आकाशाशी जडले नाते – महानीलचंद्र

    दिनांक  03-Jan-2018   
सुमित आला, तेंव्हा आबा त्यांच्या डायरी मध्ये काही नोंद करत होते. “काय लिहिताय आबा?”, सुमितने विचारले.
 
“या महिन्यात आकाशात काय काय पाहायचे आहे, ते लिहून ठेवतोय, माझ्या या आकाश दैनंदिनी मध्ये!”, आबा म्हणाले.
 
“या महिन्यात काय विशेष दिसणार आहे?”, सुमितची पृच्छा.
 
“जानेवारी २०१८ चा महिना चंद्राचे निरक्षण करण्यासाठी उत्तम आहे! या महिन्यात आपल्याला चंद्र अनेक करामती करून दाखवणार आहे. त्या एक एक करत आकाशाच्या रंगमंचावर पहायच्या आहेत. पहिल्याने तर २ तारखेला पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला ‘महाचंद्र’ दिसणार आहे बरे, तो पाहायला विसरू नकोस.”, आबा म्हणाले.
 
“महाचंद्र? हे काय असते?”, सुमितने विचारले.
 
“तुमचा Super Moon रे!”, आबा म्हणाले, “नेहेमी दिसणाऱ्या चंद्रापेक्षा ‘सुपरमून’ चा आकार मोठा असतो. जानेवारीमध्ये असा महाचंद्र पाहायला मिळेल.”
 
“चंद्र तर आहे तेवढाच असणार. तो तर काही लहान-मोठा होणार नाही. मग ‘महाचंद्र’ कसं काय दिसू शकतो?”, सुमितने विचारले.
 
“बरोबर आहे मित्रा, चंद्राचा आकार काही बदलत नाही. पण चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर मात्र बदलते. आणि त्यामुळे तो लहान किंवा मोठा दिसू शकतो.
 
“काय आहे, चंद्र पृथ्वी भोवती फिरतो तो मार्ग काही अगदी गोलाकार नाही, तर अंडाकृती किंवा elliptical आहे. अशा मार्गामुळे तो एकदा पृथ्वीच्या थोडा जवळ येतो. याला perigee असे म्हणतात. तर एकदा पृथ्वीपासून नेहेमीपेक्षा थोडा लांब जातो. या बिंदुला Apogee असे म्हणतात.
 
“चंद्र जेंव्हा perigee ला असतो, तेंव्हा पृथ्वी व चंद्रातले अंतर apogee पेक्षा जवळ जवळ ५०,००० किमी कमी असते.”, आबा म्हणाले.

 
 
“Wow!! मग बरोबरच आहे, इतके अंतर कमी झाल्यावर चंद्र नक्कीच मोठा दिसणार!”, सुमित म्हणाला.
 
“कधी कधी तुम्ही काय म्हणता ते hype असतं! अशा hype ला भुलू नको बरे! चंद्र मोठा दिसतो, म्हणजे आकाशभरून दिसत नाही काही! नेहेमीपेक्षा साधारण १४% मोठा दिसतो. हा पहा जवळच्या पौर्णिमेचा चंद्र आणि दूरच्या पौर्णिमेचा चंद्र!”, आबा म्हणाले.
 
 
“ओह! म्हणजे जो रोज निरीक्षण करत नाही, त्याला कदाचित महाचंद्र आहे हे कळणार पण नाही! आकाशाच्या अनंत पसाऱ्यात त्याच्या आकारातला फरक लक्षात येईलच असे नाही.”, सुमित निराशेने म्हणाला, “बर आबा, चंद्र तर महिन्यातून एकदा पृथ्वीभोवती फिरतो, त्यामुळे दर महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येत असणार. मग हे महाचंद्राचे इतके कौतुक का?”, सुमितचा प्रश्न.
 
“बरोबर सुमित! चंद्र दर महिन्यातून एकदा perigee ला असतो. पण जेंव्हा चंद्राची बारीक कोर पृथ्वीजवळ जवळ येते तेंव्हा त्या कोरीच्या आकारातला फरक आपल्याला फारसा कळत नाही. पण जेंव्हा पौर्णिमेचा चंद्र perigee ला असतो तेंव्हा मात्र आधीच पूर्ण असलेला चंद्र अजून मोठा दिसतो! वर्षातील काही पौर्णिमेचे चंद्र Perigee ला असतात. त्यामुळेच तर SuperMoon चा गवगवा!”, आबा म्हणाले.
 
 
“या महिन्याच्या शेवटी, ३१ तारखेला सुद्धा महाचंद्र दिसणार आहे. या चंद्राला विशेष नाव आहे ‘नीलचंद्र’!”, आबा म्हणाले.
 
“Oh! म्हणजे Blue Moon!”, इति सुमित.
 
“अर्थात! चांद्र महिना असतो प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत. या २९.५ दिवसांच्या कालावधीला Synodic Month म्हणतात. Gregorian calendar च्या ३० / ३१ दिवसांच्या महिन्यापेक्षा थोडा कमी. या मुळे कधीतरी असे होते, की पौर्णिमेने महिना सुरु झाला, तर त्याच महिन्याच्या शेवट पण पौर्णिमेने होऊ शकतो. म्हणजे एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात. दुसऱ्या पौर्णिमेचा चंद्र म्हणजे ‘Blue Moon’.
 
“सुम्या, या महिन्यात आवर्जून बघायची घटना असेल ३१ जानेवारीला. या दिवशी महा नील चंद्र लाल रंगाचा होतांना दिसणार आहे!”, आबा म्हणाले.
 
“हे काय बरोबर नाही! म्हणायचे ‘नील’ पण होणार ‘लाल’? आहे काय हे नक्की?”, सुमितचा प्रश्न.
 
“त्या बद्दल तुला नंतर सांगेन! सध्या हा तक्ता बघ आणि याच्या आधाराने जानेवारीच्या चंद्राचे निरीक्षण कर. यातील गमती जमती पुढच्या वेळी सांगेन!”, आबा म्हणाले.

टीप - या मध्ये दिलेल्या वेळा पुण्यासाठी आहेत. महाराष्ट्रात इतरत्र या वेळा थोड्याफार पुढे मागे असतील.
 
- दिपाली पाटवदकर