वनवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक ठिकाणीच रोजगार देणार!

    दिनांक  09-Jan-2018

विष्णू सावरा यांचे प्रतिपादन

 
 
 
पालघर  : दुर्गम वनवासी भागातील लोक रोजगारासाठी बाहेरगावी जातात. ते स्थलांतर रोखण्यासाठी वनवासी लोकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार देणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सावरा यांनी केले.
 
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र पालघर, हाऊस ऑफ अनिता डोंगरे फाऊंडेशन, रबाळे, नवी मुंबई यांचा सामंजस्य करार जव्हार नगरपरिषद, जव्हार व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बोईसर यांच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण व उत्पादन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सावरा बोलत होते.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, प्रकल्प अधिकारी जव्हारच्या पवनीत कौर, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मिथिलेश कुमार, हाऊस ऑफ अनिता डोंगरे फाऊंडेशनचे हिमाद्दी दत्ता, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी मुकेश संखे, जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक व प्रशिक्षणार्थी वनवासी महिला उपस्थित होत्या.
 
यावेळी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, ''जिल्ह्यातील वनवासी मातांसाठी १ कोटी रुपयांचा गोधडी प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत महिलांना रोजगार व प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोल्ट्री प्रकल्प राबविणार आहे. ग्रामीण भागातील समाजमंदिराचा उपयोग रोजगार व प्रशिक्षण केंद्रासाठी करणार आहे.''
 
यावेळी पवनीत कौर यांनी सांगितले की, ''या प्रकल्पामुळे ७१ वनवासी महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळणार आहे. त्यापैकी ५० महिलांना शिवणकाम व उर्वरित २१ वनवासी महिलांना पॅकेजिंग, फिनिशिंग यासारख्या बाबीतून महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान प्रवास भत्त्यासह वेतन (स्टारपेंड) म्हणून प्रतिमहिना १५०० रुपये मिळणार आहेत. हे प्रशिक्षण एका महिन्याचे असून त्यानंतर या महिलांना थेट रोजगार उपलब्ध होईल. पूर्ण वेळ काम केल्यास एका महिलेला प्रकल्पातून किमान आठ ते दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत.''
 
राज्यात वनवासी भागातील लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर होत असते, हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहकार्य घेणार आहे. जव्हारमध्ये खाजगी उद्योग व या विभागाच्या मदतीने ७१ वनवासी महिलांना रोजगार उपलब्ध झाला. हाच प्रयोग जिल्ह्यात व राज्यात वनवासी भागात राबविणार आहे. आगामी काळात जिल्ह्यातील एक हजार वनवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत.
- विष्णू सावरा, आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री