सर्वसमावेशकतेचा ‘संघमार्ग’

    दिनांक  12-Oct-2018   
 
 

डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सुरू केलेला संघ आता ९३व्या वर्षात पर्दापण करीत आहे. ही ९३ वर्षे म्हणजे सर्वसमावेशकता, सर्वपंथ समादर आणि सर्वक्षेत्रीय न्यायाची पायाभरणी करणारी वर्षे आहेत. ज्यांना हे समजलेले आहे, ते निरंतरपणे संघकामात मग्न होतात आणि ज्यांना हे समजूनच नाही घ्यायचे ते सांप्रदायिक ‘पुरस्कारवापसीवाले’ होतात.

 

महाराष्ट्र शासनाने ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ मला देण्याची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे अनेकांचे फोन घेता घेता दिवस गेला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका मित्राने दिलेली प्रतिक्रिया अशी, “हा पुरस्कार मिळण्यासाठी २०१८ साल उजाडावे लागले आणि महाराष्ट्रात आपले सरकार यावे लागले.” तो पुढे म्हणाला, “यापूर्वीच्या सरकारात सगळे पुरोगामी लोक होते. र्वसमावेशकतेवर प्रवचन देणारे, सहिष्णुतेचे पाठ शिकविणारे, परमताचा आदर केला पाहिजे याचा उपदेश करणारे; परंतु ते मनाने आणि बुद्धीने अत्यंत विकृत आणि सडलेले लोक होते. ‘कथनी’ आणि ‘करनी’ यात कसलाच मेळ ज्यांच्या जीवनात नसतो, त्यांना ‘पुरोगामी’ म्हणायचे.” त्याची ही प्रतिक्रिया बोचरी असली तरी, बोलकी होती. मी संघाचा स्वयंसेवक, पत्रकार म्हणून करिअर करावे, हा विषय माझ्या स्वप्नातही नव्हता. मी अपघाताने पत्रकार झालो. ‘सा. विवेक’ची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ती मी कामाला आवश्यक ती गुणवत्ता संपादन करीत पार पाडीत गेलो. त्यातील एक भाग लेखन, मनन, वाचन, चिंतन, व्यासंग या सर्व गोष्टी आल्या. माझे ‘सा. विवेक’मधील लेख ‘लोकसत्ते’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर आवर्जून पहिल्या पानावर छापत असत. त्यामागे एक विकृती होती. रमेश पतंगेचे लेख विचारगर्भ आहेत म्हणून ते छापत नव्हते, तर त्या लेखामध्ये भाजपविषयी काही परखडपणे लिहिलेले असायचे किंवा हिंदुत्वाचा जो पारंपरिक विचार आहे, त्यापेक्षा थोडा वेगळा विचार मांडलेला असायचा. संघविचारसृष्टीत भेदाची भिंत उभी करण्यासाठी कुमार केतकर त्यांचा उपयोग करीत. ते ठरले ‘पुरोगामी!’ त्या बिचार्‍यांना कल्पना नाही की, असले बालीश चाळे करून संघविचारसृष्टीत कसलाही भेद निर्माण करता येत नाही. संघविचारावर जगणारे कार्यकर्ते ठाम खडकावर उभे असतात, वादळ-वार्‍याशी ते झुंज देत असतात, ते कशाने डगमगत नाहीत, कुठल्या हल्ल्याला घाबरत नाहीत, प्रतिकूल परिस्थितीची चिंता करीत नाहीत.

 

