गोव्यातील घटनाक्रमाने कॉंग्रेसचे तोंडही पोळले!

19 Oct 2018 10:42:00

 
छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना गोव्यासारख्या छोट्या राज्यात कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्यामुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंतच्या कॉंग्रेस नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का दिला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणार्या कॉंग्रेसचे स्वप्न अमित शाह यांनी चकनाचूर केले. राज्यात कॉंग्रेस तोंडाच्या भारावर आपटली आणि कॉंग्रेसचा हात फ्रॅक्चर झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर लगेच गोव्यात पहिला धक्का कॉंग्रेसला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयिंसह यांनी दिला होता. दिग्विजयिंसह हे तसे आपल्या वाचाळ बोलण्याने कॉंग्रेसला वारंवार धक्के देत असतात. पण दिग्विजयिंसह हे पंतप्रधान मोदी तसेच भाजपाबद्दल वाटेत ते बोलत असल्यामुळे कॉंग्रेस नेते त्यांच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. मात्र त्यांच्या अति बोलण्याने भाजपाचे नाही तर कॉंग्रेसचे नुकसान होते, हे शेवटी लक्षात आल्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्या बोलण्यावर बंधन घातले.
 
 
मी जाहीर सभेत बोलल्याने कॉंग्रेसची मते कमी होतात, त्यामुळे मी जाहीर सभेत बोलत नाही, असे दिग्विजयिंसह यांनी नुकतेच सांगितले. दहा वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या दिग्गीराजा यांना कॉंग्रेसने मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवले आहे. निवडणुकीची जी काही तयारी करायची ती पडद्याआडून करा, असे त्यांना सांगण्यात आले. दिग्गीराजा यांचे ग्रह सध्या फिरले आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कॉंग्रेसशी युती न करण्याचे सारे खापर दिग्विजयिंसह यांच्यावर फोडले. कॉंग्रेस आणि बसपा यांची युती होऊ नये म्हणून दिग्गीराजा अडथळे आणतात, ते भाजपाचे एजंट असल्याचा आरोपही मायावती यांनी केला, आणि ‘हेची फळ काय मम तपाला’ म्हणण्याची वेळ दिग्गीराजा यांच्यावर आली.
हे कमी होते की काय म्हणून आता गोव्यातील कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले. गोव्यात विधानसभा निवडणूक झाली तेव्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस असलेले दिग्विजयिंसह गोव्याचे प्रभारी होते. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत कॉंग्रेसला सर्वाधिक म्हणजे 16 जागा, तर भाजपाला त्याखालोखाल 14 जागा मिळाल्या होत्या. पण सरकार स्थापनेसाठी राज्यात वेगवान हालचाली करण्यात कॉंग्रेसचे प्रभारी म्हणून दिग्विजयिंसह मागे पडले. दिग्विजयिंसह गोव्यातील पंचतारांकित हॉटेलात मौजमजा करण्यात गुंतले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग, तसेच जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रात्रीतून अतिशय वेगवान हालचाली करत राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा केला.
 
 
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 21 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असताना त्यावेळी भाजपाला 23 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करत असाल तर आम्ही भाजपाला पाठिंबा देऊ, असे गोवा फॉरवर्ड पार्टी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी यांनी जाहीर केले. या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन आमदार होते. तीन अपक्ष आमदारांनीही भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ 23 वर गेले. गोव्यातील राजकीय स्थिती पाहता भाजपाच्या नेतृत्वाला संरक्षण मंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करणे हा राजकीय चमत्कारच होता आणि त्याचे सर्व श्रेय नितीन गडकरींना जाते. गोव्यात सर्व सुरळीत सुरू असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडली. काही दिवसात पर्रीकर पूर्ववत होतील, असे वाटत असताना त्यांच्या आजाराने आणि गोव्यातील राजकीय परिस्थितीनेही गंभीर वळण घेतले.
 
