हम बोलेगा, तो बोलोगे के बोलता है

    दिनांक  16-Oct-2018   
 
 

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या १९७४ च्या ’कसौटी’ या चित्रपटातील गीताचे वरील बोल आज असे एकाएकी आठवण्याचे कारण म्हणजे काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांचे एक विधान.

 

दिग्गीराजा नुकतेच भोपाळच्या एका सभेत म्हणाले की, “मी बोललो की काँग्रेसला मतं कमी पडतात. माझ्या भाषणामुळे काँग्रेसचे नुकसान होतेय. म्हणून मी फारसा कुठे प्रचाराला बाहेरच पडत नाही.” दिग्गीराजा मनापासून अगदी राजासारखं उदार होऊन खरं बोलले म्हणायचे. कारण, यापूर्वीही जेव्हा जेव्हा दिग्गीराजांनी तोंड उघडलं तेव्हा तेव्हा काँग्रेसला तोंडावर आपटण्याची वेळ आली. सध्या मध्य प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे. भाजपच्या शिवराजसिंह चौहानांना पराभूत करण्यासाठी राहुल गांधीही मध्य प्रदेशात ठाण मांडून बसले आहेत. लोकसभेतही त्यांच्या सावलीप्रमाणे वावरणारे ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्या खांद्यावर प्रचाराची सर्व धुरा आहे. राहुल यांच्या प्रचारसभांच्या आयोजनांपासून ते मंदिरभेटींपर्यंत सगळ्या कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया आघाडीवर असून त्यांनाही राहुल गांधींसोबत राहून कदाचित मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. पण, या सगळ्यात काँगे्रसच्या दिग्विजय सिंहांना सरळ सरळ डावलून प्रचारापासून मुद्दाम चार हात काँग्रेसने लांब ठेवलेले दिसते. त्यांच्याकडे प्रचाराची कुठलीही मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली नसून माध्यमझोतांतूनही ते गायब आहेत. कारण, सरळ आहे. दिग्विजय सिंह यांच्या वाचाळवाणीचा इतिहास पाहता, काँग्रेसने यावेळी त्यांना थेट म्यूट मोडवर ढकलून दिले. दिग्गीराजांनी मांडलेला दोन सत्ताकेंद्रांचा सिद्धांत, उतारवयात बोहल्यावर चढण्याचा दाखवलेला उतावीळपणा आणि किंवा मिनाक्षी लेखींना उद्देशून केलेली टंच मालवाली अश्लाघ्य टिप्पणी, त्यामुळे दिग्गीराजा कुठे काय बोलतील, याचा नेम नाही. त्यात गोव्याच्या निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापनेची जबाबदारी असलेले दिग्गीराजा स्वस्थ बसले आणि गोव्याचा गड गडकरींनी खिशात घातला. त्यामुळे दिग्विजय सिंहांविषयी काँग्रेस अंतर्गत संतापाची लाट उसळली. असो... दिग्विजय सिंहांना बॅकफूटवर ठेवून राहुल गांधींनी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे फारसा फरक पडेल, असे चित्र नाहीच. तेव्हा, कोणी बोलो अथवा न बोलो, काँग्रेसचा मध्य प्रदेशात ‘दिग्विजय’ होणे नाहीच!
 

सरकारी फाईली की खेळणं ???

 

दिव्याच्या आसपास प्रकाश पडत असला तरी दिव्याखाली मात्र अंधार असतो आणि त्यातही जर तो दिवा विझण्याच्या स्थितीत असेल, तर त्याची अखेरची चलबिचल सुरू असते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची अवस्थाही सध्या अशीच म्हणावी लागेल. काँग्रेस-भाजपपेक्षा जनमानसाच्या समस्या ओळखून हा माणूस चांगले राजकारण करेल, म्हणून २०१५ साली केजरीवालांच्या हातात दिल्लीकरांनी सत्तेच्या चाव्या दिल्या पण, अवघ्या वर्षभरातच केजरीवालरूपी या दिव्याचे तेल...तूपही संपले आणि ज्योतही पेटती राहण्यासाठी अगदी केविलवाणे कष्ट करू लागली. केजरीवालांच्याच अनेक साथीदारांनी त्यांच्या पक्षपी नेतृत्वाचा झाडू भिरकावून लावला आणि ‘आप’ला रामराम केले. इतकेच काय तर आजवर ‘आप’च्या १४ आमदारांवर बलात्कारापासून ते खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्यातून केवळ तीन आमदारांची मुक्तता झाली असली तरी इतर आमदार लाचलुचपत विभाग, आयकर विभाग, दिल्ली पोलीस, सीबीआय अशी विविध यंत्रणांच्या चौकशीच्या फेर्‍यात आजही अडकले आहेत. त्यात नुकतेच केजरीवालांच्या एका नातेवाईकालाही सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी पाच-सहा महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पण, स्वत:च्या पक्षाची इतकी बिकट अवस्था असूनही केजरीवालांचा रुबाब काही एका पैशानेही कमी झालेला दिसत नाही. नुकत्याच केजरीवाल आणि त्यांच्या सरकारी संबंधीच्या ४०० फाईल्स विविध शासकीय यंत्रणांतर्फे तपासण्यात आल्या. त्याचा केजरीवालांना इतका राग आला की ते म्हणतात की, “आमच्या ४०० फाईल तपासल्या, तर राफेल कराराची फाईल चार दिवस तपासायला द्या, मी दोषींना जन्मभरासाठी तुरुंगात टाकेन.” नेहमीप्रमाणे केजरीवालांचा रडीचा डाव. त्यांना राफेलची फाईल म्हणजे खेळणे वाटले की काय....माझे खेळणे तोडले म्हणून मी तुमचे खेळणे तोडणार हा कुणीकडचा आर्विभाव....त्यामुळे इतरांप्रमाणे मोदींविरोधात वाहत्या गंगेत राफेल करारावरून हात धुवून घेण्यापेक्षा राजधानीत काय चाललंय, त्याकडे केजरीवालांनी लक्ष दिल्यास दिल्लीकर त्यांचे आभार मानतील. पण, सूडाच्या राजकारणाचं भूत डोक्यावर घेऊनच वावरणार्या केजरीवालांनी मग फोर्ड फाऊंडेशनकडून तसेच परदेशातून किती देणग्या मिळाल्या, याच्याही फायली जगजाहीर कराव्यात. मग आपसूकच भ्रष्टाचारी कोण आणि सत्याचारी कोण, ते जनतेसमोर येईलच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/