पालिकेच्या वाहनांवर ‘वॉच’

    दिनांक  17-Oct-2018   
 
 

मुंबई महापालिका ही देशातील श्रीमंत महापालिका. परंतु, पालिकेच्या कामकाजाच्या जुन्या पद्धतीमुळे कामात दिरंगाई होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. आता मात्र मुंबई महापालिकेने आधुनिक धोरणाची कास धरली आहे.

 

पालिकेने विविध नागरी सेवा सुविधाविषयक कामांसाठीच्या वाहनांसह खाजगी वाहनांवर ’व्हीटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्ते, कचरा घोटाळे उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर कचरा वाहतूक कामांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी पालिका अत्याधुनिक नियंत्रण कक्ष सुरू करणार आहे. तो निर्णय स्वागतार्ह आहे, यामुळे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर जरब बसेल. तसेच पालिकेकडून पुरविण्यात येत असल्याला वाहनांवर देखील नियंत्रण ठेवता येईल. या वाहनांमधून पिण्याचे पाणी, घनकचरा राडारोडा (डेब्रिज) किंवा नालेसफाईतील गाळ यांची वाहतूक केली जाते. ही वाहने आपल्या निर्धारित मार्गाने व ठरलेल्या ठिकाणीच जातात अथवा नाही, तसेच त्या वाहनांच्या फेर्‍यादेखील ठरलेल्या संख्येनुसारच होत आहेत की नाही, यांसारख्या विविध बाबींचे संनियंत्रण अधिक सुलभतेने करता यावे, यासाठी संबंधित सर्व वाहनांमध्ये ’व्हीटीएमएस’ उपकरण बसविण्यात येणार आहे. कचर्‍याचे डबे कचर्‍याने भरले आहेत की नाही, तेही आता थेट नियंत्रण कक्षातून समजणार आहेतसेच कचरा वाहतूक करणार्‍या ट्रकच्या मागे आणि पुढे सीसीटीव्ही लावले जाणार आहेत, तर ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ची गाडीच्या प्रत्येक हालचालीवर नजर असेल. कचरा उचलला गेला आहे की नाही, हेही त्यामुळे समजणार आहे. एखाद्या ठिकाणी अधिक पाण्याची आवश्यकता असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे टँकर निर्धारित ठिकाणाहूनच पाणी भरत असल्याची व निर्धारित ठिकाणीच पाणीपुरवठा करत असल्याची खात्री करता येईल. मुंबई महापालिका क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास, धोकादायक इमारतींचे पाडकाम यांसारख्या कामांमधून मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहून नेणे संबंधित कंत्राटदाराला वा विकासकाला आवश्यक असते. राडारोडा हा निर्धारित ठिकाणीच टाकला जातो का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला डेब्रिज टाकण्याला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.

 

भ्रष्टाचाराला लगाम

 

मुंबईत दररोज सुमारे साडेसात हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडपर्यंत गाड्यांनी पोहोचविण्याचे काम हे खरं तर नेमलेल्या कंत्राटदारांचे. मुंबईतील कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेण्याचे काम वाहतूक कंत्राटदार करतात, परंतु प्रशासनाने अचानक केलेल्या तपासणीमध्ये हे कंत्राटदार वजन वाढविण्यासाठी कचर्‍यात भेसळ करत असल्याचेही उघड झाल्याचे समोर आले होते. तसेच वाहनांच्या फेर्‍या जास्त दाखवून पालिकेची दिवसाढवळ्या लुटही सुरु होती. पालिकेने फसवणूक केल्याप्रकरणी काही कंत्राटदारांविरोधात पोलीस तक्रार करत त्यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. मुंबईत दररोज सुमारे पाच हजार ट्रक डेब्रिज निर्माण होते. आता हा प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणातील डेब्रिज नेमके कुठे फेकले जातात, तर हे डेब्रिज जातात नद्यानाल्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला, तिवरांमध्ये, जंगलात किंवा पडीक जमिनीवर. नाशिकरोडवर आणि अहमदाबाद रोडवर मोठ्या प्रमाणात आपल्याला हे डेब्रिज टाकलेले पाहायला मिळतात. पण आता मुंबई महापालिकेने डेब्रिज वाहतूक करणार्‍या गाड्यांंवर ’व्हीटीएमएस’ यंत्रणा लावल्यामुळे याला चाप बसणार आहे. २००५ मध्ये मुंबईत महापूर आल्यानंतर दरवर्षी पालिका नालेसफाई करते. मुंबईतील मोठे नाले, नद्या यामधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जातो. नालेसफाई केल्यानंतर हा गाळ वाहून नेणे कंत्राटदाराला बंधनकारक असते. या नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो, परंतु नाल्यातील गाळ नाल्यातच असल्याचे समोर आले होते. ’व्हीटीएमएस’ यंत्रणेमुळे हा गाळ नक्की कुठे टाकला हे समजणार आहे. पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करणार्‍या कंत्राटदारांना लगाम लागणार आहे. मुंबईत एखाद्या ठिकाणी अधिक पाण्याची आवश्यकता असल्यास किंवा काही कार्यक्रम असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही कंत्राटदार ठराविक ठिकाणी पाणीपुरवठा न करताही पालिकेकडून त्याचे पैसे उकळत होते. एकीकडे पाण्याची आवश्यकता असणार्‍या नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहत होते. त्यामुळे नागरिकांच्या नाराजीला पालिकेला सामोरे जावे लागत होते, तर दुसरीकडे पालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता, पण पालिकेच्या अत्याधुनिक कारभारामुळे पालिकेचे पैसे वाचतील आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल.

 
 
नितीन जगताप 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/