बुलढाण्यासाठी ३४७ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

    दिनांक  09-Jan-2018


बुलडाणा : २०१८-१९ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ३४७ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर केला करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या नवीन आराखड्यामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक विकास आणि जनकल्याणाची कामे यातून पूर्ण होतील अशी अपेक्षा फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्ह्यातील सर्वसाधारण योजनेसाठी १९९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १२३ कोटी, तर आदिवासी उपयोजनेसाठी २४.०९ कोटी रूपयांच्या निधीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्यासाठी शासनाकडून कसल्याही प्रकारची कपात केली जाऊ नये, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देखील फुंडकर यांनी यांनी यावेळी दिले.

याच बरोबर जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या काही समस्यांवर भाष्य करत त्यांवर उपायही त्यांनी यावेळी सुचावले. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार असल्याचे सांगत बोंडअळी आल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक भागात कापूस पिक वखरले. त्यामध्ये दुसरे पीक घेतले. अशा परिस्थितीत पंचनामा होवू शकत नाही. त्यामुळे या हंगामाच्या ७/१२ वर कापूस पिक पेरल्याची नोंद असल्यास त्या क्षेत्रासाठी मदत देण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.