'बदलत्या युगात सुरक्षितता हाच खरा ‘पासवर्ड’

    दिनांक  24-Jan-2018

सायबर गुन्हे या विषयावर  पत्रकारांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 
बुलडाणा:
सध्याचे युग हे संगणकाचे आहे, असे म्हटल्या जाते. इंटरनेटमुळे जगाचे रुपांतर छोट्याशा खेड्यात झाले आहे. तंत्रज्ञानाने विकास साधायला पोषक वातावरण निर्मिती केले मात्र दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या युगामध्ये सुरक्षितता हाच महत्वाचा ‘पासवर्ड’ असल्याचे मत बुलढाणा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी व्यक्त केले.

सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सायबर पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा यांच्यावतीने पत्रकारांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्याने आदी उपस्थित होते.

'आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर सारखी सोशल मिडियाची साधने उपलब्ध आहेत, तसेच त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर देखील केला जातो. यासर्व ॲप्सचा वापर करताना नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती अपलोड करताना ती वेबसाईट https:// असावी. त्या वेबसाईटच्या सुरूवातीला https असणे आवश्यक आहे. तसेच बँकेसंदर्भात वैयक्तिक माहिती देताना काळजी घ्यावी. कुणालाही एटीएमचा पीन, इमेल व अन्य बँकिंग ॲप्सचा पासवर्ड शेअर करू नका. वैवाहिक संकेतस्थळांवर माहिती भरताना संकेतस्थळाची खात्री करून घ्यावी. या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरल्या जाते, अशी माहिती केदारे यांनी यावेळी दिली.

आक्षेपार्ह मजकूर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करतो. त्यामुळे कुठलाही मजकूराची पडताळणी न करता फॉरवर्ड करू नका. या नवीन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर कार्यरत असून राज्यात ४७ सायबर लॅब कार्यान्वीत आहे, तर ४३ ठिकाणी सायबर लॅबसह पोलीस स्टेशन कार्यरत आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.