घरकाम करून उद्योजक घडवणाऱ्या आईची कथा

    दिनांक  11-Oct-2018   
 
 
 

गोदावरी. कोल्हापूरच्या मातीतली एक रांगडी, मर्दानी मराठी मुलगी. पुरुषांसोबत कुस्त्या खेळणारी मुलगी म्हणून सांगवड्यामध्ये तिची एक वेगळीच ओळख होती. कधी कुणापुढे न नमणारी, ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणारी. या तिच्या स्वभावामुळेच भले भले टगेसुद्धा तिला टरकून होते. कोल्हापूरच्या आनंदराव शिवणकरांसोबत तिचा विवाह झाला. आनंदरावांमधील पुरुषाला गोदावरीचं हे स्त्री वर्चस्व मान्य नव्हतं. गोदावरीने मान खाली घालून आपली प्रत्येक गोष्ट मान्य करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, मनस्वी असलेल्या गोदावरीला निव्वळ स्त्री म्हणून कमी लेखणं हे मान्य नव्हतं. पुरुषी अहंकारापोटी आनंदराव गोदावरीला मारहाण करायचे. गावाला रोजगाराशिवाय काही पर्याय नाही म्हणून हे जोडपं मुंबईला आलं. ताडदेवला एका झोपडीत राहू लागलं. मिळेल ती कष्टाची कामं दोघंही करीत. आनंदराव रात्री दारू पिऊन येत आणि गोदावरीला मारहाण करत. असेच एक दिवस कामाला जात असताना आनंदरावांना गाडीने उडवलं. त्या अपघातात त्यांचं निधन झालं. पाच महिन्यांची गरोदर असलेल्या गोदावरीच्या पायाखालची जमीनच खचली. कुठे जायचं? काय करायचं? बाळाचं कसं होणार? असे सगळे प्रश्न आयुष्य बनून समोर उभे होते. जन्माआधीच पोरका झालेला गोदावरीचा हा पोरगा मात्र पुढे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आला. ही कथा आहे गोदावरीच्या मुलाची. यश कन्स्ट्रक्शनच्या परशुराम शिवणकरांची. पतीच्या निधनानंतर सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर गोदावरी परत मुंबईला परतल्या. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ होता. सोबत लहानगा परशुराम होता. गोदावरीचा भाऊ एका खाजगी कंपनीत कामाला लागला. दिवसामाजी परशुराम मोठा होत होता. परशुराम अडीच-तीन वर्षांचा असताना लहान मुलांची भांडणं झाली. त्या भांडणात चिडून परशुरामने एका लहान मुलाला दगड मारला. रक्तबंबाळ झालेल्या त्या मुलाची आई आणि शेजारच्या बायकांनी परशुरामवरचा सगळा राग गोदावरीवर काढला. तिला बेदम मारहाण केली. भेदरलेली गोदावरी रातोरात झोपडी तिथेच सोडून भावासह ठाण्याला निघून आली. ठाण्याला आल्यावर ती एका मंदिराजवळच्या झोपडीत राहू लागली. मंदिराची आणि त्या परिसरातील चार-पाच घरची धुणीभांडी ती करीत असे. दरम्यान परशुराम चांगलाच खोडकर झाला होता. एकदा असंच मालकाच्या मुलासोबत खेळत असताना खेळण्यावरून लहानग्या परशुरामने त्या मालकाच्याच मुलाला मारलंं. ”तुझा मुलगा असाच राहिला तर तो भविष्यात गुंड बनेल. त्यापेक्षा त्याला मी सांगतो तिकडे ठेव,” असं मालकाने सांगितलं. गोदावरीने काळजावर दगड ठेऊन मालकाने सांगितलेल्या पत्त्यावर परशुरामची रवानगी केली. पत्ता होता, बालकल्याण नगरी, मानखुर्द. मुलांचे अनाथाश्रम.

 

