Teaser : ''पण आपलं लै प्रेम आहे तिच्यावर...''

08 Jan 2018 12:44:06

 
 
मागच्या मागच्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये 'चौर्य' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता, आपल्यापैकी खूप कमी लोकांनी तो चित्रपट पहिला असावा. पण हा चित्रपट वेगळी मांडणी करण्यासाठी खूप नावाजला गेला, समीर आशा पाटील या तरुणाने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. याच समीरचा 'यंटम'हा नवा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आज सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय.
 
 
विशेष म्हणजे रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजपर्यत जाधव यांनी निर्माता म्हणून ज्या चित्रपटांची निवड केली त्यापैकी बहुतांश सगळेच चित्रपट हिट ठरले, त्यामुळे 'यंटम' कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. 'यंटम'च्या टिझर मधील हिरोचा एक संवाद लक्षात राहतो तो म्हणतोय, ''पण आपलं लै प्रेम आहे तिच्यावर, तिच्यासाठी आपण काय बी करायला तयार हाय...''

 
 
वैभव कदम व अपूर्वा शाळेगावकर हे युवा कलाकार आपल्याला या चित्रपटातून दिसतील. त्याचबरोबर सयाजी शिंदे देखील यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत. अर्थात, हा टिझर बघितल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा 'सैराट'ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एकूणच कथेचा पाया त्याच गोष्टीवर आधारित असल्याचे लक्षात येत आहे. पण तरीही समीर आशा पाटील व रवी जाधव या जोडीचा हा चित्रपट असल्याने त्याकडून वेगळ्या कलाकृतीची अपेक्षा करायला हरकत नाही. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0