भारताचिया महारथाला सारे मिळूनी ओढूया...या भावनेने सर्वजण काम करीत असतात. वृत्तपत्रीय बदमाशीच त्याच्या कामावर शून्य परिणाम करीत असते. त्यांच्या हृदयावर ही शिकवण संघसंस्थापकांनी कोरून ठेवलेली आहे. डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सुरू केलेला संघ आता ९३व्या वर्षात पर्दापण करीत आहे. ही ९३ वर्षे म्हणजे सर्वसमावेशकता, सर्वपंथ समादर आणि सर्वक्षेत्रीय न्यायाची पायाभरणी करणारी वर्षे आहेत. ज्यांना हे समजलेले आहे, ते निरंतरपणे संघकामात मग्न होतात आणि ज्यांना हे समजूनच नाही घ्यायचे ते सांप्रदायिक ‘पुरस्कारवापसीवाले’ होतात. पुरस्कार घ्यायचा, उपभोगायचा आणि वापस करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही न लिहिलेले बरे. डॉ. हेडगेवारांनी सर्वसमावेशकतेचा पहिला पाठ दिला की, आपण संघकाम नागपुरात सुरू करीत आहोत. हळूहळू ते विदर्भातील काही जिल्ह्यांत जाईल. परंतु, लवकरात लवकर ते आपल्याला देशव्यापी करायचे आहे. हिंदू समाज केवळ विदर्भात राहत नाही, तो सार्‍या देशात आहे. तो पंजाबात आहे, बलुचिस्तानात आहे आणि कन्याकुमारीलादेखील आहे. आसामच्या जंगलात आहे तसा तो कच्छच्या आखातातदेखील आहे. तो आपला समाज आहे आणि त्याला संघटीत करायचे आहे. म्हणून संघातील पहिले प्रचारक देशाच्या कानाकोपर्‍यात गेले. भाषा माहीत नाही, तेथील हवामानाची सवय नाही, आहारभिन्नता आहे, अनेक ठिकाणी राहायला घर नाही अशा वेळी जिथे जागा मिळेल तिथे हे कार्यकर्ते राहिले. कुणी गुरांच्या गोठ्यात राहिले, मलमूत्र आणि डासांच्या सहवासात. कुणी देवळांचा आश्रय घेतला, कुणी झाडाखाली पथारी टाकून झोपले. पण, त्यांच्या मनातील हिंदू बांधवाविषयींचे प्रेम अणुमात्रही कमी झाले नाही. संघकार्य त्यांनी काही वर्षांतच देशव्यापी केले. त्या त्या प्रदेशांतील काही गणमान्य लोकांनी या तरुण कार्यकर्त्यांना उपदेश दिला की, “हिंदू संघटन अशक्य आहे. आपले जीवन वाया घालवू नका. घरी जा, लग्न करा आणि सुखाने राहा.” परंतु, डॉ. हेडगेवारांनी हृदयात पेरलेला अग्नी स्वयंप्रकाशित आणि स्वयंजलित होता. तो अशा उपदेशाने विझला नाही. सर्वसमावेशकतेचा दुसरा अध्याय सुरू झाला तो म्हणजे, समग्र हिंदू समाजाला संघाच्या कवेत आणण्याचा. हिंदू समाज म्हणजे जातींचा समूह आणि हिंदू समाज म्हणजे जातींची उतरंड. एकावर एक ठेवलेल्या जाती, त्यांच्यात उच्च-नीचतेचा भाव, त्यात पुन्हा अस्पृश्यता, त्यांना तर जवळही करायचे नाही. या सर्वांचे हिंदू संघटन करायचे. ब्राह्मणापासून ते महार, मांग, ढोर, चर्मकार या सर्वांना समपातळीवर आणायचे होते. या दुसर्‍या अध्यायाचे कामदेखील संघाच्या पहिल्या आणि दुसर्‍या पिढीने अत्यंत जोरदारपणे केले. ‘जाती’ची व्याख्या, ‘जी काही केल्या जात नाही तिला ‘जात’ होय.’ संघाने ही जातीची व्याख्या पूर्णपणे खोटी ठरविली आणि संघाची व्याख्या झाली, ‘जी जन्मापासून चिकटलेली असते जी ‘जात’ आणि जिथे ती विसरली जाते त्या जागेला ‘संघ’ म्हणतात.’ संघात जाती नसतात, संघात फक्त हिंदू असतात. कुणी कुणाची जात विचारत नाही आणि कुणाची जात संघकामात अडचण करीत नाही. पुरोगामी मंडळी जातीअंतावर प्रवचने देतात, ग्रंथरचना निर्माण करतात. त्यांची प्रवचने हवेत विरून जातात आणि ग्रंथ वाळवीची वाट बघत कपाटात पडलेले असतात. ‘जाती अंत करा,’ असे संघ सांगत नाही. ‘जाती विसरा,’ असेदेखील संघ सांगत नाही. संघ फक्त एवढेच सांगतो की, ‘मी जन्माने हिंदू आहे. जगण्याने हिंदू आहे आणि व्यवहारानेदेखील हिंदूच आहे. एवढे फक्त २४ तास करीत राहा. त्याचे स्मरण ठेवा. नको त्या गोष्टी आपोआप संपतील.’

 
 