गोव्यात मुख्यमंत्री म्हणून गोवा फॉरवर्ड पार्टी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे पर्रीकर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले तर हे दोन्ही पक्ष भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि राज्यात आपल्याला आपले सरकार स्थापन करता येईल, असे स्वप्न कॉंग्रेसचे नेते दिवसाउजेडी पाहात होते. कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन गोव्यातील सरकार नियमबाह्य पद्धतीने बरखास्त करून राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना सरकार स्थापनेबाबतचे निवेदनही दिले होते.
 
मात्र हे करत असताना आपल्या पायाखाली काय जळत आहे, हे कॉंग्रेसच्या नेत्यांना कळत नव्हते. दयानंद सोपते आणि सुभाष शिरोडकर या कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला तरी त्याची चाहुल कॉंग्रेसच्या नेत्यांना लागली नाही. मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर प्रकृतीचा फायदा घेत गोव्यातील भाजपाचे सरकार अस्थिर करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न अमित शाह यांनी या दोन आमदारांना भाजपात प्रवेश देऊन हाणून पाडला. कॉंग्रेसच्या नहल्यावर हा अमित शाह यांचा दहला होता. एवढी धोबीपछाड याआधी कॉंग्रेसला गोव्यात बसली नसावी. कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश एवढेच याचे मर्यादित महत्त्व नाही. याचे गोव्याच्या राजकारणावर आणि कॉंग्रेसवर दीर्घकाळ परिणाम होणार आहेत.
 
 
याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे आमचा पक्ष गोव्यात सर्वात मोठा असतानाही आम्हाला सरकार बनवण्याची संधी नाकारण्यात आली, असा युक्तिवाद आता कॉंग्रेसला कधी करता येणार नाही. सरकार स्थापन करताना ढेप खाणारी कॉंग्रेस नंतर सातत्याने हे रडगाणे गात होती. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे गोवा विधानसभेतील कॉंग्रेसचे संख्याबळ 14 वर म्हणजे भाजपाच्या बरोबरीत आले. आता गोवा विधानसभेत कॉंग्रेस आणि भाजपा यांचे प्रत्येकी 14 आमदार आहेत. कॉंग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे गोवा विधानसभेचे संख्याबळ 40 वरून 38 वर आले, आता विधानसभेत बहुमतासाठी 20 आमदारांची गरज आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी वा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यापैकी कोणीही एखादवेळी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला, ज्याची शक्यता अगदी नाहीच्या बरोबर आहे, तरी भाजपा सरकारला कोणताच धोका नाही, बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ भाजपाजवळ आहे.
 
 
दुसरीकडे मनोहर पर्रीकर यांच्या जागेवर दुसर्या कोणा नेत्याची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची वेळ भाजपावर आली तर भाजपाच्या सरकारलाही धोका नाही. कारण गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तसेच अपक्ष आमदार भाजपापासून दूर जाण्याची शक्यताही आता मावळली आहे. कारण कॉंग्रेससोबत जाण्यात काहीच राजकीय फायदा नाही, याची जाणीव या घटनाक्रमामुळे या पक्षांना झाली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या जागेवर गोव्यात भाजपा मुख्यमंत्रिपदासाठी ज्याचे नाव समोर करेल, त्याला भाजपाच्या या दोन मित्रपक्षांना तसेच अपक्ष आमदारांना पाठिंबा द्यावा लागेल. आता मित्रपक्ष म्हणतील तसे भाजपाला गोव्यात वागावे लागत होते, आता भाजपा म्हणेल तसे या मित्रपक्षांना तसेच अपक्ष आमदारांना वागावे लागेल.
 
गोव्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत एखादवेळी भाजपाच्या सरकारला धोका झाला असता तर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात चुकीचा संदेश गेला असता. भाजपाचे एकेक राज्य कमी होत आहे, असा प्रचार करण्याची संधी विरोधकांना मिळाली असती. विरोधकांना तशी संधी मिळू नये म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी असा डाव टाकला की त्यात कॉंग्रेस पक्षच अडकला. ‘न रहेगा बांस न बजेगी बांसरी’ अशी अमित शाह यांनी कॉंग्रेस पक्षाची स्थिती करून टाकली. गोव्यातील ताज्या घटनाक्रमामुळे कॉंग्रेसचे हातच नाही तर तोंडही पोळले आहे. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
Powered By Sangraha 9.0