तिचा सांस्कृतिक वारसा भाग ८

    दिनांक  16-Oct-2018   


 
 

‘त्याचे’ जीवन समृद्ध करणारा वारसा 

 

मागचे काही दिवस आपण स्त्रीचे जीवन सुंदर व समृद्ध करणारा वारसा पाहिला. शेवटाकडे जात असता, एक दृष्टी, पुरुषांचे जीवन सुंदर व समृद्ध करणाऱ्या वारशावर...

 

कथा-कहाण्यांमधून अगदी लहानपणापासून त्याला मिळणारा वारसा आहे, श्रावणबाळ आणि भक्त पुंडलिक यांच्या मातृ-पितृसेवेचा, रामाच्या पितृआज्ञा पालनाचा. भाऊबीजेनिमित्त बहीण व पाडव्यानिमित्त पत्नीचा सत्कार करायचा वारसा. शिव-पार्वतीच्या विवाहाच्या कथेतून-सर्वप्रथम मदनाचे दहन करणाऱ्या पतीचा संस्कार. ज्यामधून विवाहाचा पाया शारीरिक आकर्षण नसून, शुद्ध प्रेम आहे, हे शिकवणारा वारसा. पितृपक्षानिमित्त पूर्वजांच्या उपकाराचे स्मरण करण्याचा वारसा. दसऱ्याला सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजेचा संस्कार. नवमीला ज्ञानाची पूजा करायचा संस्कार. प्रत्येक नवरात्र दुर्गेचा आणि शारदेचा वारसा चालवण्याची आठवण घेऊन येते. ऐश्वर्यसंपन्न संस्कारलक्ष्मी शक्ती व युक्तीचा वारसा देते.

 

जसे काही संस्कार फक्त स्त्रियांसाठी होते, तसेच काही संस्कार फक्त पुरुषांसाठी तयार केलेले दिसतात. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे शबरीमला मंदिर. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी, पुरुषांना ४१ दिवसांचे व्रत सांगितले आहे. प्रथम या मंदिरात जो अनेक वेळा जाऊन आला आहे, त्याच्याकडून तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून घ्यायची. ही माळ नित्य आपण घेतलेल्या व्रताची आठवण करून देते. या ४१ दिवसांत त्याने ब्रह्मचर्य पाळायचे असते. मांसाहार, मद्यपान, धूम्रपान बंद. ४१ दिवसांचा उपास. रोज पहाटे उठून आंघोळ, पूजा, भजन करून भुकेल्यांना अन्नदान करणे, समोर आलेली प्रत्येक व्यक्ती भगवान अयप्पन आहे, असे समजून तिच्याशी व्यवहार करणे. या व्रताने आतून-बाहेरून निर्मळ होऊन देवाच्या दर्शनाला जाण्याची परंपरा आहे. मनावर ताबा, दुर्गुणांना फाटा, चांगल्या सवयींना चालना, इतरांशी प्रेमाने वागण्याचा संस्कार करणारा हा वारसा आहे. लहान वयापासून मोक्षाच्या प्राप्तीसाठी तयारी करवून घेणारा हा वारसा आहे. मोक्ष म्हणजे सगळ्या इच्छा- आकांक्षा-कामना-अपेक्षा या सगळ्यातून सुटका. आपल्या जीवनाचा उद्देश त्या ‘७२’ जणी मिळवणे वगैरे नाही, तर मोक्ष मिळवणे आहे, हे शिकवणारा वारसा, पुरुषाचे जीवन प्राण्याच्या उंचीवरून मानवाच्या उंचीवर घेऊन जातो. पशुचा माणूस आणि माणसाचा देव करणाऱ्या वारशाची किंमत कशी करणार? ज्या समाजात असे पुरुष आहेत, त्या समाजातील स्त्रीसुद्धा केवळ ‘मादी’ न राहता त्या पलीकडे जाऊन काही करू शकते. अशी व्रते इतरही देशात, पंथात आणि धर्मात पाहायला मिळतात.

 

उदाहरणार्थ, जपानच्या ओकीनोशिमा या लहानशा बेटावर शिंतो धर्माचे मंदिर आहे. समुद्र सफरीवर जाणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवाचे हे मंदिर. संपूर्ण बेटावर एका वेळेला फक्त एक पुजारी राहतो आणि वर्षातून फक्त एक दिवस २०० जपानी पुरुषांना येथे प्रवेश मिळतो. इथल्या रिवाजाप्रमाणे, या २०० पुरुषांनी काही दिवस आधीपासून व्रतस्थ राहायचे असते. शेवटच्या दिवशी विवस्त्रावस्थेत समुद्र स्नान केल्यावर मंदिरात जाता येते. हे जागतिक वारसा स्थळ असूनसुद्धा, या बेटावर बाहेरच्या देशातील पुरुषांना प्रवेश नाही. इतर पंथातील पुरुषांना प्रवेश नाही आणि स्त्रियांना तर नाहीच नाही. या देवस्थानाच्या नियमानुसार - इथे केवळ भाविक शिंतो पुरुषांना प्रवेश आहे. उगीच जिज्ञासा म्हणून पर्यटक म्हणून, मंदिर पाहायला येणाऱ्यांना येथे प्रवेश नाही.

 

तसेच ग्रीसमध्ये मौंट एथोस येथे एक मोठे व प्राचीन ख्रिश्चन देवस्थान असून येथे अनेक ख्रिश्चन मठ आहेत. या जागतिक वारसा स्थळावरसुद्धा फक्त पुरुषांना प्रवेश आहे. हा मठ एका द्वीपकल्पावर असून तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. इथे ब्रह्मचारी पुरुषांचा निवास असल्याने स्त्रियांना प्रवेश नाही. येथे प्रवेश मिळवायला, या ग्रीस मठाकडून आधी व्हिसा मिळवावा लागतो. या बेटावर विविध देशांतील, फक्त परंपरावादी ख्रिश्चन पुरुषांना प्रवेश आहे. दररोज केवळ १०० पुरुषांना प्रवेश दिला जातो. जर एखाद्या स्त्रीने नियमांना न जुमानता या बेटावर प्रवेश केला, तर तिला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सांगितली आहे. स्त्री-पुरुष साधकांची विभागणी बौद्ध संघातसुद्धा दिसते. तसेच अभ्यासाचे व्रत घेतलेल्या विद्यार्थ्यांची विभागणी जगभरातील अनेक शाळा-कॉलेजेसमधून केलेली दिसते. या दोन्ही ठिकाणी साधकाचे मन विचलित होऊ नये, म्हणून घेतलेली काळजी आहे. ज्याला ‘भेदभाव’ म्हणण्यापेक्षा ‘Gender segregation’ म्हणणे अधिक योग्य आहे.

 

तर आता ऐरणीवरचा प्रश्न. शबरीमला येथे पुरुषांवर उत्तम संस्कार करणारी एखादी परंपरा मोडावी का? का मोडावी? त्याने काय साध्य होणार आहे? या मंदिरात प्रवेश मिळवल्याने स्त्रियांवर काही संस्कार होणार आहेत का? ज्या स्त्रीची श्रद्धा आहे, ती मंदिरात जाणार नाही म्हणते आणि जिची श्रद्धाच नाही, तिने जाण्यात काय मतलब आहे? जिज्ञासा म्हणून? गंमत म्हणून? की देवाचा अनादर करायचा म्हणून? नक्की काय उद्देश आहे? न्यायालयाच्या निकालाने अनेक प्रश्नांचा, उपप्रश्नांचा लोट तयार झाला आहे, ज्याचा ऊहापोह करणे आवश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/