सर्वसमावेशकतेचा तिसरा अध्याय हिंदू समाजातील वेगवेगळ्या उपासना पंथांना जवळ करण्याचा होता. हे काम संघाच्या तिसर्‍या आणि चौथ्या पिढीने केले आहे. हिंदू ही अनेक उपासना पंथांची संसद आहे. संसदेत जसे अनेकानेक विचारांचे लोक असतात तसे हिंदू समाजाच्या धर्मसंसदेत वेगवेगळ्या उपासनापंथांचे लोक असतात. कुणी ईश्वरवादी आहे, कुणी निरिश्वरवादी आहे, कुणी मूर्तिपूजक आहे, तर कुणी निराकाराची पूजा करणारा आहे, कुणी भक्तिमार्गी आहे, तर दुसरा कर्ममार्गी आहे. प्रत्येक पंथांचे ग्रंथ वेगळे, त्यांचे धर्माचार्य वेगळे, त्यांची धार्मिक कर्मकांडे वेगळी, हिंदू धर्म हा एक ग्रंथ, एक प्रेषित, एक प्रकारची पूजापद्धती मानणारा धर्म नाही. त्याच उपासनेत बहुविधता आहे. अशा बहुविध उपासना पद्धतीत विभागलेल्या हिंदुंना संघटीत करायचे होते. या उपासना पंथियांना एकत्र आणायचे होते. ‘आम्ही हिंदू आहोत, आमचा पंथ कोणताही का असेना,’ ही भावना त्यांच्यात आणायची होती. आपली उपासना पद्धती बदलण्याचे कारण नाही. एकसारखेपणा निर्माण करायचा नाही, आपापल्या वेगवेगळ्या पूजापद्धती आहेत तशाच ठेवायच्या. पण, त्याचवेळी आपले ‘हिंदूपण’ मात्र विसरायचे नाही. ते टिकले तर आपला पंथ टिकेल. ‘हिंदूपण’ हे हिंदू समाजाचे खोड आहे. बाकी सर्व पंथ त्याच्या शाखा आहेत. खोडाला कीड लागली, तर फांद्या सुकून जातील. ही गोष्ट हळूहळू सर्व धर्माचार्यांना सांगितली गेली. श्रीगुरुजी आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांचे कार्य इतिहास निर्माण करणारे झालेले आहे. ते काही लोकांना समजत नाही, एखाद्याची समजशक्ती कमी असते, त्याला आपण तरी काय करणार? सर्वसमावेशकतेचा चौथा अध्याय भारतात असलेल्या अभारतीय धर्म मानणार्‍या लोकांना हिंदूपणात सामावून घेण्याचा आहे आणि तो कालखंड आता सुुरू झालेला आहे. पद्धती तीच राहील, जी संघाच्या पहिल्या पिढीने अंमलात आणली. कुणावरही कसलीही बळजबरी नाही. उपासना पंथ सोडण्याचा आग्रह नाही. आग्रह राहील फक्त आपले हिंदूपण जपण्याचा आणि तो प्रगट करण्याचा. भारतात राहणारे ख्रिश्चन आणि मुसलमान हे आकाशातून येथे टाकले गेलेले नाहीत. ते आपल्याच समाजाचे अंग होते. काही शतकांपूर्वी त्यांना आपला पारंपरिक उपासना मार्ग सोडावा लागला आणि वेगळी उपासनापद्धती स्वीकारावी लागली. मुलाने नाव बदलले म्हणजे त्याची आईशी असलेली नाळ कायमची कापली जाते का? ती जात नाही. जैविक संबंध नामांतराने संपत नाहीत, धर्मातरांनेदेखील संपत नाहीत. ते पुन्हा प्रस्थापित करण्याचा कालखंड आता आलेला आहे.

 
 

‘सांस्कृतिक भारताच्या लोककथा’ हे पुस्तक लिहीत असताना मी इंडोनेशिया आणि मलेशियाच्या इतिहासाच्या लोकवाड्मयाचा अभ्यास केला. दोन्ही देश मुसलमान आहेत. मलेशियात रामायणावर नाटके होतात, ती वंंशपरंपरेने करणारी मुसलमान घराणी आहेत. इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये हनुमंताला ‘मुष्टियोद्धेचा जनक’ म्हणतात. जकार्ताला श्रीकृष्णाचा गीतोपदेश करणारी मोठी प्रतिकृती आहे. ते म्हणतात,“काही वर्षांपूर्वी आम्ही मुसलमान झालो पण, त्यामुळे आमचे बापजादे बदलत नाहीत. आमची संस्कृती बदलत नाही, आम्ही एका संस्कृतीचे घटक आहोत.” संघाने ९३ वर्षांत काय केले? आम्हा भारतीयांना बांधून ठेवणारी आमची एक संस्कृती आहे, तिचे जागरण केले. ती सांस्कृतिक मूल्ये हिंदुंच्या जीवनात उतरविली. त्याप्रमाणे हिंदुंना जगायला शिकविले. या सांस्कृतिक मूल्यांत सर्वसमावेशकता, सर्वांभूती आत्मियता या सर्वांचा आहे, तसा स्वीकार, प्रत्येकाचा सन्मान आणि प्रत्येकाला राष्ट्रजीवनात सन्मानाचे स्थान हा आहे संघमार्ग. पुन्हा सांगायचे झाले, तर त्यावर प्रवचने नाहीत, ग्रंथरचना नाहीत. परंतु, ज्यांच्यावर ग्रंथ रचले जातील, रचले गेले पाहिजेत आणि ज्यांचे जीवन एखाद्या खंडकाव्याचा विषय होईल, अशी जीवने संघाने उभी करून दाखविली. विचार जगणारे चालते-बोलते आदर्श उभे केले. आजवर संघाच्या एक-एका पिढीने त्यांच्या पुढील आव्हाने पूर्ण केली. सर्वसमावेशकतेचे आताचे आव्हान ही पिढी पूर्ण करील आणि येणार्‍या पिढीकडे वैश्विक संघाचा वारसा देईल.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/