समर्थांची दूरदृष्टी - लेख क्र. २६

    दिनांक  17-Oct-2018
 
 

चाफळला देऊळ बांधून झाले. मूर्ती मिळाल्या. मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. राममंदिरासाठी व तेथील रामनवमीच्या उत्सवासाठी चाफळची निवड हे रामदासांच्या दूरदृष्टीचे फलित होते.

 
इ. स. १६४८ साली रामनवमीचा पहिला उत्सव रामदासांनी चाफळला साजरा केला. रामदासांसारखा एक संत, मुसलमान राजवटीला न घाबरता लोकांना एकत्र आणून उत्सव साजरा करतो व हिंदूसंस्कृती रक्षणाचे काम करतो, या जाणीवेने रामदासांची कीर्ती दूरवर पसरली. सार्वजनिक पातळीवर रामजन्मोत्सव साजरा करणे, ही कल्पना लोकांना आवडली. आसपासच्या गावांतून लोक उत्सवासाठी येऊ लागले. कार्यक्रमाचे स्वरूप धार्मिक असले तरी, त्या निमित्ताने लोक आपल्या हिंदूसंस्कृतीबद्दल बोलू लागले, विचार करू लागले. आतापर्यंत त्यांनी मुसलमानांचे पीराचे उरूस पाहिले होते. ताबूतच्या मिरवणुका पाहिल्या होत्या. त्यात ते भाग घेत पण, त्यात आत्मीयता नव्हती. या उत्सवाने रामाबद्दल, रामराज्याबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण होऊ लागली. रामदास आपल्या कीर्तनांतून या भूमिका लोकांसमोर मांडत होते. कीर्तनाचा पूर्वरंग झाल्यानंतर स्वामी उत्तररंगात राम-रावणाच्या युद्धाचा विषय घेत असत. हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन करीत असत. समर्थांच्या ओघवत्या वाणीने राम, हनुमानाच्या, वानरसेनेच्या कर्तृत्वाचे वीरश्रीयुक्त वर्णन श्रोत्यांच्या अंतःकरणालाभिडत असे. सत्याचा असत्यावर विजय होतोच. असत्य बलवान असले, तर त्याचे सत्यापुढे काही चालत नाही; हे समजल्यावर तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीत सत्य काय आणि असत्य काय? या संदर्भात लोकांचे विचार मंथन सुरू झाले.
 
 

चाफळला रामाच्या मंदिरास आणि रामनवमीच्या कार्यक्रमास विरोध होणार नाही. उलट उत्सवासाठी व मठासाठी साहाय्य मिळू शकेल, असा समर्थांचा अंदाज होता आणि तो त्यांचा अंदाज बरोबर निघाला. त्याच वर्षी म्हणजे इ.स. १६४८ साली दिनायतरावाने उंब्रज व कोरटी येथील काही जमीन संप्रदायाला इनाम करून दिली. तसेच बाजी घोरपडे याने चारेगाव व माजगाव येथील काही जमीन चाफळच्या उत्सवाला मदत व्हावी म्हणून इनाम करून दिली. स्वामींचा ‘भिक्षावळी’चा कार्यक्रम त्यांचे शिष्य आनंदाने पार पाडीत. त्यातून चाफळच्या मठासाठी देणग्या मिळू लागल्या. रामदासांची शिस्त कडक होती. मठासाठी मिळालेले द्रव्य, धान्य अथवा अन्य संपत्ती मठातच जमा करावी लागे. रामनवमीचा उत्सव सर्वांनी मिळून दिलेल्या देणग्यांतून व्हावा यासाठी ‘भिक्षावळी’ची योजना असे. त्यामुळे उत्सवाविषयी लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण होऊन हा उत्सव माझा आहे, अशी लोकभावना निर्माण होऊ लागली. रामदासांचे हे कार्य अत्यंत निरिच्छपणे चालले होते. हे समजल्यावर आदिलशहाकडूनही समर्थांच्या मठाला काही जमिनी इनाम मिळाल्या. एवढेच नव्हे तर तेथील सरदार रामदासांच्या कार्याविषयी चांगले बोलू लागले.तीर्थाटनाच्या काळापासूनच समर्थांनी ठिकठिकाणी मठ स्थापान करायला सुरुवात केली होती. स्वामींनी कर्नाटक, तेलंगण, सुरत, द्वारका, काशी, बद्रिकेदार, गोमंतक, रामेश्वर इ. अनेक ठिकाणी मठ स्थापून मठाधिपती नेमले होते. अर्थात, मुख्य मठ चाफळचा होता. कारण, स्वामी तेथे राहत होते. समर्थांचे कार्यक्षेत्र चाफळहून सुरू होऊन भविष्यात महाराष्ट्रभर होणार असले तरी, त्यांची दृष्टी महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण हिंदुस्थानाचा विचार करणारी होती. कारण, ‘आनंदवनभुवनी’ या त्यांच्या काव्यात हिंदूसंस्कृतीच्या विस्ताराचे स्वप्न पाहताना ते म्हणतात-

