स्वत:लाच विचारा, ‘‘श्रीमान तुम्हीसुद्धा...?’’

    दिनांक  10-Oct-2018   

 
 
नाना पाटेकर, रजत कपूर, आलोकनाथ, कैलाश खेर, विकास बहल, माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील, गौरांग दोशी, चेतन भगत, गेल्या काही दिवसांत आरोपांच्या माळेची लड ताडताड फुटते आहे. ‘मी टू’ या जागतिक चळवळीचे लोण तसे मागच्या वर्षी सुरू झाले अन् ते बॉलिवुडमध्ये प्रवेश करते झाले होते. आता मात्र ही ऑक्टोबर हीट जोरात आहे. 5 ऑक्टोबरला या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आता तिकडे ही चळवळ तशी मंदावली आहे. भारतात मात्र नेहमीप्रमाणे ती उशिराने आली आणि आता त्याचे पडसाद निनादत आहेत.
 
 
5 ऑक्टोबर 2017 रोजी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्रात अॅशले जड या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. अॅशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. हार्वे वेनस्टेईन काही साधी आसामी नव्हते. त्यांनी पल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा ऑस्कर पारितोषिकप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने या मुलाखतीनंतर आणखी खोदकाम केले आणि मग हार्वे यांच्यावर त्यांच्या कंपनीतल्या अगदी साध्या कर्मचारी महिलेनेही असले आरोप केले. त्यानंतर ‘द वेनस्टेइन कंपनी’मधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
12 ऑक्टोबर 2017 रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने अॅमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले.
16 ऑक्टोबर 2017 रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर मी टू हा हॅशटॅग वापरून, हॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तर ‘मी टू’ हा हॅशटॅग वापरा, या तिच्या आवाहनाला एका दिवसात 40,000 लोकांनी, अर्थात ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, मी टू म्हटले.
 
 
18 ऑक्टोबर 2017 ला ऑलिम्पिक जिमनॅस्टिक खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नास्सर यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. 29 ऑक्टोबर 2017 रोजी अॅन्थोनी रॅपने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. अलिसा मिलानो हीच ‘मी टू’ची उद्गाती म्हणून ख्यात आहे. मात्र, तिने ‘मी टू’ हा शब्द प्रचलित केला. हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला आहे. एका अल्पवयीन मुलीने त्यांना, तिच्या शोषणाची कहाणी सांगितली. त्यावर बर्क यांना असे वाटत राहिले की, अरे! ही तर माझीच कहाणी आहे. आपण त्या वेळी व्यक्त होऊ नाही, शकलो नाही ही खंत होती. त्यातून 10 वर्षांनी तराना बर्क यांनी ‘जस्ट बी’ ही लैंगिक अत्याचार आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी संस्था स्थापन केली. त्यांनी या चळवळीला नाव दिले, ‘मी टू.’ गेले वर्षभर या चळवळीने पाश्चात्त्य देशांत बरीच उलथापालथ केली. त्याचे काय परिणाम व्हायचे ते झाले. कुठल्याही चळवळीत सुरुवातीला उत्साह असतो.
भावना असतात. नंतर अनुभवाने चळवळ प्रगल्भ होत जाते. तशी आता ‘मी टू’ ही चवळवळदेखील तिकडे प्रगल्भ झाली आहे. केवळ मनोरंजनाच्या क्षेत्रातच असे शोषण होते असे नाही. सार्वजनिक जीवनात हा मोह अनेक पुरुषांना होतो... तसा तो स्त्रियांनाही होतो, हे दिसून आले आहे. गेल्या वर्षी जगभरातल्या चित्रपट जगतातल्या पुरुषांनीही ‘मी टू’चा उच्चार केला. आपल्या कहाण्या सांगितल्या. त्यात भारतीय चित्रपटक्षेत्रातले नामवंत नटदेखील आहेत. सार्वजनिक जीवनातले कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. केरळातल्या बिशपची कहाणी ताजी आहे. मागे मुस्लिम महिलांनीही ‘मी टू’चा वापर केला. हज यात्रेदरम्यान त्यांना सहन करावे लागलेले प्रकार सांगितले. ‘मास्क मी टू’ चा प्रयोग करत एका मुस्लिम महिलेने फेसबूकवर तिच्यावर या यात्रेदरम्यान घडलेला प्रकार सांगितला. नंतर त्यावरून खळबळ माजली आणि त्या महिलेची ती पोस्ट काढून टाकण्यात आली, मात्र व्हायचा तो परिणाम झालाच. हजच्या या पाच दिवसांच्या यात्रेला जगभरातून 20 लाख मुस्लिम बांधव हजेरी लावतात. त्या महिलेच्या पोस्टनंतर अनेक महिलांनी आपल्या कहाण्या समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या. त्यात वाढच होत गेली. मोना एल्टाहेवी या मूळच्या मिस्रच्या अमेरिकन महिलेने पंधरा वर्षांची असताना या यात्रेदरम्यान तिच्या संदर्भात घडलेला अश्लाघ्य प्रकार सांगितला. तिच ते ट्वीट एका दिवसात 2000 वेळा फॉरवर्ड केले गेले. हा प्रकार घडला तेव्हाच मी सोबती महिलांना तो सांगितला, पण त्या वेळी त्यांनी मला चूप केले, असे तिने म्हटले होते.
 
