राष्ट्रभक्ती व देशभक्ती रोजच्या जीवनातील गोष्ट व्हायला हवी - रवींद्र किरकोळे

    दिनांक  09-Jan-2018
 

 
 
 
वाडा :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आत्मशुद्धीची चळवळ असून समाजामध्ये चारित्र्यसंपन्नता व प्रामाणिकपणा निर्माण करण्याचे कार्य करण्याचे काम संघ करीत असल्याचे संघाचे पश्चिमक्षेत्र बौद्धिक प्रमुख रवींद्र किरकोळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाडा आयोजित ’हिंदू चेतना संगम, सज्जन शक्ती सर्वत्र’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमके काय करतो? असा प्रश्न आज सर्वांनाच पडलेला असून त्यावर भाष्य करताना ते बोलत होते. राष्ट्रभक्ती व देशभक्ती ही प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातील गोष्ट व्हायला हवी अशी संघाची धारणा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाडा तालुक्याच्या वतीने पी. जे. हायस्कूलच्या श्रमदान रंगमंच येथे ’हिंदू चेतना संगम, सज्जन शक्ती सर्वत्र ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघ गेली ९२ वर्षे हिंदू समाजाचे संघटन करत असून संघ प्रेरणेने समाज परिवर्तनाच्या अनेक विषयांची सुरुवात होऊन विविध प्रकारच्या सेवाकार्यांमधून सुदृढ हिंदू समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व हिंदू चेतना संगमनिमित्ताने सज्जन शक्तीचे एकत्रीकरण करून समाज परिवर्तनाची गती वाढविण्याचा निश्चय करण्यात आला आहे, असे संघाचे वाडा तालुका कार्यवाह बिपिन वाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले.
 
अतिशय शिस्तबद्ध झालेल्या या कार्यक्रमास वाडा तालुक्यातील कृषिभूषण अनिल पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा, बाबाजी काठोले, नंदकुमार पाटील यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक, वाडा शहरातील व तालुक्यातील महिला व नागरिक शेकडोंच्या संख्येने असलेली उपस्थिती लक्षणीय होती.