 

‘बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले ॥’

 

हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत हिंदुस्थान बलशाली झाल्याचे त्यांना पाहायचे होते. फोडलेल्या-मोडलेल्या देवळांची, तीर्थक्षेत्रांची पुनर्मांडणी त्यांना करायची होती. लोकांना धार्मिकदृष्ट्या आनंदी झालेले त्यांना पाहायचे होते. हिंदुस्थानच्या भवितव्याविषयी अशी दिव्य स्वप्ने पाहणार्‍या आणि ती ध्येये उराशी बाळगून नि:स्पृहपणे काम करणार्‍या रामदासांना राजकारण कळत नव्हते, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. अध्यात्म व भक्ती यांचा तर प्रचार-प्रसार त्यांना करायचा होताच. पण लोकांना सर्व बाबतीत शहाणे करून सोडायचे होते आणि धर्म व संस्कृती वाचवण्यासाठी राजकारण केले पाहिजे. हे विचार त्यांच्या तीर्थाटनाच्या काळात पक्के झाले होते. ‘मुख्य ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण’ असे त्यांनी धार्मिकतेनंतर राजकारणाला महत्त्व दिले होते. स्वामींना सर्वसामान्य माणसांचीही चिंता होती. चाफळ मठाची व समर्थांची महती सर्वदूरवर पसरली. तत्कालीन राजसत्तेला आव्हान दिल्याचे वृत्त जेव्हा महाराष्ट्रात सर्वत्र पसरले, तेव्हा त्यांच्याविषयी लोकांत विलक्षण कुतूहल, उत्सुकता व आदर निर्माण झाला. लोक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी चाफळला येऊ लागले. स्वामींना सार्‍यांच्या उद्धाराची चिंता सतावत होती हे गिरीधरस्वामींनी लिहिलेल्या ‘समर्थप्रताप’ या ग्रंथावरून स्पष्टपणे दिसून येते. समर्थांवर उच्चवर्णियांची प्रशस्ती केल्याचे कितीही आरोप आधुनिक काळात होवोत पण, गिरीधरस्वामींच्या ग्रंथातील समर्थांचे चित्र वेगळे आहे. चाफळच्या मठात लोकांना भेटत असताना स्वामींच्या मनात काय चालले असेल, याचे उत्तम वर्णन ‘समर्थप्रताप’ ग्रंथात आहे. गिरीधर लिहितात,

 

श्रीगुरूसमर्थ एकांती बैसती।

प्रांतीचे लोक दर्शनासी येती।

सकळ प्रांतीचा परामर्श घेती ।

चिंता करिती विश्वाची ।

देशकाळवर्तमाने ।

आपण चिंताग्रस्त होती मने ।

म्हणती कैसी वाचतील जने ।

कैसी ब्राह्मण्ये राहतील ।

कैसी क्षेम राहेल जगती ।

कैसी देव देवालये तगती ।

कैसी कुटुंबवत्सल जगती ।

कोणीकडे जातील हे ॥

 

स्वामी बालवयात आईला म्हणाले होते, “चिंता करितो विश्वाची.” तथापि समर्थपद प्राप्त झाल्यावर त्यांच्या मनाला या सामान्य कुटुंबवत्सल लोकांच्या काळजीने ग्रासलेले होते. त्यांची ते चिंता करीत होते, एवढे मात्र खरे. समर्थांच्या संपूर्ण जीवनकार्यावर प्रकाश टाकणार्‍या या ओव्या आहेत, यात संदेह नाही.

 
- सुरेश जाखडी 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/