 
अशा प्रकारे स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणे गैर नाहीच. नेमका प्रकार घडतो त्या वेळी त्या बोलू शकत नाहीत. मधल्या काळात विदर्भात आदिवासीबहुल गावांमध्ये कुमारी मातांचा प्रश्न निर्माण झाला होता. आता त्याची चर्चा होत नाही, याचा अर्थ तो प्रकार थांबला आहे, असे अजीबात नाही. बर्याचदा हे सारे त्या वेळी सहन करावे लागते. एकतर त्या पुरुषाचे उपकार असतात. काही ठिकाणी फक्त सूचन केले असते. अमेरिकेतील ओहयो प्रांतातील सर्वोच्च न्यायालयाच्या 70 वर्षांच्या न्यायमूर्ती निल यांनी कबूल केले की, त्यांचे पन्नासाहून अधिक महिलांशी संबंध राहिले आहेत. त्यात त्यांच्या खासगी सचिव महिलेपासून अगदी सिनेटरपर्यंत महिलांचा समावेश होता.
 
 
महिलांनी मौन तोडले तर काय होऊ शकते, हे या मोहिमेने दाखवून दिले आहे. घटना घडते तेव्हा किंवा पुरुष अन्याय करतात तेव्हा त्या बोलू शकत नाहीत, मात्र नंतर त्या भविष्यात आपले आक्रंदन समाजासमोर मांडू शकतात, हा वचक या मोहिमेमुळे बसला हे खरे आहे. स्त्रीकडे पाहण्याची पुरुषांची नजर उपभोग्य वस्तू अशीच आहे, हेही अधोरेखित झाले. ते एक उघड सत्य होते. स्त्रियांच्या सोशीकपणाने म्हणा किंवा दुबळेपणाने, ते मुखर होत नव्हते. आता त्याला वाचा फुटली आहे. शब्द सापडले आहेत आणि समाजमाध्यमांचे अवकाशही मिळाले आहे. त्यात चित्रपट, क्रीडा या क्षेत्रांत जवळीक साधली जाते. त्यातून उद्दीपित झालेला पुरुष स्त्रीच्या सामीप्याचा भलता अर्थ काढून नसते चाळे करण्याचा किंवा तसा इशारा करण्याचा प्रमाद करत असतो...
 
 
आता मात्र एका वळणावर थांबून याचा विचार करायला हवा. ती म्हणते तेच सत्य आहे अन् पुरुष सगळेच कसे लंपट आहेत, असा मोघम तर्क काढला जातो आहे. या मोहिमेचा पुरुषांना शिकार करण्यासाठीही वापर होऊ शकतो, हेदेखील नाकारता येत नाही. जगात त्याच घटना समोर आल्या आहेत, चर्चा झाली आहे, ज्यांत पुरुषांना शिक्षा करण्यात आली. ती स्त्री खोटे बोलते आहे, हे सिद्ध झाल्याच्या घटनाही आहेत. त्या मात्र चर्चेत आल्या नाहीत. त्या वेळी ती स्त्रीदेखील त्यात सहभागी असते. चेतन भगत यांच्या प्रकरणात त्यांनी चॅटिंग केले. त्यात ती स्त्रीदेखील त्या वेळी सहभागी होतीच. एखाद्यावर आरोप करून टाकायचा अन् निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकून द्यायची, हा अन्याय अशा अनेक प्रकरणांत होत असतो. आरोप आणि निर्दोषत्व सिद्ध होणे, यात त्याची होणारी होरपळ मात्र कुणीच बघत नाही. सायलेन्स ब्रेकर्स म्हणून टाईम मॅगझीन ने ‘मी टू’वाल्या महिलांना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले, मात्र जगात या मोहिमेकडे दुसर्या कोनातूनही पाहिले जाते आहे.
 
 
 
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल हेनेन यांनी या मोहिमेची संभावना ‘वीच हंट’- महिलांकडून फसविले जाणे, अशी केली आहे. ही भावना केवळ पुरुषांचीच आहे, असे नाही. फ्रेंच अभिनेत्री कॅथरीन डेनेवो, जर्मन अभिनेत्री इनग्रीड कॅचेन यांनीही या मोहिमेवर टीका केली आहे. फ्रान्सचे आघाडीचे दैनिक ला मॉन्डेने यावर संपादकीयच लिहिले होते आणि त्याच्या समर्थनार्थ मोहिमेत या जगातल्या अनेक अभिनेत्रींनी सह्या केल्या होत्या. पुरुषांचा तिरस्कार करणार्यांचा हा नवनैतिकतावाद आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनाही मोकळेपणा सोडावा लागला आहे. भीती दाटून आलेली आहे. यातून स्त्री-पुरुष अस्पृष्यता निर्माण होण्याची शक्यताही आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीनंतर समाजात स्त्रिया मोकळेपणाने वावरू लागल्या आहेत. स्त्री- पुरुषांतील दरी कमी होते आहे, अशा वातावरणात या चळवळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शस्त्राचा गैरवापर केलाच जाणार नाही, असे या चळवळीचे समर्थकही नाकारू शकत नाहीत. त्यामुळे आता प्रत्येक पुरुषाला स्वत:ला विचारावे लागणार आहे, ‘‘काय श्रीमान, तुम्हीसुद्धा...?’’