टपाल खात्याची पाचशतकी मजल

    दिनांक  11-Oct-2018   
 
 

आपले नातलग, मित्रपरिवार यांच्या सुखदुःखाच्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचविणारे टपाल खाते सध्या कालानुरूप बदलत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नागरिकांच्या सुखदुःखाच्या क्षणात साथीदार असणारे टपालखाते आजमितीस नागरिकांच्या वित्ताचीही काळजी घेण्यास पुढे सरसावले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) अर्थात टपाल बँकेच्या डिसेंबर अखेरपर्यंत नाशिकमध्ये ५५० हून अधिक शाखा कार्यान्वित होणार आहेत. तसेच, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पोस्ट पेमेंट बँकेचा फायदा सर्वांना घेता यावा, यासाठी विविध योजना कार्यन्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नाशिक डाक विभागाचे प्रवर अधीक्षक प्रल्हाद काखान्डकी यांनी दिली. आजमितीस नाशिकमधील मुख्य पोस्ट कार्यालयात आणि दिंडोरीसह, नळवाळापाडा, पालखेड बंधार, टिटवे आदी ठिकाणी आयपीपीबीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. वरील ठिकाणी सुविधा सुरू झाल्याने न केवळ शहरवासीय तर ग्रामीण आणि वनवासी जनतेलाही याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे टपाल खात्यावरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे पाहावयास मिळते.

 

टपाल खात्यामार्फत बँकेच्या सभासदांना एटीएम कार्डचे वितरणदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी खातेधारकांना टपाल कार्यालयात येण्याची गरज नाही. या सुविधेमुळे टपाल कार्यालयातील रांगेपासून खातेधारकांचा बचाव होत असल्याने ही सुविधा नागरिकांच्या पसंतीची ठरत आहे. आजमितीस नाशिक विभागात कार्यान्वित असलेल्या आयपीपीबीमध्ये सहा ते सात हजार सभासद आहेत. या सुविधेला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. तो लक्षात घेता, डिसेंबर २०१८च्या अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील ५५० टपाल कार्यालयांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातदेखील टपाल खाते आपली ही वित्तसेवा पोहोचविण्यास सक्षम ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा, इगतपुरी, त्रंबकेश्वर, सिन्नर आदी ठिकाणी ३०० टपाल कार्यालयात आयपीपीबीची सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. वरील तालुक्यांत सेवा सुरू होणार असल्याने दुर्गम वनवासी क्षेत्रदेखील या सुविधेच्या छायेखाली येणार आहे. त्यामुळे टपालसेवा आता न केवळ संदेशासाठी मर्यादित आहे तर ती वित्ताचे रक्षण करण्यासाठीदेखील सक्षम ठरली आहे.

 
 

सायकल सिटी नाशिक

आजच्या आधुनिक युगात वाहनांचा बेसुमार वापर हा पर्यावरणाच्या र्‍हासाचे कारण ठरत आहे, हे आपण जाणतोच. गतिमान जीवनशैली व्यतीत करता असताना आपला कार्यभाग साधण्यासाठी विविध वेगमर्यादा असणारी एकाच घरात अनेक वाहने किमान शहरी भागात तरी आपणास पाहावयास मिळतात. यावर उतारा म्हणून आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल या गतवैभवाकडे पुन्हा परतण्याची गरज आजमितीस भेडसावत आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविधांगी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग नाशिकने सायकल चळवळीला ‘स्टार्टर’ दिला आहे. नाशिकमध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरात सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी तब्बल १०० ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सध्या ही सेवा गोल्फ क्लब मैदान, राजीव गांधी भवन, महात्मा नगर क्रिकेट मैदान, मॅरेथॉन पॉईंट, कुसुमाग्रज ग्रंथालय, गोकुळ पिंगळे ग्रंथालय, प्रमोद महाजन उद्यान, केटीएचएम महाविद्यालय, पशुसंवर्धन रुग्णालय आणि जेहान सर्कल या भागात सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांचा प्रतिसाद या योजनेला मिळाल्यास पाच ते दहा हजार सायकल महापालिका प्रशासन उपलब्ध करून देणार आहे, असे सुतोवाच यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. या योजनेचा फायदा नाशिक शहरात येणार्‍या पर्यटकांनादेखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांना वाहतुकीचा सुलभ पर्याय या निमित्ताने शहरात उपलब्ध झाला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीकृत सभासदांना पहिल्या ३० मिनिटांपर्यंत कितीही वेळा मोफत सायकल वापरता येणार आहे. तसेच पुढील ३० मिनिटांसाठी त्यांना ५ रुपये इतके माफक शुल्क अदा करावे लागणार आहे. त्यामुळे ही सेवा लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. शहरात सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता नाशिककरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सायकलींचा वापर करताना त्या सुव्यवस्थित ठेवणे हेदेखील सुजाण नागरिक म्हणून नाशिककरांचे यापुढे कर्तव्य असणार आहे. यापूर्वीच्या विविध प्रकल्पांना लागलेले ग्रहण या प्रकल्पाला लागणार नाही, याची सजगता आता नाशिककर नागरिकांनी बाळगण्याची गरज आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/