पात्रता - अपात्रता निश्चित करता न आलेल्या याद्या बँकेला सादर

    दिनांक  30-Jan-2018

पात्र-अपात्रता ठरविण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना
बुलडाणा :
छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना २०१७ साठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या पडताळणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समित्यांनी आपला नवीन अहवाल प्रशासनापुढे सादर केला असून पात्रता-अपात्रता ठरवण्यात न आलेल्या याद्या बँकांकडे परत पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन आपल्या अर्जांची पुन्हा एकदा पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
योजनेच्या निकषानुसार जिल्ह्यातील व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर सादर केली आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेली माहिती व बँकेकडून आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीची पुन्हा एकदा पाहणी करून माहितीतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांच्या अर्जाबाबत पात्र-अपात्रता निश्चित करता आलेली नाही. मात्र निकषात बसत असलेले पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित न राहण्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या अर्जांमधील माहिती परिपूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. त्यासाठी अर्जातील माहितीच्या आधारे शहानिशा करून त्यांची पात्रता-अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय गठीत समित्यांना देण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकाकडे पाठविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आपल्या अर्जाच्या पात्र – अपात्रतेची चौकशी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.