मानस सरोवराची यात्रा करावी लागते. काँग्रेसमध्येच इतके परिवर्तन झाले आहे की, गुलाम नबी आझाद म्हणतात, “काँग्रेसमधील हिंदू नेते मला आता भाषणाला बोलावित नाहीत.” याचा अर्थ असा झाला की, गुलाम नबीला जर भाषणाला बोलाविले, तर मुसलमानांची मते किती मिळतील माहीत नाही पण, मिळणारी हिंदुंची मते जातील, हे मात्र पक्के आहे. हे काँग्रेसच्या लक्षात आले, कोणामुळे? अयोध्येत छोट्या मंदिरात असलेल्या बालरामाच्या प्रभावामुळे. संघ जेव्हा या आंदोलनात उतरला होता तेव्हा हेच परिवर्तन संघाला अभिप्रेत होते. निवडणुका जिंकण्यासाठी राम जन्मभूमीचा विषय आता काही कामाचा राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. जमले तर स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. लोकसभेतही चांगले बळ मिळवायचे आहे. राजकीय पक्ष प्रमुखाच्या या आकांक्षा असणे यात काही गैर नाही. परंतु, त्या पूर्ण करण्यासाठी दसरा मेळाव्यात त्यांनी जे विषय मांडले त्यांचा काही उपयोग नाही. प्रत्येक निवडणुकांत महागाई हा विषय असतो. कुठल्या तरी एखाद्या निवडणुकीत महागाई सत्ता परिवर्तनाचा विषय होऊ शकते पण, महागाई हा नेहमीच सत्ता परिवर्तनाचा विषय होणे अशक्य आहे. आर्थिक प्रश्नदेखील कायम असतात. रोजगाराचा प्रश्न हा कधीही न संपणारा प्रश्न आहे. तो तेव्हाच संपेल जेव्हा लोकसंख्या वाढ शून्यावर येईल. शेतकऱ्यांचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही. तोसुद्धावाढती लोकसंख्या, बदलते तंत्रज्ञान, जागतिक स्तरावर होणारे बदल या सर्वांशी निगडीत प्रश्न झालेला आहे. प्रश्नांचे उल्लेख करून किंवा त्याची तीव्रता मांडून चालत नाही. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, त्याचा विचार कोणता, विचार अंमलात आणण्याचा कार्यक्रम कोणता, हे सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगावे लागते. शिवाजी पार्कवर घसा फोडून अनेकांनी भाषणे केली. या नेत्यांना हे समजले पाहिजे की, अशा भाषणाने उत्तेजना निर्माण करण्याचे दिवस आता संपले आहेत. ऐकणारा स्वपक्षाचा कार्यकर्ता असला तरी तो मूर्ख, बावळट आणि गाढव नसतो. त्यालाही समजत असते. त्यालाही समजतं हे नेत्यांना समजले पाहिजे.

 

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. ६७ सालापासून शिवसेनेचे आंदोलन उभे राहिले. त्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी असलेला उत्साह, स्वत:च्या खिशातील पैसा खर्च करून भिंती रंगविणारे कार्यकर्ते, स्वत:चा खर्च करून सभेला जाणारे स्त्री-पुरुषहे मी पाहिले आहेत. मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो तेथील माणसे गरीबच होती. एवढा खर्च करणेदेखील त्यांना भारी असे; पण जेव्हा एखादा विषय माणसाच्या मनाला व्यापून टाकतो, तेव्हा त्यासाठी तो काहीही करण्यास तयार होतो. ही झपाटलेली माणसे ‘आवाज कोणाचा’ अशी घोषणा देत आणि कानठळ्या बसणारा प्रतिध्वनी येई ‘शिवसेनेचा!’ योगायोगाने या दसरा मेळाव्याच्या वेळी मेळावा सुरू होण्यापूर्वी मी शिवाजी पार्क परिसरातच होतो. प्लाझा ब्रीजवरून हातात भगवे झेंडे घेऊन गठ्ठ्याने कार्यकर्ते चालले होते. कोणीही घोषणा देत नव्हता. मारून मुटकून धरून आणलेली माणसे वाटावित अशी चालत होती. ६७-७०मधील उत्साह, जोश मावळलेला होता. अशा सैन्याला बरोबर घेऊन उद्धव ठाकरे यांना निवडणुकांचे रणांगण जिंकायचे आहे. बाळासाहेबांनी यश मिळविले कारण, मराठी माणसाच्या दुर्दशेचा विषय त्यांनी पोटतिडकीने मांडला. कोणी मांडण्याची हिंमत करीत नसताना मांडला. हिंदुत्व शब्द उच्चारायला जेव्हा भाजपची मंडळीदेखील लाजत होती, तेव्हा त्यांनी त्या प्रश्नावर निवडणुका लढविल्या आणि जिंकून दाखविल्या. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन गलबताची शिडे वळविण्याचे कसब बाळासाहेबरूपी समर्थ कप्तानाकडे होते. ते कसब त्यांच्यासोबत गेले. आता उरली आहे ती केवळ त्यांची नक्कल. नक्कल अस्सल नसते. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे विषय मराठ्यांचे आरक्षण, धनगरांचे आरक्षण, ओबीसी समाजाच्या आरक्षणाची सुरक्षा, वनवासी समाजाच्या आरक्षणाची सुरक्षा, कौशल्य प्रधान शिक्षण, नवनवीन क्षेत्रांतील रोजगारांची उपलब्धता, विविध जाती समुहांच्या हितसंबंधात संतुलन साधणे असे आहेत. राम जन्मभूमी आणि जन्मस्थानावरील रामाचे मंदिर हा महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या राजकारणाचा विषय आजही नाही आणि उद्याही होण्याची शक्यता नाही. शिवसेनेत राजकारणात हयात गेलेले धुरंधर राजकारणी आहेत. त्यांच्या हे लक्षात येत नसेल का? का लक्षात येऊन सेनाप्रमुखांना सांगण्याचे त्यांचे धाडस होत नसेल किंवा सांगूनही सेनाप्रमुख ऐकत नसतील? काय होत असेल, हे त्यांचे त्यांनाच माहीत! पण शिवसेनेचे तारू भलतीकडेच भरकटत चालले आहे. ते खडकावर आपटून फुटू नये, अशी इच्छा आपण ठेवूया.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/