आपण एखाद्या चित्रपटात पाहतो तसाच हा अनाथाश्रम होता. मोठी मुलं लहान मुलांना मारहाण करायची. अनाथाश्रमाच्या मॅनेजमेंटला कळलं की, ते कारवाई करायचे. त्यांची पाठ फिरली की मुलं परत मारायची. हे आता जणू सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं होतं. सुरुवातीला परशुरामलासुद्धा कित्येकदा मारहाण झाली. आपण हतबल आहोत, काहीच करू शकत नाही, ही खंत परशुरामला सतावत होती. परशुराम गणित, भूमिती आणि विज्ञान यासारख्या अवघड विषयांत हुशार होता. तो मुलांच्या या विषयातील समस्या सोडवू लागला. त्यामुळे अल्पावधीत तो मुलांमध्ये लोकप्रिय झाला. आश्रमातील टारगट पोरंसुद्धा परशुरामला आता मारण्याऐवजी मान देऊ लागली. दोन महिन्यांतून एकदाच आईला भेटायला मिळायचं, याची बोच मात्र परशुरामला सतत लागून राहायची. आपला पोटचा गोळा लांब आहे, या विचाराने इकडे गोदावरीसुद्धा मनातून तुटायची. दहावीची परीक्षा झाली. परशुरामला ७२ टक्के मार्क्स मिळाले. वर्ष होतं १९८७. पठडीतल्या सायन्स, कॉमर्स, आर्ट्सपेक्षा वेगळं काहीतरी करावं, असं परशुरामला वाटत होतं. त्याला इंजिनिअरिंगचा पर्याय दिसला. पण पैसा कुठे होता इंजिनिअरिंग करायला? त्यावेळी एक समाजसेविका त्याच्या मदतीला आल्या. त्यांनी पाच वेगवेगळ्या दानशूरांना परशुरामची कहाणी सांगितली. त्यातून कोणी इंजिनिअरिंगच्या फी चे पैसे भरले, कोणी अभ्यासाचं साहित्य, कोणी गाडीखर्च, कोणी कपड्याचा खर्च असे वेगवेगळ्या प्रकारे खर्चाचा भार उचलला. वांद्य्राच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्याला प्रवेश मिळाला. मानखुर्द ते सायन आणि त्यानंतर दुसर्‍या बसने कलानगरला परशुराम उतरत असे. त्यानंतर तो खेरवाडीला चालत जाई. १८ वर्षांचा झाल्यानंतर आश्रमात राहण्याची परवानगी नसे. इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना परशुराम आपल्या आईकडे राहायला आला. घर तरी कसं म्हणणार त्याला? ४ बांबू आणि वर प्लास्टिकचं छत. इंजिनिअरिंगमध्ये शिकणार्‍या परशुरामला खूप वाईट वाटायचं. पण पर्याय नव्हता. घरी लाईट नव्हती. त्यामुळे बारा बंगल्याच्या रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागे. आईला भेटायच्या बहाण्याने टीव्ही बघायला तो आई घरकाम करत असे, त्या घरी जाई. ’महाभारत’ त्याची आवडती मालिका. मालिका पाहताना आईला लादी पुसताना पाहून पोरसवदा परशुरामच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळत असे.

 

१९९३ साली परशुराम इंजिनिअर झाला. परशुरामची मावसबहीण इमारतीच्या कामावर बिगारीकाम करत होती. तिने त्या बिल्डरला आपला भाऊ इंजिनिअर असल्याचे सांगितले. बिगारीकाम करणार्‍या मुलीचा भाऊ इंजिनिअर कसा पाहूया तरी, अशा काहीशा अविश्वासाने त्यांनी तिला भावाला घेऊन यायला सांगितले. दुसर्‍या दिवशी परशुराम गेला. मुलाखतीत तो पास झाला आणि महिना ८०० रुपये पगार त्याला मंजूर झाला. पहिला पगार मिळाल्याक्षणीच त्याने आईला सगळ्या ठिकाणचे घरकाम बंद करण्यास सांगितले. एक वर्ष प्रचंड मेहनत घेतली. १९९४ साली मित्राच्या साहाय्याने तो बांधकाम व्यवसायात उतरला. २ सोसायट्यांचे काम होते. त्यातून ६० हजार रुपयांचा फायदा झाला. त्यातून घर नीट बांधलं. लाईट घेतली. आईसाठी चांगले कपडे घेतले. आईसाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी केली. तिच्या आयुष्यातला हा पहिला दागिना. मित्राने कंपनी सोडल्याने १९९६ मध्ये परशुराम यांनी दुसर्‍या मित्राबरोबर भागीदारीत व्यवसाय केला. यावेळी त्यांनी अगदी बिगारीकामापासून सगळी कामे केली. त्याचा फायदा त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीत झाला. कालांतराने ही भागीदारीसुद्धा संपुष्टात आली. आता आपण स्वबळावर कंपनी सुरू करायची, या इराद्याने १९९९ साली त्यांनी ’यश कन्स्ट्रक्शन’ कंपनीची स्थापना केली. मजबूत बांधकाम आणि जलावरोध ही त्यांची खासियत आहे. आतापर्यंत त्यांनी २५० हून अधिक इमारतींच्या डागडुजीचे काम केलेले आहे. २२ कामगार सध्या यश कन्स्ट्रक्शनमध्ये कार्यरत असून काही कोटी रुपयांची उलाढाल ही कंपनी करत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत आपण देवीचं पूजन करतो. या सर्वांत श्रेष्ठ देवी म्हणजे आई. परशुरामकडे गोदावरीसारखी आई होती म्हणूनच आज परशुराम शिवणकर बांधकाम क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. गोदावरी शिवणकरांच्या त्याग आणि परिश्रमाला सलाम!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/